शेषराव पवार : शाळेत झाडांचं अरण्य उभारणारा मनस्वी माणूस काळाच्या पडद्याआड
शेषराव पवार मनस्वी माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. कोविड काळात एकेक आप्त, मित्र गमावत असताना शेषराव पवार एका दुर्दैवी अपघातात गेल्याची वार्ता समजली. त्याच्या जाण्याने शिक्षण जगतासह ज्याच्या ज्याच्याशी त्याची नाळ जोडली होती ते सगळेच या घटनेने विषण्ण झाले आहेत .
अलीकडे व्हाट्सअपचा ग्रुप उघडला ही भावपूर्ण श्रद्धांजली अशाच आशयाचे मजकूर फिरत राहताना दिसतात .म्हणून मी खूप कमी व्हाट्सअप पाहत होतो. आज माझ्या भावाचा राजाचा मला फोन आला आणि अण्णा शेषराव पवार यांचा अपघात झाला आहे अशा आशयाची पोस्ट फिरत आहे असं म्हणाला.
मी त्याला मला पर्सनली टाकायला सांगितलं. उमद्या शेषरावचं कलेवर पाहताना चक्रावून गेलो. हे सगळं पाहताना मन सुन्न झालं.
त्याच्या अनेक गोड आठवणी आहेत. शिवा कांबळे सिडकोला राहत होते. तेव्हा मी त्यांच्याकडे जात असे. त्यांच्या शेजारी शेषराव पवार राहात होता. राकट,दणकट गडी, आवाजही तसाच ओजस्वी. एखादं काम हाती घेतलं तर ते फत्ते केल्याशिवाय झोपणार नाही असा त्याचा स्वभाव. त्याच्या गुणांची ओळख झाली आणि तिथून मैत्री वाढली. गेली पंचवीस वर्षे मी शेषराव पवार यांना पाहत आलो आहे.तरुण भारतचे पत्रकार ,शिक्षक आणि सच्चा कार्यकर्ता या रूपात त्याला पाहताना त्याच्या प्रचंड आत्मविश्वासपूर्ण कामाने भारावून गेलो .साधा, सरळ मनाचा आणि घेतलेला वसा पूर्ण करणारा माणूस म्हणून त्याचं मोल अधिक आहे.
मुलीच्या परीक्षेसाठी एकदा तिला सोडायला मी विष्णुपुरीला गेलो होतो. सुट्टीचा दिवस होता .कॉलेजच्या कोपऱ्यावर मी थांबलो असताना एक टेम्पो तिथे थांबला .त्यातून शेषराव उतरला .टेम्पोमध्ये खचाखच झाडांची रोपे भरली होती आणि त्या रोपांच्यामधून त्यांनी खाली उडी मारली. अंग चिखलाने भरलं होतं. हा काय विचित्र प्रकार ,असं त्यावेळी मला वाटलं. मी त्याला म्हणालो
"हे काय शेषरावजी, वेगळेच काहीतरी".
आज सुट्टी आहे आणि सुट्टीत ही झाडं शाळेत लावायची आहेत असे त्यांनी सांगितले.
झाडांची मोठे रोपे घेऊन हा माणूस शाळेत लावण्यासाठी जात होता.किती विलक्षण बांधीलकी त्याची. शेषराव पवारची ज्या शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती झाली ती शाळा झाडा वेलींनी बहरली. सर्वांगसुंदर झाली. बाग फुलली. मुलांची गुणवत्ता वाढली. पटसंख्या वाढली. गाव आणि शाळा जोडून एक सेतू तयार करणारा असा हा मनस्वी शिक्षक होता .
सकाळी लवकर जाऊन गावात फिरणे ,घरी जाऊन पालकांना भेटणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे अशा संवादी भूमिकेत जगणारा हा अवलिया म्हणून मोठा आहे.
