खा. राजीव सातव यांचे अकाली निधन : नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, May 16, 2021

खा. राजीव सातव यांचे अकाली निधन : नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले

खा. राजीव सातव यांचे अकाली निधन :  नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले

         आमचे सहकारी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा . राजीव सातव यांचे अकाली निधन अतिशय वेदनादायी असून , नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले , असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे . खा . सातव यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की , जिल्हा पातळीपासून राजकीय प्रवास सुरू करून विलक्षण जिद्द व कर्तबगारीच्या बळावर अतिशय कमी वेळेत राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करणारे खा . राजीव सातव यांच्याबद्दल संपूर्ण देशात कुतूहल होते . महाराष्ट्रासाठी ते एक अभिमान होते . पुढील काळात देश व काँग्रेस पक्षासाठी त्यांच्याकडून मोठे योगदान अपेक्षित केले जात होते .

         खा . राजीव सातव यांचे निधन काँग्रेस पक्षासाठी मोठी हानी आहे . विशेषतः महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे . संपूर्ण देशातील त्यांचा मित्र परिवार आणि चाहत्यांच्या मनात त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील . त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व सातव कुटुंबियाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो , अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो .

-अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री



 एक तारा निखळला, एक दिवा विझला... क्रूर नियतीने एक प्रतिभाशाली नेतृत्व हिरावून नेले.

श्री राजीव सातव यांच्या अकाली निधनाने काँग्रेसचे तत्त्व सार्वजनिक जीवनात रुजवणारे, संवेदनशील, विवेकी, नम्र व तरुण नेतृत्व काँग्रेस पक्षाने व देशाने गमावले आहे.सळसळत्या उत्साहाचा झरा आज थांबला आहे. 

        आमदार, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष , लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा जिल्हा पातळी ते राष्ट्रीय पातळीपर्यंतचा त्यांचा अत्यंत कमी वयातील झंझावाती राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. भावी काळात कॉंग्रेससाठी व देशासाठी त्यांच्याकडून मोठे योगदान अपेक्षित होते. 

         त्यांच्या कुटुंबीयांसोबतच महाराष्ट्राची व देशाची अपरिमित हानी झाली आहे. माझी जी वैयक्तिक हानी झाली आहे ती न भरून येणारी आहे. राजीवजी आपणांस श्रद्धांजली वाहण्याची दुर्दैवी वेळ माझ्यावर येईल, असे वाटले नव्हते. माझा  भाऊ, मित्र, सहकारी, मार्गदर्शक काळाने हिरावून नेला.

      

        ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना या अतीव दुःखातून बाहेर येण्याची शक्ती देवो!

-प्रा. वर्षा गायकवाड, शिक्षण मंत्री, महाराष्ट्र



असा नेता होणे नाही - खासदार हेमंत पाटील 

 हिंगोली जिल्ह्याचे नाव अत्यंत कमी वयात राष्ट्रीय पातळीवर नेऊन उंचवणारे तरुण तडफदार नेतृत्व राज्यसभेचे खासदार ऍड.राजीवजी सातव यांच्या निधनामुळे हिंगोली जिल्हा आणि महाराष्ट्राचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे. वास्तविक पाहता हे त्यांचे जाण्याचे वय नव्हते. त्यांच्या जाण्यामुळे देशातील, राज्यातील युवकांची  आशा उंचवणरा नेता राज्याला गमवावा लागला ही खूपच दुःखद घटना आहे. पंचायत समिती सदस्य ,जिल्हा परिषद सदस्य,आमदार, खासदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी विविध  पदे त्यांनी भूषवून जनतेची सेवा केली आहे.त्यांचे जाणे मनाला चटका लावून गेले.त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती प्रदान करो.

जनसामान्यांच्या मनात त्यांनी निर्माण केलेले स्थान सदैव अढळ  राहील.खासदार राजीवजी सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

-खासदार हेमंत पाटील



माणसं खूप हिरावून घेतली 'कोरोना'नं. पण, आज या नराधम विषाणूनं एक स्वप्न हिरावून घेतलं : राजीव सातव! 


