किनवट (नांदेड) : किनवट-माहूर मतदार संघातील भेडसावत असलेल्या विविध समस्यांच्या अनुषंगाने विकासकामांना गती देवून किनवट-माहूर या दोन्ही तालुक्यांतील विकासकामांचा अनुशेष प्राधान्याने भरून काढण्यास कटीबध्द असल्याचे अभिवचन आमदार भीमराव केराम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिलेे आहे.
किनवट व माहूर या दोन्ही तालुक्यातील संभाव्य विकासकामांबाबत माहीती देताना आ. केराम यांनी सांगीतले आहे की, या दोन्ही तालुक्यात जवळपास दहाच्या वर तलाव निर्माण करण्याचा आपला मानस आहे. तसेच माहुर तालुक्यातील मांडवा ते मेट, मांडवा ते भीमपुर (बोरवाड़ी) व पवनाळा घाटाचे काम करून हा रस्ता मुख्य रस्त्यास जोडून दळणवळण सुविधा उपलब्धतेसाठी प्रस्तावित केला असून लवकरच हा रस्ता निर्माण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या दोन्ही तालुक्यातील आरोग्याची भौतिक गरज लक्षात घेवून माहुर व किनवट येथील रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रसुविधा उपलब्ध करून उत्तम आरोग्य सेवा देण्याचा प्रस्ताव, तसेच मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सारखणी येथेे जागा उपलब्ध होताच नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगीतले.
तर सामान्य जनतेला तातडीने उपचार मिळावेत यासाठी ८ आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आदिवासी उपयोजनेअंतर्गत मिनी रुग्णवाहीका खरेदी करून त्याची परिवहन नोंदणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालय गोकुंंदा, माहुर व मांडवी येेथील ग्रामीण रूग्णालयांसाठी उपलब्ध केलेल्या रूग्णवाहीकेचे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या उपस्थितीत लवकरच लोकार्पण करणार आहोत.
विशेष म्हणजे किनवट येथे मंजूर करण्यात आलेले माती परीक्षण केंद्र, शेतकऱ्यांना अखंडीत विज पुरवठा मिळावा यासाठी विज प्रकल्प मंजूर केला असल्याची उल्लेखनीय माहिती देवून शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला हमीभाव देण्यासाठी ज्वारी, तुर, मक्का यासाठी कायम खरेदी केंद्र मंजूर झाले आहे. तर बेरोजगार युवकसाठी नवीन प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांंनी सांगीतले.
दरम्यान मागील अनेक महिण्यांपासून कोरोना विषाणूने राज्यात थैमान घालून भीतीचे सावट निर्माण केल्याने सामान्य नागरिकांना अनेक अडचणींंना सामोरे जावे लागले व आजही जात आहेत. अशा कठीण परिस्थितीत किनवट माहुर तालुक्यातील जनतेच्या सार्वजनिक निकडीच्या असणाऱ्या अत्यावश्यक गरजांबरोबरच सिंचन, रस्ते, विज, शेती तसेच शेतीशी निगडित असणाऱ्या बाबींंना प्रामुख्याने प्राधान्य देवून त्या पुर्ण करण्याचा माझा संकल्प असेल. या तालुक्यांचा आमदार नव्हे तर आपल्यामधीलच एक सर्वसामान्य कार्यकर्ता या नात्याने मी किनवट-माहुर तालुक्यातील विकास कामाचा अनुशेष पूर्णत्वास नेण्यास कटीबद्ध आहे, असे अभिवचन त्यांनी दिले.




No comments:
Post a Comment