लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी जयंती ते महाकवी वामनदादा कर्डक जयंती १ ते १५ ऑगष्ट या कालावधीत क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या विशेष उपक्रमात महेंद्र नरवाडे लिखित 'प्रबोधन चळवळीत कवी, गायक व शाहिरांचे योगदान... ' ही लेखमाला देत आहोत. - संपादक
भाग - ५.
शाहीर कैलास कोंडबाराव राऊत यांचा जन्म १५ डिसेंबर १९७२ ला हदगाव तालुक्यातील बनचिंचोली या गावी झाला. सध्या ते नागसेन नगर, हदगाव येथे राहतात. वडील गावातील भजनी मंडळात गाय न करत. दर गुरुवारी भजन व्हायचे. लहानपणी कैलास राऊत भजना मंडळाची गाणी ऐकत. वडील सामाजिक कार्यकर्ते असल्याने भीमजयंती निमित्त गायनाचे कार्यक्रम होत. आलेल्या सर्व गायक कलावंतांचे भोजन घरी बनवायचे, जेवनाची व्यवस्था घरीच करायचे. हदगाव तालुक्यातील हरडप या माझ्या गावी दरवर्षी धम्म मेळावा होतो त्या निमित्ताने सुप्रसिद्ध गायकांचे कार्यक्रम ऐकण्यासाठी न चुकता कैलास राऊत यायचे. आपणही त्यांच्यासारखे गायक व्हावे असे त्यांना वाटले तेथुन प्रेरणा घेऊन गीत गायाला सुरूवात केली.
शालेय शिक्षण घेतांना गीतं लिहिण्याचा छंद जडला .शिक्षण हे वाघिनीचे दुध आहे ,जो कोणी प्राशण करील तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. हा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार अंगिकारुन एम.ए.बी.एड.पर्यंत शिक्षण घेतले . उच्च शिक्षित असुनही त्यांनी प्रबोधन कार्यात स्वत:ला वाहुन घेतले. महाकवी वामनदादा कर्डक, स्मृतिशेष कवीरत्न को.जो. नरवाडे कामारीकर, विष्णु शिंदे, प्रतापसिंग बोधडे, प्रकाशनाथ पाटणकर यांच्या लेखणीच्या प्रभावाने आतापर्यंत ११०० च्या वर त्यांनी गाणी लिहिली. संविधानातील समता, स्वातंत्र्य , बंधुता व न्याय या मानवी मुल्यांची जोपासना व गुलामांना गुलामीची जाणीव करून देणारी महापुरुषांच्या विचारांची शिदोरी आपल्या प्रतिभेतुन जनमानसात रुजविण्यासाठी त्यांनी केलेला हा गीत प्रपंच. त्यांचे २४ गीतसंग्रह, १० व्हीडिओ सिडी आहेत आणि १०० च्या वर रेकार्डिंग गीतं नामवंत गायकांनी गायली आहेत.
महाराष्ट्रातील नांदेड, मुंबई, औरंगाबाद, नागपूर सह २५ जिल्ह्यात तसेच आंध्रप्रदेश, गुजरात, हैद्राबाद या ठिकाणी आतापर्यंत त्यांनी हजारो कार्यक्रम केले. नांदेड आकाशवाणीवर तीन वेळा प्रबोधनपर कार्यक्रम केले.
कलावंतांसोबत गाण्याची संधी-
महाकवी वामनदादा कर्डक, विष्णु शिंदे, वैशाली शिंदे, प्रतापसिंग बोधडे, सुरेश शिंदे, नागसेन दादा सावदेकर, अशोक निकाळजे, चंद्रकला गायकवाड, क्रांती मिनल, वैशाली शेंडे, प्रकाशनाथ पाटणकर, सत्यपाल महाराज, राहुल शिंदे, निशा भगत अशा दिग्गज कलावंतांसोबत गायनाची त्यांना संधी मिळाली. हरडपचे तबलावादक प्रकाश वाठोरे, ढोलक वादक समाधान राऊत, हार्मोनियम वादक जयपाल जमधाडे, अमोल भवरे, कोरसला संजय कदम, अरुण कदम हे त्यांचे साथसंगत करतात.. शाहीर कैलास राऊत यांच्या पत्नी विशाखा, मुलं तथागत व समाधान हे आख्खं कुटुंब या गायन क्षेत्रात आजही कार्यरत आहे.
मनपसंत गीते-
१)सांग रमा सांग आता पतीचं नाव गं,
२)आठवावा भीमाने दिलेला धडा,
३)मी पाहिलेला जवानी मधला महारोडा दिसत नाय,
४) माझ्या साहेबाला लागंल का कुणाची नजर,
५)भीमराया तुझ्या नातवाने,
उभा केला लढा वंचितांचा.
धम्म कार्य-कार्य-
हदगाव शहरात सातत्याने सात धम्म परिषदाचे यशस्वी आयोजन. तसेच नांदेड-नागपुर हायवेवर मानवाडी फाटा ता.हदगाव येथे प्रा.चंद्रकांत पडघणे यांनी तीन एकर जमीन दान दिली व तेथे तथागताची उघडे डोळे व स्मित हास्य मुद्रा असलेला, व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा धोती नेसलेल्या पुतळा दान दिला आहे. त्याच ठिकाणी बहुजन टायगर प्रतिष्ठान या संस्थेचा अध्यक्ष या नात्याने शाहीर कैलास राऊत यांच्या संस्थेतर्फे संघमित्रा बुद्ध महाविहार साकारण्याचा त्यांनी संकल्प जाहीर केला आहे. वंचितांना सत्तेमध्ये वाटा मिळवून देण्यासाठी गतवर्षी अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र राज्यात 'सत्ता संपादन जनजागृती अभियान ' राबवुन प्रचार केला.
पुरस्कार-
भीमशाहीर वामनदादा कर्डक,
नांदेडरत्न यासह अनेक पुरस्कार.
संदेश -सर्व बहुजन बांधवांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला जपावं, बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कार्यकर्ते तयार व्हायला पाहिजेत असे शाहीर कैलास राऊत आपल्या विद्रोही गीतगायनाच्या माध्यमातून सांगतात.
शाहीर कैलास राऊत यांचे हे सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय प्रबोधनाचे कार्य अधिक गतिमान होवो ! ही मंगल कामना!
-आयु.महेंद्र नरवाडे,
किनवट, मो.न.९४२१७६८६५०





No comments:
Post a Comment