विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही : राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आदींशी चर्चा करून परीक्षेसंदर्भात निर्णय घेणार -वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख ; वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, April 12, 2021

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही : राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आदींशी चर्चा करून परीक्षेसंदर्भात निर्णय घेणार -वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख ; वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

 




मुंबई, दि. 12 :- कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही, मात्र विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय  आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग या सर्वांशी चर्चा करून परीक्षा घेण्यासंदर्भात पुढील 72 तासात निर्णय घेऊ, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. अमित देशमुख यांनी आज स्पष्ट केले.


महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक यांच्या वतीने दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विविध वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, सिनेट सदस्य आदींशी संवाद साधला त्यावेळी श्री. देशमुख बोलत होते.  कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, कुलसचिव डॉ. के. डी. चव्हाण यांचेसह मान्यवर आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.


            यावेळी वैष्णवी किराड, आशिष मोहोर आदी विद्यार्थी प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या सध्याच्या स्थितीतील अडचणींची माहिती दिली. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने विविध निर्बंध लागू केले आहेत. अजून हे निर्बंध अधिक कडक करण्याची शक्यता लक्षात घेता, यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास अडचणी उद्भवणार असतील तर त्या अडचणींचा सकारात्मकपणे विचार करू, यापूर्वीच यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून यानंतर पुन्हा त्यांच्याशी चर्चा करून योग्य ती भूमिका घेणार असल्याचेही वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.


            नॅशनल मेडिकल कौन्सिलने अंतिम वर्ष वैद्यकीय शाखेच्या परीक्षा वेळेवरच घेण्याच्या सूचना सर्वच राज्यांना दिल्या आहेत. त्यानुसार त्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे आयोजन होईल, मात्र दुसऱ्या, तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या मागणीसंदर्भात अडचणी पाहून राज्यपाल, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय  आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग या सर्वांशी चर्चा करून परीक्षा घेण्यासंदर्भातील पुढील 72 तासात निर्णय घेणार असल्याचे श्री. देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.


            विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करतानाच कोविड काळात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून चांगले सहकार्य मिळत असल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.


वैद्यकीय महाविद्यालये- रुग्णालयांनी

सेवांचा विस्तार करण्याची आवश्यकता

-अमित देशमुख


 


·       वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील कोविड-१९ विषाणू प्रादुर्भाव आणि उपाययोजनांचा घेतला आढावा


·       रुग्णशय्या, ऑक्सिजनची संख्या वाढविण्यासाठी जे निर्णय घ्यावे लागतील त्यासाठी शासनस्तरावरून सर्व आवश्यक ते सहकार्य करणार


·       सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगरपालिका मुख्याधिकारी, अधिष्ठात्यांशी साधला संवाद


·       रुग्णांची लवकर चाचणी आणि ट्रेसिंगवर लक्ष देण्याच्या सूचना


·       कोविडकाळात बाह्यस्त्रोताद्वारे आवश्यक मनुष्यबळाची भरती करण्याचे निर्देश


·       रेमडेसिवीरच्या वापरात आयसीएमआरच्या प्रोटोकॉलचे पालन करा

मुंबई, दि. 12 - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांनी त्यांच्या सेवांचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे. रुग्णशय्या, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स या साधनसामुग्रीची संख्या वाढविण्यासाठी जे निर्णय घ्यावे लागतील. त्यासाठी शासनस्तरावरून सर्व आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज दिली.


            वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी आज मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगरपालिका मुख्याधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे तसे आयुर्वेद महाविद्यालयांचे अधिष्ठाता या बैठकीला उपस्थित होते.


वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांचा विस्तार करा


कोरोना 19 विषाणूच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट पाहता वैद्यकीय महाविद्यालयाची जी रुग्णालये पूर्णपणे रुग्णांनी व्यापली गेली असतील त्या ठिकाणी संलग्न अशी कोविड केअर सेंटर्स सुरू करण्याची आवश्यकता आहे. रुग्ण व्यवस्थापन करणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न व्हावेत. सौम्य आणि कमी लक्षणे असतील अशा रुग्णांवर उपचारासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिल्या.


 


 


ऑक्सिजनच्या पुरवठ्यात सुलभता आणा


सध्या ऑक्सिजनचे 100 टक्के उत्पादन हे फक्त वैद्यकीय कारणासाठीच आरक्षित ठेवण्यात आले आहे.  त्यामुळे सर्व जिल्ह्यांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने वाहतूकीचे योग्य नियोजन केल्यास ऑक्सिजन पुरवठ्यात सुलभता निर्माण होणार आहे, त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी दिल्या. व्हेंटिलेटरची वाढती मागणी लक्षात घेता केंद्राकडे राज्य शासन मागणी करीत आहे, व्हेंटिलेटरची कमतरता भरून काढण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.