अलीकडच्या काळात त्याच्या माझ्या भेटी वाढल्या होत्या. माझ्या बाबांना अटॅक आला होता. त्या काळात त्याच्या 'वैताग' या कादंबरीचं काम चालू होतं. मला प्रस्तावना द्यायची होती. हॉस्पिटलला घेऊन तासन्तास बोलत होतो. मला त्याने त्यावेळी मानसिक आधार दिला. काहीही करू शकतो हा दुर्दम्य आशावाद त्याच्या ठायी होता. लेखनाचॆ अंग असल्यामुळे दैनिकाचा बातमीदार म्हणून त्यानेे काम केले. 'किंमत माणसाची',' वैताग 'ही कादंबरी ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण पुस्तके आहेत. कुणी पट्टीचा लेखकच असणे गरजेचे नाही आपले अनुभव, आपलं जीवन, आपलं जग हे स्वतंत्र असतं त्यातले सगळ्यांचे अनुभव वेगळे असतात. तसंच वेगळेपण शेषरावच्या लेखणी मध्ये होतं.समाजातील दोषांचं दिग्दर्शन त्यांच्या पुस्तकात आढळतं. गावगाड्यातील कथानक हळुवारपणे त्याच्या पुस्तकातून प्रकट होताना दिसतं. वैताग या कादंबरीची प्रस्तावना लिहिताना शेषराव पवार हा मनस्वी माणूस उलगडून दाखवत आला.
मित्र शेषराव
कसलाही फोन न करता सरळ ऑफिसला यायचा.
सर तुम्हाला भेटलं की आनंद होतो हो असं म्हणायचा. काही माणसं, काही स्थळ पाहिल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं त्यातलाच शेषराव.तो आला की बाकी सगळं बाजूला सारून मी गप्पा मारायचो. त्याचे उपक्रम समजून घ्यायचो.
तो स्वतःच एक बोलकं पुस्तक होता.ज्या गावात तो गेला तिथे त्याने नंदनवन फुलवलं. शाळेत शिक्षक म्हणून काम करताना प्रत्येक मुलांच्या कौटुंबिक भावविश्वात तो रुतायचा .कुणाची कुठली समस्या असेल तर अंगावर घेऊन ती सोडवायचा.खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे .कंधारला अनिता बसवंते या मुलीवर बलात्कार व बलात्कारानंतर खून झाला होता. त्यावेळी खूप मोठे आंदोलन कंधारमध्ये पेटलं होतं. त्या आंदोलनाच्या अग्रभागी शेषराव होता. अत्यंत तडफेनं, संघर्षानं,अत्यंत जाणिवेनं काम करणारा हा कार्यकर्ता म्हणून मला खूप मनस्वी नि आपला वाटत आला.
मध्यंतरी त्याची किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरी येथे बदली झाली. सार्वत्रिक बदल्यांमध्ये अनेकांना दूर गावी जावं लागलं. किनवटमध्ये पोस्टीॆग मिळाली म्हणून सुरुवातीला तो नाराज झाला .कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि अनेक गोष्टींमुळे लांब जाणं अवघड जात होतं. परंतु एकदा तिथे तो गेला आणि खूप रमला. शाळेच्या बाजूला असलेलं गायरान महसूलच्या मदतीने शाळेला जोडून घेतलं. मोठे कुंपण केलं. गेट केलं. शाळेची पटसंख्या वाढवली. शाळेत भरपूर झाडे लावली आणि सबंध शाळा एक पर्यटन स्थळ केली. जादुई माणूस म्हणून मला शेषराव पवार सतत आदरणीय वाटत आला आहे .
माझी एक अत्यंत खासगी आठवण आहे. मला पाईल्सचा खूप त्रास होता.एका भेटीत मला पाईल्सचा त्रास आहे असॆ मी त्याला म्हणालो.ते दिवस पावसाळ्याचे होते. शेषराव मला म्हणाला सर तुम्हाला लगेच मी औषध आणून देतो आणि शेषराव लगेच बाहेर गेला आणि अर्ध्या तासाच्या अंतराने परतला. हातात कवठाची दोन फळे होती. म्हणाला या फळांची चटणी करून खा किंवा तसेच खा. तुमच्या पाइल्सचा त्रास दूर होईल.
