"न्यायमहर्षी प्रकाश पाटील मांडवीकर यांचे निधन"
गोरबंजारा समाजाचे आद्य समाज सुधारक तथा साहित्यिक बळीरामजी पाटील मांडवीकर यांच्या गड किल्याचा शेवटचा बुरूज आज प्रकाशराव पाटलांच्या रुपाने ढासळला.
प्रकाशराव पाटील हे बळीराम पाटलांच्या पंचरत्नापैकी तृतीय रत्न होते. जोडीला तीन भगिनींचे जीवापाड प्रेम. माता इंदिराबाई खरोखर अष्टपुत्र भवंतूच होती. तत्कालीन समाज व्यवस्थेत अष्टपुत्राला व त्या जननीला मौलिक स्थान होते.
जहागीरदार, वतनदार परिवारात जन्म घेऊन सुद्धा प्रकाशराव पाटील कधी चैनी, विलासी जीवन जगले नाहीत. सर्व सुख सुविधा पायाशी लोळण घेत असतांना देखील ते गोर गरीब, सर्व सामन्यात राहणेच पसंत करीत असत.
थोरले बंधु स्व. खासदार उत्तमरावजी राठोड राजकारणात उडी घेतल्या नंतर गावगाड्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. तब्बल पंचवीस वर्ष त्यांनी सरपंचकी केली. सेवा सहकारी सोसायटीत अतुलनीय कार्य केले.
रंजल्या गांजल्याची सेवा ही मांडवी घराण्याच्या नसा नसात व रोम रोमात हिरामण पाटील, बळीराम पाटलापासून ते आज प्रकाशराव पाटला पर्यंत भिनलेली होती. ही जनसेवा त्यांनी न्याय, निवाडा, नितीधर्म, सदाचार, सामोपचार, लोकाचार या रुपाने अखंडित पणे चालविली.
गोरबंजारा समाजात संपूर्ण भारतभर मांडवी घराण्याची ख्याती आहे. न्यायप्रिय, वात्सल्यप्रिय घराणे म्हणून या घराण्याची ओळख आहे. प्रकाशराव पाटलांनी शेवटच्या मरणासन्न अवस्थेपर्यंत गोर गरीब, आदिवासी, राना वनातील दिन दुबळ्यांची न्याय, नित्यकर्म सेवा केली.
समाजातील लोकांवर अन्याय, अत्याचार होणार नाही याची इत्थंभूत काळजी त्यांनी घेतली. आज या सामान्य जनतेचा कनवाळू वाली त्यांच्या रुपाने हरवला. पदरी बाळगलेल्या रुपया, पैशांची पदरमोड करून त्यांनी अनेक लोकांचे संसार थाटले. प्रसंगी वाघासारखी गर्जना करून हुल्लडबाजी करणाऱ्यांना वडीलकींने सल्ला देऊन अखेर पर्यंत न्यायाची बाजू आजच्या मोबाईल, संगणक युगापर्यंत चालविणारे ते खऱ्याअर्थाने युगप्रवर्तक होते.
वय वर्ष 87 पूर्ण झाले तरी अंतर्मनातील ज्ञानचक्षू अतिशय तल्लख होते. सर्वोदय वसतीगृह ,किनवट शिक्षण संस्थेचे संचालक इत्यादी शिक्षण क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य त्यांनी आजतागायत केले.
शेवटपर्यंत खणखर, मोडेल पण वाकणार नाही अशा शाही रूबाबात ते जगले. त्यांचे सत्य, स्पष्ट, सुद्धाचरण राहणे, वागणे ,बोलणे आजच्या नवीन पिढीला फार काही शिकवून जाते. अनेक बोधामृत बोल त्यांचे ध्यानी मनी घेण्यासारखे आहेत.
असा न्यायप्रिय,न्यायमहर्षी आज दि. 29/04/2021 गुरुवार रोजी काळाच्या पडद्याआड गेला. एक सत्यांशी वर्षाचा प्रकाशपर्व त्यांच्या रुपाने काळोखात विलिन झाला. त्यांना अनंतात चिर शांती मिळो.
अशी मी व माझ्या संपूर्ण परिवाराकडून श्रद्धापूर्वक श्रद्धांजली अर्पित करतो !
-डाॅ. वसंत भा. राठोड, मांडवी किनवट.
--------------------------------------------------
लोकनेते तथा लोक अदालतचे प्रणेते प्रकाश पाटील मांडवीकर यांची गुरुवार (दि. 29 एप्रिल) रोजी दुपारी अडीचच्या दरम्यान नांदेड येथील खाजगी रुग्णालयात वृध्दपकाळाने प्राणज्योत मावळली. लोक अदालतच्या प्रणेत्याच्या जाण्याने किनवट, माहूर तालुकाच नव्हे तर महाराष्ट्रातील चाहत्यामध्ये विचारांची फारमोठी हानी झाली आहे. मृत्यू एकमेव सत्य आहे आणि शरीर नश्वर आहे. हे माहित असूनही आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्यामुळे दुःख होते. त्यांच्या पावन स्मृतिंना भावपूर्ण श्रद्धांजली.
-मोहन जाधव,पळशीकर
मुख्याध्यापक, जिपहा,किनवट




No comments:
Post a Comment