प्रथम 'थेरीगाथा' नवे आकलन या ग्रंथाचे संपादक देवेंद्रजी उबाळे यांचे अभिनंदन !
आजपर्यत अनेक लेखक लेखिकेंनी थेरीगाथेवर लेखन केले आहे. प्रस्तुत संपादकीय लेखातच देवेंद्रजी याबद्दल भाष्य करतात. सर्वांनीच आपआपल्या विचारातुन भाष्यातुन आपली मते या पुस्तकात मांडली आहेत. अगदी संतवाङमयापर्यत थेरीगाथेतील विचार कसे वेगळे आहेत आणि कसे प्रभावी आहेत ते वेगवेगळ्या उदाहरणातुन सांगितले आहे. असे अनेक मतप्रवाह एकत्र आणण्याचा संकल्प देवेंद्रजींनी अतिशय कुशलतेने मांडला आहे.
संपादकीय लेखात देवेंद्रजींनी मांडलेले काही विचार उल्लेखनीय आहेत. आजपर्यंत बौध्द धम्मातील काही गोष्टींना चुकीच्या पध्दतीने सामोरे आणले गेले. याच गोष्टींवर संपादकीय लेख प्रकाश टाकतो. स्त्रीयांनी भिक्षुणी बनण्यापासुन ते कोणत्याही प्रकारची विषमता. भेदभाव न ठेवता स्त्रीया बौध्द धर्मात थेरी पदापर्यंत पोहचल्या आहेत. बुध्दकालीन भारतीय इतिहास, समाजजीवन या लेखात मांडले आहे. लेखक म्हणतात की, बुध्दकालीन स्त्रीया ह्या काही दु:खमुक्तीसाठी काही गृहत्याग करुन तर काही बुध्दांवरील श्रध्देतुन वा भदन्तांच्या उपदेशातुन भिक्षुणी झाल्या आहेत. येथेच पुन्हा एक वर्गीकरण येते ते म्हणजे काही स्त्रीया राजघराण्यातील तर काही क्षत्रियकुळातील, ब्राम्हण वंशातील, श्रेष्ठीकुळातील, सोनार, दासीकन्या, गणिका म्हणजे प्रांत, वर्ण, आर्थिक स्थिती, गरीब, श्रीमंत अशा अनेक स्तरातुन येणाऱ्या सर्व स्त्रीयांच्या गाथांत दु:खमुक्तीचा समान धागा लेखक दर्शवितात. सर्वच थेरी स्व:ताला 'बुध्दकन्या' मानतात.
येथे लेखक ही जाणीव करुन देतात की, तथागत बुध्द हे स्त्री मुक्तीचे उद्गाते आहेत. म्हणजे ज्यांनी तथगत स्त्री विरोधी आहेत अशी खोडसाळ मांडणी केली त्यांना तथागतांचे विचार समजले नाहीत असेच म्हणावे लागेल. त्याचे स्पष्टिकरण लेखात आलेले आहे. म्हणजे भिक्षुसंघाबाबत जसे काही विशिष्ट प्रसंग झाल्यानंतर नियम बनवित तसेच भिक्षुणीसंघाबाबतही ते करीत असावेत. कोणतेही प्रसंग आधी आणि नंतर नियम असे घडलेले आढळत नाही. बुध्दांनी समानतेचा दर्जा देत प्रत्येकाला स्वतंत्र ओळख करुन दिलेली आढळते. थरीगाथेतील स्त्रीवाद पाहता स्त्रीमुक्तीची पाळेमुळे बुध्दकालीन भिक्षुणी संघात म्हणजे थेरीगाथेत सापडतात हे तंतोतंत पटते.
डॉ. ज्ञानेश्वर पवारांच्या म्हणण्यानुसार अनेक स्त्रीयांमध्ये स्व..नियंत्रण हा स्वभावगुण प्रकर्षाने जाणवतो. तथागतांनी त्यांच्या तत्वज्ञानातुन स्त्रीयांचा स्वत:च्या दु:खाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलुन तो अधिक व्यापक, वास्तविक व तार्किक बनविण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आढळतो.