मी म्हटले" शेषरावजी कुठून पैदा केले."
" जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये झाड आहे तिथे मी झाडावर चढलो आणि तोडून आणले".
त्याच्या या प्रेमळ वागण्याने मी शहारून गेलो. कुठलाही संभावितपणा नाही.कसलं दूरपण नाही. एका अत्यंत साध्या, सच्चल माणसाचे रूप मला त्यावेळी दिसले. मला आज ती गोष्ट आठवली.कोण मी, कोण तो.पण असे ऋणानुबंध निर्माण करणारा शेषराव आज मनात दाटला आहे .त्याच्या जाण्याने एक प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हे अवकाश कधी भरून निघत नसतं .काळ पुढे सरकत जातो. आपणही पुढे जात राहतो परंतु कालौघात हा हरवलेला शेषराव मनात मुरून राहील..
निखळ मनाचा ,प्रत्येकाच्या जाणिवेत रममाण होणारा ,प्रत्येकाची समस्या आपली आहे ही जाणीव ठेवून काम करणारा हा अवलिया माणूस एका अपघातात अचानक जावा हे धक्कादायक नि वेदनादायी आहे.
मित्रा,
तुला श्रद्धांजली अर्पण करून सुटका कशी करून घ्यावी रे.
डॉ.विलास ढवळे,नांदेड.
*ढाण्या वाघ हरवला.*
पांगरी (कें.भिसी)ता.किनवट येथे शेषेराव पवार सर बहुधा२०१७-१८मध्ये बदलून आले...
धिप्पाड शरीरयष्टी,सहा फूट उंची,करारी मिशा,कपाळाला आणखी भारदस्त बनवणारं कुंकू,जरब बसवणाऱ्या PSI ला शोभेल असा पहाडी आवाज, निश्चयी व भेदक नजर,बाहेरून नारळासारखा कठोर वाटणारा पण मनानं हळवा असा दिलदार व्यक्ती....
पूर्वी ६०-७०%मुलांची उपस्थिती रहायची... त्यांनी १००%उपस्थितीचा हट्ट धरला... जे पोरं शाळेत आले नाहीत त्यांच्या घरापुढे सर व मुलं ढोल वाजवायचे....एखाद्या दारुड्यानं भांडलं तर सरळ पोलीस स्टेशनला तक्रार करतो म्हणायचे...पोरगं शाळेत धाडलं नाही तरी मायबापाविरोधात केस करतो म्हणायचे... आवाज एवढा चढवायचे की समोरच्याची पाचावर धारण बसायची...पोरगं बीमार असलं तरच घरी रहाव व तेही घरच्यांनी परवानगी घेवाव,तेव्हाच हे शक्य व्हायचं...पालकांची शाळेत यायची हिंमत नसायची...
एकदा १-२दारुड्यांनी शाळेत येऊन धिंगाणा केल्याचे सरांना कळाले. झाले,सरांनी पोलीसची गाडी इस्लापूरहून बोलावून घेतली. तीमध्ये त्या दारुड्यांना टाकलं.. पोलिसांनी सुंदरीचा प्रसाद दारुड्यांना इस्लापूरला पो.स्टे.मध्ये नेऊन दिला...त्यांच्या बायका लई गयावया करू लागल्याने सरांनी दारुड्यांना सोडण्यास सांगितले...तेव्हापासून शाळेकडे ढुंकूनही पाहण्याची कुणाची हिंमत नव्हती...
गडी शिकवायलाही वाघ होता... ४थीच्या पोरांना ५वी चं गणित येवाव,इतकी भारी तयारी.. पाढे आडवेतिडवे कसेही विचारावे,सर्वांनाच पाठ...वाचनातही मुलं चांगली. केव्हाही जा,१००%मुलं हजर असायची...
शाळेची जागा नावची नव्हती. नमुना नं.८ नव्हता. गावचे ८-१० शेणकचऱ्याचे उकंडे शाळेच्या मैदानात होते...'हटवता की पोलीस केस करू?' या एकाच प्रश्नावर सर्व उकंडे हटले... शाळेच्या आजूबाजूने ग्रा.पं.ची रिकामी जागा भरपूर होती...शाळेला लागेल एवढी मैदानासह जागा ताब्यात घेऊन ग्रामपंचायतला नोंदवून प्रमाणपत्र घेतले....