             भयंकराच्या वावटळीत सापडलेल्या राजकारण नावाच्या महासागरात राजीवनं आपलं जहाज उतरवलं, तेव्हा ते अनपेक्षित होतं. कारण, राजकारण करण्यासाठी लागणा-या प्रस्थापित पात्रता राजीवकडं नव्हत्या. किंबहुना राजकारणाचा 'किडा' वळवळावा, अशी त्यांची प्रकृती नव्हती. घरात राजकारणाचा वारसा असला तरी 'मंत्र्यांचा पोरगा' अशा थाटात राजीव कधीच वाढलेला नव्हता. जातीपातीच्या व्होटबॅंकेचा आधार त्याने कधी घेतला नव्हता. 


या असल्या भयंकरातही आपण उभं असलं पाहिजे, म्हणून ठरवून जणू राजीव राजकारणात आले. अगदी अल्पावधीत देशाच्या राजकारणात महत्त्वाचे झाले. सरंजामी सत्ताधीनतेत वाया गेलेल्या कॉंग्रेसी नेत्यांच्या गर्दीत राजीवचे वेगळेपण अगदीच उठून दिसावे, असे होते. अभ्यासाशिवाय प्रकट न होणारा आणि एरव्ही झाकूनच असणारा राजीव झपाटल्यासारखं काम करत होता. आणि, सत्तास्थानापेक्षाही वेगळ्याच प्रयोजनाने ही वाट चालत होता. 


सोपी नव्हती ही वाट. 

देशाच्या राजकारणात राजीव महत्त्वाचे नेते ठरले, तेव्हा कॉंग्रेसची पार वाताहत झालेली होती. देशाच्या अधिष्ठानावर हल्ला होत होता. कॉंग्रेसच्या भल्याभल्या नेत्यांनी कच खाल्लेली होती. अनेकजण कॉंग्रेस सोडून जात होते. जे आहेत, ते आत्मविश्वास गमावून बसले होते. अशावेळी राहुल गांधी एकहाती हा मूल्यात्मक लढा उभा करत होते. सगळ्या आपत्तींना समर्थपणे तोंड देत होते. राहुलच्या या लढाईतले राजीव हे महत्त्वाचे सेनापती होते. हा संघर्ष काय आहे, याचे भान जेवढे राहुलला होते, तेवढेच भान राजीव यांना होते. म्हणूनच राहुल- राजीव अशी 'केमिस्ट्री' तयार झाली होती. त्याचे महाराष्ट्रातल्या कॉंग्रेसी नेत्यांना थोडे अप्रूप होते आणि खूप सारी असूयाही. 


विजय वा पराभव होत राहातील. एखाद्या पराभवाने फरक पडत नाही. पण, मूल्ये म्हणून आपल्याला पेरण्याचे काम करायचे आहे, याची नीट समज राजीव यांना होती. एरव्ही मेणाहूनि मऊ असणारे राजीव गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले, तेव्हा त्यांचे वज्राहून कठोर रूप देशाने पाहिले. अवघा देश जिंकलेल्या मोदी-शहांना राजीव यांनी घाम फोडला. त्या निवडणुकीचे चेहरे वेगळे होते, पण गुजरातची झुंज दिली, ती राजीव सातव यांनीच. बाळासाहेब थोरात तेव्हा त्यांच्या मदतीला होते. ही निवडणूक कॉंग्रेसने जवळजवळ जिंकलेली होती. मोदी आणि शहांच्या घरात घुसून त्यांना पळता भुई थोडे करणे हे कल्पनेतही अशक्य वाटणारे, पण राजीव यांनी ते केले. त्यांच्या विरोधकांनाही ते समजले होते. म्हणूनच तर त्यांच्यावर हल्ला झाला. ते जखमी झाले. पण, हीच ती निवडणूक, ज्यामुळे नॅरेटिव्ह बदलले. प्रस्थापित व्यवस्था अजिंक्य नाही. या व्यवस्थेला आव्हान देणे शक्य आहे. कोणीही इथे अमरपट्टा घेऊन आलेले नाही… असे परसेप्शन या निवडणुकीने तयार केले. उठसूठ विरोधकांवर टीका कर, त्यांची रेवडी उडव, असले उद्योग राजीव यांनी कधीच केले नाहीत. पण, विरोधकांवर खरा हल्लाही त्यांच्याएवढा कोणी चढवला नसेल. 


