मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : 2 मे पासून मुंबईतील शिक्षकांना BLO ड्युट्यांबाबत उपस्थित राहण्याचे आदेश आले होते. त्याबाबत आज आमदार कपिल पाटील यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यावेळी भोसले यांनी कुणालाही BLO ड्युटीवर बोलावलं जाणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं.
शिक्षक मे महिन्याच्या सुट्टीचा उपभोग घेऊ शकतात, असंही त्यांनी सांगितलं.
त्यामुळे BLO ड्युटीचे आदेश आले असले तरी शिक्षकांनी काळजी करण्याचं कारण नाही. BLO ड्युटीवर जाण्याची आवश्यकता नाही, असं कपिल पाटील यांनी सांगितलं आहे.
सुट्टी काळात मूळ गावी किंवा परगावी जाण्यासाठी शिक्षक तीन महिन्यांपासून प्रवासाचे नियोजन करत असतात, तिकीट्स बुक करत असतात. मात्र ऐन सुट्टीच्या तोंडावर BLO ड्युटी लागल्याने शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण होते. पण आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने केलेल्या पाठपुराव्यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना आता गावी जाता येणार आहे. कुटुंबासोबत सुट्ट्यांच्या आनंद घेता येणार आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी दिली आहे.
अतिरिक्त शिक्षकांनाही सुट्टी मिळणार
मुंबईतील जे अतिरिक्त शिक्षक BLO ड्युटीवर आहेत त्यांनाही मे महिन्याची सुट्टी मिळावी, यासाठी शिक्षक भारती आणि आमदार कपिल पाटील यांनी पत्रव्यवहार केला होता. आज आमदार कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी याबाबतही चर्चा केली. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितलं की, अतिरिक्त शिक्षक BLO ड्युटीवर आहेत त्यांनाही मे महिन्याची सुट्टी उपभोगता येईल. त्यांना कोणतीही सक्ती करण्यात येणार नाही.
त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचाही सुट्टी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
अतिरिक्त शिक्षक हे कायम कर्मचारी आहेत. शालेय सेवा शर्ती नुसार त्यांना मे महिन्याची सुट्टी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे शिक्षक भारतीने याहीवर्षी प्रयत्न करून त्यांना सुट्टी मिळवून दिलेली आहे, असंही सुभाष मोरे यांनी सांगितलं.
No comments:
Post a Comment