जागा ताब्यात आली.तिला कुंपण हवं... केला ग्रामसेवकांना फोन- 'आमच्या शाळेला आतापर्यंत काय दिलं तुम्ही?आता आम्हांला कुंपण पाहिजे. फाटक पाहिजे... तसेच स्वच्छता संकुल पाहिजे!तुमच्यानं व्हते की करू वरी फोन?'...एव्हाना त्यांचा गावात दबदबा निर्माण झाला होता... ती खबर ग्रामसेवकांना व सरपंचांना होती.त्यांनी एक महिन्यात सर्व काम पूर्ण केले..शाळेला पाण्याचा नळंही दिला...
सर,मूळचेच वृक्षप्रेमी.अगोदरच 'वनश्री' पुरस्कार भेटलेला... नांदेडहून २५००रु. प्रवासभाडे स्वतः देऊन १५० मोठी ३-४फूट उंचीची रोपे नगीनाघाट गुरुद्वाऱ्यातून मोफत आणली.लावली... प्रत्येक मुलाला झाडे वाटून दिली. मुलांनी घरून १लीटरची बाटली भरून आणायची व झाडांना टाकायची... रेल्वेने येताना डब्यात पडलेल्या रिकाम्या बाटल्या सर थैलीत गोळा करायचे व शाळेत आणून मुलांना द्यायचे...झाडांना रिकाम्या बूड कापलेल्या बाटल्या बांधून ठिबकद्वारे पाणी पुरवठा करायचे..एका वर्षात काही झाडे फुलली...एखाद्या ऋषीमुनींच्या सुंदर आश्रमात गेल्याचा भास शाळाप्रवेशावेळी व्हायचा.सुट्टी मध्ये रोजगार लावून झाडांना पाणी टाकून घ्यायचे...परसबागेत वांगी,वडवांगी,टमाटे, भोपळे,कद्दू,मिरच्या इ.भरपूर असायचे...
नंदीग्राम रेल्वे सकाळी ५.१५ वा.नांदेडहून आदिलाबादकडे निघायची. सरही याच गाडीने इस्लापूरला जायचे... इतर सहकाऱ्यांप्रमाणे रुमाल,मफलर,पिशवी टाकून जागा धरायचे.स्वतःला व्यवस्थित लांब झोपण्याजोगी जागा भेटली की,उरलेल्या जागा मित्रांना द्यायचे...गाडी निघाल्यावर डब्यात कुणी गप्पा मारू लागले किंवा फोनवर बोलू लागले की ते मोठ्याने ओरडून त्यांना गप्प करायचे... २तास निवांत झोपण्यासाठी मग इच्छुक त्यांच्या डब्यात शिरायचे...याउलट दुपारनंतरच्या नांदेडच्या उलट प्रवासात मात्र काहीजण त्यांना टाळायचे... कारण त्यांच्या मोठमोठ्या आवाजातील गप्पा ऐकाव्या लागायच्या.चुकून प्रशासनाचं नाव निघालं की त्यांचा पारा चढायचा...बदलीत अन्याय झाल्याची त्यांची भावना होती....कधी बोलण्याच्या भरात 'आमच्यावर कायमच कसा अन्याय होतो,झाला' हेही यायचं.कुणी डिवचल्यानं संतापले की ठेवणीतले 'अवघड शब्द'ही बाहेर पडायचे...
त्यांचा निर्मळपणा काही जणांना कळायचा नाही कारण ते बाह्यरंगावरून सरांचे मूल्यमापन करायचे..