राजीव कमालीचे शांत. पण, व्यूहरचना करताना त्याहून जास्त मुत्सद्दी. खूप शांतपणे, नियोजनबद्ध पद्धतीने ते पावले टाकत. त्याला अभ्यासाची बैठक असे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्याकडे तळमळ होती. कळकळ होती. जगण्याचे प्रयोजन होते. राहुल गांधींकडे हुशार तरूणांची वानवा नव्हती. पण, राजीव यांच्यासारखा, कॉंग्रेसच्या आदर्शांना मूर्त रूप देऊ पाहाणारा नेता दुसरा नव्हता. त्यामुळेच तर , राहुल आणि प्रियांका यांच्याशी त्यांचे सूर जुळले. आपल्या नेत्याला काय हवे आहे, हे न सांगता कळणारे कार्यकर्ते अपवादात्मक असतात. राजीव यांना राहुल यांचा लढा समजलेला होता. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेसकडे मागितले काहीच नाही. ते देत राहिले. झुंजत राहिले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावरही ते ना त्या सत्तेत गुंतले ना त्यांनी आणखी काही मागितले. 


धीरोदात्तपणे लढायचे आहे. हा विचार पेरत पुढे जायचे आहे. शत्रू प्रचंड ताकदीचा आहे, पण तरी आपला विजय पक्का आहे, याची त्यांना खात्री होती. ज्या 'आयडिया ऑफ इंडिया'साठी राहुल रणांगणात उतरले आहेत, तोच राजीव यांच्या लढ्याचा 'ड्रायव्हिंग फोर्स' होता. त्यामुळे ना गटबाजी, ना चमकोगिरी, आपल्या वाटेने राजीव जात राहिले. 


राजीव आणि मी एका वयाचे. डिसेंबरमधलेच. हा धागाही आमच्या मैत्रीला होता. 'वी द चेंज- आम्ही भारताचे लोक' या माझ्या पुस्तकाचे लोकार्पण राजीव यांच्या हस्ते व्हावे, अशी माझी इच्छा होती. 'आम्ही भारताचे लोक' ख-या अर्थाने प्रतिबिंबित करणारा हा नेता तिथे व्यासपीठावर असावा, अशी भावना होती. शरद पवार, राजू शेट्टी यांच्यासोबत राजीवही त्या कार्यक्रमाला आले. ते आल्यानंतर मी स्टेजवर त्यांना मिठी मारली. तेव्हा, ते गंमतीने म्हणाले, "मिठी हा संसर्गजन्य आजार आहे!" त्यावर मी म्हणालो, "हो, पण तुमच्या नेत्यानं मिठीचं नॅरेटिव्हच बदलून टाकलंय सध्या!" संसदेत राहुल यांनी मोदींना मारलेल्या मिठीचा संदर्भ त्याला होता. 

राजीव यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेलसे उत्तम, अभ्यासपूर्ण आणि सेन्सिबल असे भाषण त्या कार्यक्रमात केले. "माझी सहा वर्षांची मुलगीही टीव्ही बघत-बघत 'मोदी- मोदी' म्हणते", असे सांगत त्यांनी मोदीभक्तांचे बौद्धिक वयही जास्त नाही, असे सांगितले. आणि, ही लढाई आपणच जिंकणार आहोत, हे खात्रीने म्हणताना- कॉंग्रेस हा केवळ पक्ष नाही, तर विचार आहे, असे सांगत त्यांनी पुढच्या वाटाही सांगितल्या. 


सत्ता हवी म्हणून केवळ कॉंग्रेसमध्ये असलेल्या, सत्तेच्या जोरावर पैसा आणि पैशाच्या जोरावर सत्ता मिळवणा-या नेत्यांपेक्षा राजीव म्हणूनच वेगळे ठरले. त्यांची संसदेतली भाषणं असोत की जाहीर सभांमध्ये मांडलेली भूमिका, या वेगळेपणाचे प्रत्यंतर येत असे. 


शेती विधेयकाला थेट विरोध करून संसदेच्या प्रांगणातच उपोषण करणारे राजीव देशाने पाहिले आहेत. तेही त्या दिवशी, की ज्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता. मी फोन करून म्हटले, "अरे, असले कसले कॉंग्रेसी नेते तुम्ही! एक होर्डिंग नाही. भाऊंना शुभेच्छा नाहीत. कुठे काही कार्यक्रम नाही. नेताच उपोषणाला बसल्यावर आम्हाला पार्टी कोण देणार?" राजीव यांचा 'प्रेझेन्स ऑफ माइंड' भारी होता. "पार्टी हवीय ना तुम्हाला? तुम्हाला हवी तशी 'पार्टी' मिळावी, म्हणूनच तर उपवास करतोय!", असे म्हणत- त्यांनी मग कृषी विधेयकाला असणारा विरोध समजावून सांगितला. आणि, आपण त्याबद्दल आग्रही का आहोत, तेही शांतपणे सांगितले. राहुल गांधींना जी नवी कॉंग्रेस उभी करायची आहे, त्या लढ्यातले राजीव सेनापती होते!


