नांदेड : विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून माझा गाव सुंदर गाव हा नाविन्य पूर्ण उपक्रम औरंगाबाद विभागात राबविण्यात येणार असून आज गुरुवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, विभागीय कार्यालयाचे उपायुक्त सुरेश बेथमूथा, समाजकल्याण सभापती रामराव नाईक, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, जिलहा परिषद सदस्या अरुणा कल्याणे, प्रकाशराव भोसीकर, भीमराव कल्याणे, उप विभागीय अधिकारी राजेंद खंदारे, सह आयुक्त वैशाली रसाळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधिर ठोंबरे, तहसिलदार दिनेश झांबले, गट विकास अधिकारी एम.डी. जाधव आदींच्या उपस्थितीत मुदखेड तालुक्यातील मुगट येथे या उपक्रमाचा जिल्हास्तरय शुभारंभ करण्यात आला.
या उपक्रमातंर्गत मुगट येथे वृक्ष लागवड, ग्राम सफाई, बेटी बचाओ-बेटी पढाओ अंतर्गत माझी मुलगी माझा स्वाभिमान म्हणून मुलींच्या नावाच्या पाटया घरावर लावणे, मुलींच्या जन्माचे स्वागत, ओला व सुका कचरा व्यवस्थापनासाठी प्रती कुटूंब दोन डस्टबिन वाटप, कर भरणा केलेल्या ग्रामस्थाना पावतीचे वाटप, किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा माता व कुपोषीत बालकांसाठी देण्यात येणारा सकस आहार व गावस्तरावरील स्वच्छतेसाठी शौचालय बांधकाम, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी माहितीचे प्रदर्शन, रक्तदान शिबीर आदी भरगच्च कार्यक्रम यावेळी घेण्यात आले. प्रांरभी मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थितांचा शॉल व बुके देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन म्हणाले, शाळा व अंगणवाडी समृध्द करण्यासाठी लोकसहभाग वाढविण्यावर भर द्यावा. त्या शाळेतून शिकून पुढे गेलेल्या माझी विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना हातभार लावून हे ऋण फेडावे असे ते म्हणाले. भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठी शोषखड्डे व पाणी पुर्नभरणाचे कार्यक्रम हाती घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर म्हणाल्या, माझा गाव स्वच्छ गाव या मोहिमेत गावातील सर्व लोकांना सोबत घ्या. कही जण कोणत्याही मोहिमेत अडचणी आणतात तरी त्यांना सोडून देवून नका. त्यांना समजून सांगा, त्यांना विनंती करा. सर्वांच्या सोबतीतूनच ही मोहिम पुढे जाईल असे मंगाराणी अंबुलगेकर म्हणाल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर म्हणाल्या, गाव विकासात शिक्षणाला देखील महत्वाचे स्थान असून मुलींना शिक्षणाची संधी मिळाली तर त्या स्व:ताला सिध्द करु शकतात. म्हणून मुलींच्या शिक्षणासाठी पालक व समाजाणे विशेष लक्ष द्यावे. घरावर मुलींच्या व महिलांच्या नावाच्या पाटया लावून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी बोलतांना सुरेश बेथमूथा म्हणाले, गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी स्वच्छता अभियानासारखे कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. आजही ग्रामीम भागातील काही महिला उघडयावर शौचविधीला जातात ही लाजीरवाणी बाब आहे. महिला व गावच्या इज्जतीसाठी स्वाभिमानाने शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करणे आवश्यक आहे. आठवडयातून अर्धातास जरी गावासाठी दिला तर गावे स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही असेही ते म्हणाले. यावेळी भीमराव कल्याणे, समाजकल्याण सभापती रामराव नाईक, कृषी व पशुसंर्वन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांचीही यावेळी भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी कैलास गायकवाड यांनी केले. सुत्रसंचालन ग्राम विकास अधिकारी राजेश्वर भुरे यांनी केले. या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या माजी सभापती शोभाताई मुंगल, उप सभापती आनंदराव गादीलवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी. यू. इंगोले, व्ही.आर. पाटील. एस.व्ही. शिंगणे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माध्यमिक विभागाचे माधव सलगर, कृषी विकास अधिकारी एस.बी. नादरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर, माधव कल्याणे, धाराजी पवार, एकनाथ कल्याणे, संभाजी तुपे, तुकाराम हटकर, वैभव गजे, सोमेश्वर कल्याणे, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक, महिला व गावकरी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.







No comments:
Post a Comment