रुग्णांची लवकर चाचणी आणि ट्रेसिंगवर लक्ष देण्याच्या सूचना


            मृत अवस्थेत येणारे कोविड रूग्ण आणि रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत मृत पावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी विहित केलेल्या आदर्श कार्यपद्धती (एसओपी) चे पालन करण्याची आवश्यकता आहे. संसर्ग झाल्यानंतर रुग्ण उशिराने 8 दिवसानंतर रुग्णालयात दाखल झाला तर नंतर तो दगावतो, त्यासाठी अगोदरच चाचणी करण्याची आवश्यकता असून त्यासाठी ट्रेसिंगवर लक्ष देण्याच्या सूचनाही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दिल्या.


कोविडकाळात बाह्यस्त्रोताद्वारे आवश्यक मनुष्यबळाची भरती करण्याचे निर्देश


            कोविडचे रुग्ण वाढत आहेत त्याचा रुग्णालयांवर ताण वाढत असून मनुष्यबळाची कमतरता पाहता हा ताण भरून काढण्यासाठी कोविडकाळात रिक्तपदे बाह्य स्त्रोताद्वारे भरती करण्यात येत्णार असून तशा जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. वैद्यकीय सेवेतून अलिकडेच निवृत्त झालेले डॉक्टर्स, परिचारिका, तंत्रज्ञ यांना तीन महिन्यासाठी कोविड काळात नेमणूक करता येणे शक्य असून त्यासर्व बाबी तपासून कार्यवाही करा, त्यामुळे आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.


आयुर्वेद महाविद्यालयांच्या सुविधांची जिल्हाधिकाऱ्यांना माहिती द्या


            आयुष संचालनालयाच्या शासकीय व अनुदानित आयुर्वेद महाविद्यालयांनी कोविडच्या या लढ्यात सहभागी होण्याची आवश्यकता आहे. या महाविद्यालयांचा उपयोग जिल्हा प्रशासनाने करून घेण्यासाठी तेथील सुविधांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्याच्या सूचनाही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिल्या.


प्राध्यापक, विद्यार्थी हे सर्व हेल्थ वर्कर्स; या सर्वांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन


            ज्या संस्था शासनाची मानके पूर्ण करीत असतील त्यांना लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी करून घ्या. वैद्यकीय शिक्षण संस्था, प्राध्यापक, विद्यार्थी, डॉक्टर्स हे सर्व हेल्थ वर्कर्स असून या सर्वांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन श्री. देशमुख यांनी यावेळी केले. वैद्यकीय शिक्षण विभागाची महाविद्यालये, रुग्णालये यांच्या सुविधा आणि सुरू असलेल्या कामाची माहिती प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना तसेच जिल्हा प्रशासनाला अधिष्ठात्यांनी देण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी केल्या.


रेमडेसिवीरच्या वापरात आयसीएमआरच्या प्रोटोकॉलचे पालन करा


            राज्यात रेमडेसेवीरचा मोठ्या संख्येने पुरवठा सुरू होईल, भारताबाहेर निर्यातबंदी असल्याने त्याचा निश्चितच फायदा होईल, मात्र रेमडेसिवीरचा वापर करताना भारतीय वैद्यकीय संसोधन परिषद (आयसीएमआर) च्या प्रोटोकॉलच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी दिले.


आपत्ती व्यवस्थापन काळात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार;


खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांना कोविड लढ्यात सहभागी करून घ्या


            जी खाजगी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये जिल्हा प्रशासनाला सहकार्य करीत नाहीत त्यांना कोविडच्या लढ्यात सहभागी करून घेण्याचे अधिकार आपत्ती व्यवस्थापन काळात जिल्हाधिकाऱ्यांना आहेत, त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देशही श्री. देशमुख यांनी दिले.


रेमडेसिवीर आणि इतर साधनांच्या माहितीसाठी राज्यस्तरीय डॅशबोर्ड तयार करा


रेमडेसिवीर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स आदी अत्यावश्यक साधन सामुग्रीच्या माहितीसाठी राज्याचा एक स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्यात यावा, जेणेकरून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना संपूर्ण माहिती या डॅशबोर्डच्या माध्यमातून मिळेल आणि त्यानुसार नियोजन करण्यात सुलभता निर्माण होणार आहे, त्यादृष्टीने डॅशबोर्ड तयार करण्याची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचनाही श्री. देशमुख यांनी यावेळी दिल्या.


            ज्या जिल्ह्यांमध्ये तंत्रज्ञ, एमबीबीएस डॉक्टर्स किंवा इतर मनुष्यबळ बाह्यस्त्रोतांद्वारे भरण्याची मागणी होत आहे, त्या सर्व जिल्ह्यांना शासनस्तरावरून स्वयंस्पष्ट सूचना द्या, काही अडचणी उद्भवल्यास अधिष्ठात्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कार्यवाही करण्याच्या सूचनाही वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी दिल्या.


            यावेळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि अधिष्ठात्यांशी चर्चा करून विभाग तसेच जिल्ह्यातील कोविड स्थिती, अडचणी आणि उपाययोजनांची स्थिती वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी जाणून घेतली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News