राजीव खूप वाचणारे. विचार करणारे. अनेकदा लेख वाचून ते स्वतः फोन करत. राहुल गांधी यांच्यावरील माझा लेख वाचल्यावर त्यांनी खास फोन केला. म्हणाले, "तुम्हाला राहुल समजले आहेत. आमच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना या लेखामुळे तरी राहुल समजतील, अशी आशा आहे."


पुढं ते म्हणाले, "वास्तव दिसतं. पण स्वप्न दिसत नाही. त्यामुळं ज्या देशाचं स्वप्न राहुल पाहाताहेत, ते कदाचित लोकांना आज समजणार नाही. पण, हे स्वप्न सत्यात येईल. त्यासाठी सतत लोकांशी बोलावं लागणार आहे. लोकांनाही हेच हवं आहे. पण, आपल्याला काय हवंय, हे लोकांनाही नीट कळलेलं नाही. त्यासाठी लोकांशी बोलण्याचे वेगवेगळे मार्ग शोधावे लागतील!"


राजीव असे स्वप्न पाहात होते. त्या स्वप्नाला सत्यात आणू पाहात होते. 


राजीव सातव अकाली गेले, हे स्वतःला समजावणंही अशक्य आहे. ज्या वयात राजीव गांधी गेले, त्याच वयात राजीव सातवांना गमावणं हे किती वाईट आहे, हे येणा-या काळात अधिक तीव्रतेने समजत जाणार आहे. 

माणसं मरतात, तेव्हा दुःख होतंच. पण, स्वप्नाचा मृत्यू मात्र हुंदका आभाळभर करतो. 

-संजय आवटे



खा.राजीव सातव ; फक्त फोनवर सर्वसामान्यांसाठी काम करणारा नेता.

       

हिंगोली लोकसभेचे माजी खासदार व राज्यसभेतील काँग्रेसचे विद्यमान खासदार, चार वेळेस ससंदरत्न पुरस्कार विजेते. राष्ट्रीय  युवा नेतृत्व ऍड. राजीवजी सातव यांचे निधन झाल्याची वार्ता खूपच दुःखद आहे. अन बहुजन समाजातील राष्ट्रीय स्तरावर एक उभरते नेतृत्व काळाने अकाली हिरावून घेतले. कालवश राजीवजी सातव यांना भावपूर्ण आदरांजली.

       खासदार राजीवजी सातव यांच्या हिंगोली लोकसभा मतदार संघात  माझा विधानसभा मतदारसंघ येत असल्यामुळे अनेक विकासात्मक व  सामाजिक विषयासंदर्भात अगदी जवळून संपर्क आला. त्यामुळे त्यांची कार्यशैली, सामाजिक उत्तरदायित्व, प्रश्न घेवून येणाऱ्या सोबत संपर्क  जिव्हाळ्याचे संबंध व आपल्या पर्यंत आलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा व स्वत: खासदार असतानाही फोनवर सहज उपलब्धता हा अनुभव घेता आला.

       माझ्या मतदार संघातील कुणाचेही काम असो त्यांना फक्त फोनवर संपर्क साधला की, मुंबईतील अथवा दिल्लीतील संबंधित कायालयात स्वतः जाऊन काम फत्ते करून काम झाल्याचं फोनवर सांगणार .

        अगदी ग्रामीण सर्व सामान्य स्तरापासून पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, आमदार , खासदार ते आज राज्यसभा सदस्य या दिल्ली पर्यंतच्या स्तरापर त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. युवक काँग्रेसचे साधे सदस्य ते राष्ट्रीय अध्यक्षा पर्यंत मजल मारणारा हा एकमेक कार्यकर्ता. राहूल गांधी यांच्या अत्यंत जवळचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून पक्षाने दिलेली  कोणतीही जबाबदारी ते नेटाने पार पाडायचे. गुजरातचे प्रभारी म्हणून त्यांनी काँग्रेसला भरभरून यश मिळवून दिले. 

