नांदेड (जिमाका) दि. 2:- सुमारे 33 वर्षांपुर्वीचा काळ. आजच्या एवढी ना प्रगत माध्यमे ना हाताच्या एका बोटाने वाटेल त्या पिक्सलमध्ये फोटो घ्यायची सोय. शासनाच्या योजनांची माहिती ग्रामीण भागात खेड्या-पाड्यात पोहचावी यासाठी तेंव्हाच्या प्रसिध्दी खात्यात असलेल्या चित्रपट शाखेद्वारे शासकीय योजना व एखाद्या चित्रपटाची रिल सोबत घेवून गावो-गाव हे लघुपट दाखवायचे. रात्री उशिर झाल्यामुळे मुक्काम हा ज्या-त्या गावातच ठरलेला. नांदेड जिल्ह्यातील अशी एकही वेश नसेल की जेथे आपली सेवा बजावण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील बालनरसय्या अंगली हे गेले नसतील !
चित्रपट शाखेच्या कामाबरोबर शासकीय दौऱ्याच्या बातम्यांसोबत त्या काळी फोटोची इमेज ब्लॉकवर घेवून ते ब्लॉक वृत्तपत्रांच्या कार्यालयाला द्यावे लागत. एका बाजूला ब्लॅक ॲन्ड व्हाईट फोटो तात्काळ वितरणासाठी कार्यालयातच एक फोटो धुण्याची लॅब (डार्करुम) असायची. बालनरसय्याचे काम हे छायाचित्र अधिकाधिक चांगले यावे याची खबरदारी घेणे व सहाय्य करणे. त्याचे पदच अंधार कोठडी सहाय्यक ! हे फोटो पाण्यात भिजून डेव्हलप केल्यानंतर त्याला ऊन पावसापासून वाचवत अर्थात भिजू न देता वृत्तपत्रांच्या प्रत्येक कचेरीत बातमी पोहचविण्याची जबाबदारी ही त्या काळी बालनरसय्या अंगली यांनी कोणाचीही तक्रार न येवू देता पार पाडली.
कालच्या 30 एप्रिलला नियतवयोमानानुसार ते निवृत्त झाले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या सेवेचा गौरव करून यथोचित सत्कार केला.
कोरोनाच्या या काळात समारंभ न करता सहज त्यांना बोलते केले. 30 वर्षाचा काळ आणि या काळातील आलेले अनेक आव्हाने सांगता-सांगता ते भावूक झाले. ज्या जागेवर बसून आजवर जी सेवा बजावली त्या जागेकडे पाहत - पाहत ते बोलते झाले.
‘साहेब आजवर नांदेडचे हे असले ऊन खुप अंगावर घेतले. पाऊसही खुप अंगावर घेतला. असंख्य वेळी मी ओला झालो पण बातमीला आजवर वादळ वाऱ्यात भिजू न देता ती प्रेसच्या हवाली केली.' बातमीलाही पावित्र्य असते, बातमी ही निष्कलंक असते हे सुत्रच जणू त्यांनी पुढे ठेवले.





No comments:
Post a Comment