सरळसोट रांगडा माणूस. मनात कसलाही आडपडदा नाही. झाडे आणि मुले यांच्याबद्दल अतीव करुणा,अतिशय आपुलकी...कुणाचं कधी वाईट करावं,ही भावना नाही.अन्याय करणाऱ्याविरुध्द पोटतिडकीने बोलायचे-मात्र मनात कपटभावना नसायची...मुअबैठका वा केंद्रसंमेलनात अधिकाऱ्यांची फिरकी साभिनय रागावलेल्या आवाजात घ्यायचे,काही खुसपट काढायचे...मात्र हे तितक्यापुरतं तितकंच असायचं...मनात पाप नसायचं.द्वेषभावना नसायची...कुठल्याही बैठकीत सर्वांसमोर अभिव्यक्त व्हायला त्यांना आवडायचं आणि ती संधी मिळाली नाही की असा थोडासा त्रागा, लक्ष वेधण्यासाठी व्हायचा... हे काहींना लक्षात यायचं नाही...
अत्यंत कष्टातून शिकून पुढे आलेले... जातिव्यवस्थेचे चटके सोसलेले... ती वेदना अधूनमधून प्रखरतेने तिखटपणे व्यक्त व्हायची...लढाऊ,झुंजार व्यक्तिमत्त्व... यापूर्वीच्या शाळेलाही अती संघर्षातून पुढे आणले...भौतिक व गुणवत्तेचा विकास केला...पांगरी शाळेतही गुणवत्ताविकासात जाधव सरांनी त्यांना समर्थ साथ दिली...शिष्यवृत्ती अभ्यास,कोऱ्या नकाशात नावे ठेवणे,सांकेतिक भाषा, लेझीम इ.उपक्रम ते घ्यायचे... मनसळच्या सांकेतिक भाषेतून सादरीकरणासाठी लग्नांच्या 'गोंधळ'कार्यक्रमासाठी एका मुलाला ३००रु. रोजगार मिळायला लागला, याचा त्यांना सार्थ अभिमान होता...
मुलांना नाते चिकटवून मिस्किलपणा व आपलेपणा निर्माण करण्याचे त्यांचे एक तंत्र होते... भेटीदरम्यान 'ही मही माय व्हय!', 'ही मही सासू व्हय', 'हा मव्हा जावई/सासरा व्हय,' 'ही मही मावशी/सून व्हय!' असे सांगायचे तेव्हा मुलांच्या व त्यांच्या नजरेत एक अलौकिक चमक दिसायची....
पोलिसांसोबत क्राईम रिपोर्टर म्हणूनही काही काळ त्यांनी लिखाण केलेलं...२वर्षांपूर्वी *वैताग* नावाचं पुस्तक प्रकाशन मा. जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड यांच्या बैठक सभागृहात मा.खा.हेमंत पाटील यांच्या हस्ते झालं...'जे पोटात तेच ओठात.जे ओठात तेच पुस्तकात.'असंच त्यांचं लिखाण रोखठोक व साहित्यिक गुण असणारं आहे...त्यांचं आयुष्य हेच अखंड पुस्तक आहे...आपल्या पुस्तकांनी ते मराठी साहित्यविश्वात कायमच अमर राहणार आहेत....
पांगरीहून विषयशिक्षकपदी बढती स्वीकारून ते मांजरम हायस्कूलला गेले... त्यांच्या बदलीने समस्त पांगरी गावकरी,विद्यार्थी,सहकारी अक्षरशः ढसाढसा रडले.... हायस्कूलमध्ये मोठ्या पसाऱ्यात बहुतेक ते रमले नाहीत...पांगरीची आठवण काढायचे...पुन्हा पांगरीलाच बदलून येतो म्हणायचे...
पांगरीला ते वाघ होऊन राहिले... मात्र कुणावरही अन्याय त्यांनी केला नाही,होऊ दिला नाही...
असा हा ढाण्या वाघ आज अपघातामुळे अनंताच्या प्रवासाला गेल्याची बातमी वाचली अन् काळजात धस्स झालं....
....वनश्री शेषेराव पवारांना मानाचा मुजरा!!!
शब्दांकन : सूर्यकांत बाच्छे,
शिक्षण विस्तार अधिकारी,
इस्लापूर (किनवट )




No comments:
Post a Comment