      असे खासदार राजीवजी सातव आज आपल्या सोबत नाहीत. परंतू यांच्यासोबतच्या कांही अविस्मरणीय आठवणी कायम स्मरणात राहतील. खासदार राजीवजी सातव यांच्या स्मृतिस विनम्र आदरांजली. कालवश खासदार राजीवची सातव यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ति मिळो. हीच मंगल कामना.

-प्रदीप नाईक, माजी आमदार, किनवट



 खा.राजीव सातव ; सर्वसामान्यांसाठी काम करणारा नेता

       

           हिंगोली लोकसभेचे माजी खासदार व राज्यसभेतील काँग्रेस विद्यमान खासदार, चार वेळेस ससंदरत्न पुरस्कार विजेते. राष्ट्रीय  युवा नेतृत्व मा.राजीवजी सातव यांचे निधन झाल्याची वार्ता खूपच दुःखद आहे. अन बहुजन समाजातील राष्ट्रीय स्तरावर एक उभरते नेतृत्व काळाने अकाली हिरावून घेतले. कालवश राजीवजी सातव यांना भावपूर्ण आदरांजली.

       खासदार राजीवजी सातव यांचा माझा कांही दीर्घ संपर्क नव्हता वा मी त्यांचा कार्यकर्ता नव्हतो. बहुजन चळवळीत काम करीत असल्यामुळे या त्या माध्यमातून थोडा संपर्क. दोन चार सामाजिक विषयासंदर्भात अगदी जवळून संपर्क आला त्यामुळे त्यांची कार्यशैली, सामाजिक उत्तरदायित्व, प्रश्न घेवून येणाऱ्या सोबत संपर्क  जिव्हाळ्याचे संबंध व आपल्या पर्यंत आलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा व स्वत: खासदार असतानाही फोनवर सहज उपलब्धता हा व अनुभव घेता आला.

      तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना करताना गुणवंत विद्यार्थ्यांसाठी, गुणवत्तापूर्ण, दर्जेदार व मोफत शिक्षण हे उदिष्टये ठेवून जवाहर नवोदय विद्यालयाची देशभर स्थापना केली होती. परंतू 2018 मध्ये केंद्र शासनाने म्हणजे मानव संसाधन विभाग मंत्रालयाने नवोदय विकास निधीच्या नावाखाली देशभरात जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नौकरदार पालकांकडून प्रतिवर्ष 18 हजार रुपये व इतर सर्व  पालकांकडून प्रति वर्ष 7 हजार रुपये नवोदय विकास निधीच्या नावाखाली शूल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. हा नवोदय विकास निधीचा निर्णय हा जवाहर नवोदय विद्यालय स्थापनेच्या मुळ ध्येय व उदिष्टये याच्या मुळावर घाव घालणारा होता.

         तेंव्हा जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या पालकांचे जवाहर नवोदय विकास निधी विरोधी कृती समिती मा.निलेश गोधने यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करून केंद्रशासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या या निर्णयाचा विरोध करण्याचे नियोजन केले. नवोदय विकास निधी विरोधी निवेदने राज्यभरातातील आमच्या चळवळीत मित्रांच्या सहकार्यातून शेकडो निवेदने राज्य व केंद्र शासनांना ई-मेल केली गेली. परंतू हा विषय राष्ट्रीय पातळीवरचा असल्यामुळे या विषयावर देशपातळीवर चर्चा होणे गरजेचे आहे अन आपल्याने ते होणार नाही याची खात्री झाली. 

         मधल्या काळात आम्ही कांही मागासवर्गीय खासदारांच्या माध्यमातून हा विषय लोकसभेत ठेवण्याचा प्रयत्न केला परंतू त्याला तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. लोकसभेत काँग्रेसचे दोन खासदार होते त्यापैकी एक होते राजीवजी सातव. त्यांच्याशी आमचा थेट असा संपर्क नव्हताच. माझे मित्र व दैनिक लोकमतचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मा.विजय पाटील यांच्याशी संपर्क करुन आमची ही समस्या त्यांच्या कानावर घातली. पत्रकार विजय पाटील थेट खासदार राजीव सातव यांना बोलले व आमचा विषय ,संदर्भ व आमच्या भेटीबाबत चर्चा केली.

