औरंगाबाद, दि.10, (विमाका) :- राज्यात कोरोनाच्या अटकावाकरिता सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अधिक उत्साहात नव्या जोमात मिशन मोडमध्ये अधिक सावधगिरी बाळगत काम करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केल्या.
व्हीडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून राज्याच्या मुख्य सचिवांनी कोरोना संदर्भात आज मराठवाडा विभागाची आढावा बैठक घेतली. त्यांच्यासमवेत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगर पालिका आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांच्यासह व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मुख्य सचिव श्री.कुंटे म्हणाले की, मराठवाडा विभागात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्याकरिता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची संख्या वाढवावी, कोरोना तपासणीचे प्रमाण वाढवावे जेणे करुन रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल आणि रुग्णवाढीचा दर देखील कमी होईल. या करिता अधिकाधिक दक्षतेची गरज असून यात अतिसंवेदनशील कन्टेंटमेंट झोनवर बारकाईने लक्ष ठेवून नविन नियमावलीप्रमाणे कंन्टेंन्टमेंट झोनची अंमलबजावणी संदर्भात अधिकाऱ्यांनी कठोर पाऊले उचलावीत.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यांनी लसींच्या अतिरिक्त साठ्याची मागणी केल्यास ती देखील केंद्र सरकारकडून पुरवली जाईल. विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या रोज बैठक घेऊन या बैठकीमध्ये कोरोनाबाबतच्या दैनंदिन आढाव्याबरोबरच सुरू असलेल्या उपाययोजना, तपासणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण, या बाबत आढावा घ्यावा. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कामाला लागावे, येणारे आठ ते दहा दिवस अधिक संवेदनशील असणार आहेत त्यामुळे या काळात खूप जास्त काम करावे लागणार असल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे असे निर्देश यावेळी श्री.कुंटे यांनी संबंधितांना दिले.
यावेळी आढावा बैठकीत बोलतांना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले की, डीपीडीसी अंतर्गत 33% निधीची मान्यता मिळाली होती परंतु हा सर्व निधी पायाभूत सुविधांवर खर्च झाला असून तसेच विभागातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये ही डीपीडीसीच्या निधीवरच अवलंबून असल्याने या महाविद्यालयांकडे इतर पर्याय उपलब्ध नाहीत. एकंदरीत आता कोरोनासंदर्भातील उपाययोजना करीता अधिक निधीची गरज भासणार असल्याचे सांगून श्री.केंद्रकर यांनी विभागात कोरोना अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची सविस्तर माहिती यावेळी दिली. तसेच मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या कोरोना उपययोजनांची सविस्तर माहिती दिली.




No comments:
Post a Comment