डॉ. शामल गरुड म्हणतात त्याप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीयांच्या आत्मसन्मानाची लढाई हिंदु कोडबिलाच्या रुपाने सर्वांसमोर आणली. खरे तर स्त्रीयांच्या अनुषंगाने हा टप्पा फार महत्वाचा होता. मात्र मनुवादी पुरूषसत्तेने तो अमान्य केला. रुढी परंपरेच्या बंधणात अडकलेल्या स्त्रीयांना अर्हंत होण्याच्या वाटेवर बोट धरुन तथागतांनी आणले आणि स्त्री मुक्तीची पहिली पाऊलवाट निर्माण करुन दिली.
प्रा. आशालता कांबळे यांच्या लेखात त्या म्हणतात, ८ मार्च हा जागतिक स्त्रीमुक्तिदिन मानला जातो त्याचे सर्व श्रेय पाश्चात्य देशातील स्त्रीवादी चळवळीला दिले जाते. मात्र त्याचवेळी इंग्रजीतील थेरी गाथांमधील स्त्रीमुक्तीच्या जाणिवा हेतुत: दुर्लक्षित केल्या जातात. पुरुषांसारखाच स्त्रीयांनाही मानवी जीवनातीलसर्वोच्च ज्ञान मिळविण्याचा अधिकार आहे, त्या सत्यासाठी आग्रह धरणाऱ्या आहेत. म्हणजेच सत्याग्रह करणारी महाप्रजापती गौतमी ही जगातील पहिली व्यक्ती आहे. म्हणुनच महाप्रजापती गौतमी ही समग्र स्त्रीमुक्ती चळवळीची आद्यश्रोत ठरते.
वयाच्या ७८ व्या वर्षी 'माझा उध्दार करण्यासाठी मी समर्थ आहे' हे प्रत्यक्ष तथागतांना सांगणारी व तथागतांचे 'अत्त दिप भव' हे तत्वज्ञान प्रत्यक्ष आचरणात आणणारी यशोधरा सर्वांची प्रेरणा स्थान आहे.
सुनिल हेतकर म्हणतात, तथागतांनी स्त्रीयांना जे स्वतंत्र अवकाश दिले त्याचा योग्य अन्वयार्थ लावुन स्त्रीयांनी स्वत: चे अस्तित्व, अस्मिता निर्माण केली. बुध्दांनी जी संबोधी प्राप्त केली ती समस्त स्त्री-पुरूषवर्गाला भेदभाव न करता दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बुध्दानुगामी थेरींप्रमाणे स्वत्व आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा प्रत्यय स्त्री-संत परंपरेत आढळत नाही.
सचिन गरुड यांनी थेरीगाथेला भारतीय इतिहासातील स्त्रीमुक्तिचा पहिला अविष्कार म्हटले आहे. अरविंद सुरवाडे यांना आंबेडकरवादी साहित्यिकांचे बौध्द साहित्य वाङमयाकडे दुर्लक्ष झाले असे वाटते. मोतीराम कटारे यांच्या मते थेरीगाथा म्हणजे तथागतांनी सांगितल्याप्रमाणे शांत आणि सत्य या दोन रसांचा सौंदर्याविष्कार! उर्मिला पवार लिहीतात, महाप्रजापती गौतमीने स्त्रीयांना संघात प्रवेश देववुन स्त्री आणि पुरूष या दोघांचे मिळुन विश्व आहे म्हणुन ते वैश्विक असे सत्य समोर आणले आहे.
आज आम्ही स्त्री शिक्षणासाठी जेव्हा सावित्रीबाई फुले यांचे नाव घेतो तेव्हा हा ग्रंथ वाचल्यानंतर आद्य क्रांतिकारी महिला म्हणुन महाप्रजापती गौतमी यानांच वंदावे लागेल.
देवेंद्रजी उबाळे यांचे पुनश्च: अभिनंदन की ज्यांनी आजच्या युगात स्त्री शक्तीचे हे आदर्श अनेक लेखकांच्या साहित्यांसह आमच्यासमोर रेखाटले आहेत.
-हर्षदा तपासे
MA(Marathi), MA(Pali)




No comments:
Post a Comment