  विशेष म्हणजे कांही वेळातच खासदार राजीव सातव यांच्याकडूनच फोन आला अन अमुक अमुक दिवशी दिल्लीहुन येत आहे. या दिवशी सकाळी तुम्ही सर्वजन, सर्व कागदपत्रांसह कळमनुरी येथील माझ्या निवासस्थानी या आपण चर्चा करू व पुढील दिशा ठरवू. 

       ठरलेल्या वेळी आम्ही मी (बालासाहेब लोणे), निलेश गोधने, बबनराव घोडगे, गणपत गायकवाड, रामदास गोणारकर, जितेंद्र गवळे, मिलिंद जाधव व नवोदय मध्ये शिकणाऱ्या पालकांचे मोठे शिष्टमंडळसह खा.राजीव सातव यांची भेट घेतली. खासदार मा.राजीव सातव यांनी आम्ही गेल्या गेल्या आमच्या चहापाणी - नाष्टयाची व्यवस्था केली व आमच्या सर्वांसह बसुन नवोदय विकास निधीचा संपूर्ण विषय मा.निलेश गोधने यांच्या व आमच्याकडून अगदी बारकाईने समजून घेतला. लगेच दिल्लीतील त्यांचे स्वीय सहाय्यक यांना सर्व कागदपत्रे फॅक्स केलीच व दिल्ली लोकसभा सचिवालयात फोन लावून चालू अधिवेशनात नवोदय विकासनिधीचा विषय मला लोकसभेत मांडायचा आहे असे सांगितले.

    खासदार राजीव सातव यांनी लोकसभेच्या अधिवेशनात आमच्या बालासाहेब लोणे, निलेश गोधने व सर्वांच्या नावाच्या उल्लेखासह हा लोकसभेत मांडला. लोकसभेच्या कामकाजातील आमचेही नावेसुद्धा ऐताहासिकदृष्टया समाविष्ट असलेले सभेचे इतिवृत्त (मिनिट्स) व त्यांचे लोकसभेतील भाषणाची व्हिडीओ क्लिप आम्हाला पाठविली. ही खासदार मा.राजीव सातव यांची संवेदनशिलता व तत्परता. पुढे या नवोदय विकासनिधीला आम्ही अॅड.संतोष भोसले यांच्या मार्फत उच्च न्यायालयात चॅलेंज केले. केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने जवाहर नवोदय विद्यालयाच्या स्थापना ध्येय व उदिष्टा विरूद्धचा शासन निर्णय उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर मागे घेतला.

             तसेच मागच्या वर्षभरापासुन कोरोनामुळे शाळा बंद असतानाही इंग्रजी माध्यमांच्या शाळा संपूर्ण फी वसुलीसाठी पालकांना सक्ती करीत होत्या व आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांत शिकणाऱ्या मुलांची फी माफी करावी यासाठी आम्ही अनेक लोकप्रतिनिधींशी संपर्क केला. निवेदने दिली. असेच राज्यसभा खासदार असलेले राजीवजी सातव यांच्याशी संपर्क केला होता. त्यांच्या कडून निरोप आला. २५ जानेवारी २०२१ रोजी हिंगोलीला या. मी हिंगोलीत आहे व प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहन कार्यक्रमासाठी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री व हिंगोलीच्या पालकमंत्री मा.प्रा.वर्षाताई गायकवाड हया हिंगोलीत मुक्कामी आहेत. आपण शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याशी आपण या विषयावर चर्चा करू. 

      आम्ही २५ जानेवारी २०२१ रोजी रात्री ८ वाजता  हिंगोली येथे शिक्षणमंत्री मा.वर्षाताई गायकवाड विश्रामगृहावर आमच्या सोबत चर्चा केली. निवेदन स्विकारलेच व आमच्या सोबतच आपलेही पत्रही शिक्षणमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांना दिले व आमच्यासोबत शिक्षणमंत्र्यांशी सविस्तर चर्चा घडवून आणली व पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

          असे खासदार राजीवजी सातव आज आपल्या सोबत नाहीत. परंतू यांच्यासोबतच्या कांही अविस्मरणीय आठवणी कायम स्मरणात राहतील. खासदार राजीवजी सातव यांच्या स्मृतिस विनम्र आदरांजली. कालवश खासदार राजीवची सातव यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ति मिळो. हीच मंगल कामना. 

-बालासाहेब लोणे, नांदेड

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News