जुन महिना म्हणजे मृग नक्षत्राची सुरुवात होय . पावसाची रिपरिप सुरु झालेली असते. सोबतच ती सणांची बरसात घेऊन येते. यातच येणारा श्रावण हा महत्त्वाचा मास होय. उन्हाळ्यातील उकाडयातून माणसांची सुटका करणारा मौसम होय.
शेतकरी पिकांसाठी पाण्यासाठी आतूर असतो. तर लहान मुले पावसाचा आनंद घेण्यासाठी सज्ज झालेले असतात. त्यातच सणांमागून सण येतात. त्यानिमित्त गोडधोड पक्वान्न खायला मिळतात. नववधूंना माहेरीची वाट बघायला लावणारा पहिला सण म्हणजे आषाढी.नंतर श्रावण महिना श्रावणसरी घेवून येतोच. तर नागपंचमी पुन्हा लेकीबाळीचा येऊन सण ठेपतोच. जिकडे तिकडे आनंदी आनंदच वातावरण असते. सुंदर निसर्गाच्या सानिध्यात शाळेतील सहलीला भर येतो.
याबरोबरच शेतकऱ्यांचा सण येतो. तो म्हणजे 'पोळा'. अस म्हणतात,
'आला पोळा अन् पाऊस झाला भोळा.'
पोळा आला की पावसाळा संपत आलेला असतो.
पोळा या सणांचे महत्त्व शेतकरी वर्गात जास्त प्रमाणात पहायला मिळते.
शाळकरी मुलांना विविध वस्तू बनविण्याचा छंद लावणारा हा सण. पोळ्या पूर्वी आठ दिवसापासून अगोदर लहान मुले शेतात जावून चिक्कन काळी माती, लाल माती आणतात. आणि
त्यात रममाण होवून वेडेवाकडे का होईना, पण बैलांच्या प्रतिकृती बनविण्यात मग्न असतात. त्याच बरोबर विविध आकार तयार करतात. आणि त्याचा मनमुराद आनंद घेतात. यातूनच नवीन शिल्पकार तयार होतात, हेही तेवढेच खरे.
पोळ्याचा बाजार हा सुद्धा एक आकर्षणीय असतो. जणू एखादी नववधू सजावी असा तो बाजार सजलेला असतो. जिकडेतिकडे रंगीबेरंगी सजावटीचे साहित्य. वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे, घुंगरमाळा, नव्या वेसनी, दावे, कासरे, कवड्याची माळ, काचेची सुंदर सुशोभित भिंगे असलेल्या शिंगाच्या मधोमध लावाय माळ, शिंगाचे वार्निस, बेगडपट्टया, वेगवेगळे कागदी फुले, पंचरंगी नाडा आणि झुली इत्यादीने संपूर्ण बाजारच सजलेला असतो. बाजारात गेलेला माणूस भान हरपून ते सुंदर दृश्य बघत असतो.
पोळ्याचा दिवस शेतकऱ्यांच्या जीवनातील अतिशय महत्वपूर्ण मानल्या जातो. कारण संपूर्ण उन्हाळ्यात याच बैलांनी आपल्या मालकाला उन्हातान्हात मदत करुन शेताची मशागत केलेली असते. आणि त्याचे सुंदर फळ हे पोळ्याच्या वेळेस शेतातील फुललेल्या पिकांतून पहायला मिळते. जमिनीची कळा बदलेते.त्या उमगलेल्या पिकांचे हसरे प्रतिबिंब शेतमालकाच्या चेहऱ्यावर उमटते.
म्हणून तो पोळ्याच्या दिवशी लवकर उठून दारात पळसाच्या फांदीची मेडी लावतो. त्या दिवशी बैलांना आराम असतो. बैलांना नदीवर किंवा जिथे पाणी असेल तिथे नेऊन बैलांना पोहू किंवा धुतल्या जाते. तर लहान मुले ही सोबत पोहत असतात. आम्ही तर आवर्जून जात असे आणि नदीत पोहत असे.
संध्याकाळी तयारी जोरात असते. शिंगे रंगविणे, त्यावर बेगडी पट्ट्या चिटकिवणे, शिंगाला गोंडे लावणे, पायात घुंगरबेड्या, गळयात घुंगरमाळा,अंगावर झुली टाकूण सजवत असतात. जणू एखादा नवरदेव सजत आहे, असे चित्र असते.
पोळा बघण्यासाठी सर्व गाव सज्ज असते. वाजंत्री गाजाबाजा सुरु असतो. गावपारावर घरावर जागा नसेतर झाडांच्या फांदीवर गर्दी होते. येशीवर तोरण बांधले बांधण्यात येते. त्यातही मानपान ठरलेला असतो. गावातील प्रमुख मानकरी हा प्रथम बैलजोडी घेऊन पुढे येतो. नंतर बाकी सर्व बैलजोड्या फिरविल्या जातात. त्यात सर्व जाती धर्म एकत्र येवून हा सण साजरा करतात. आणि विशेष म्हणजे काही ठिकाणी पोळा संपल्यानंतर सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी घरोघरी जावून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतात. त्यात वेगळा उत्साह, आपलेपण, भूतदया म्हणजे प्राणीमांत्रा विषयी प्रेम, आदरातिथ्य, बंधूभाव, एकतेची भावना जपली जाते.
आजही पोळा सणांचे महत्त्व जपले जाताना पहायला मिळते.
माझ्या मते, महाराष्ट्रात हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ या गावी एकमेव 'महापोळा' चे आयोजन केले जाते. तेथे पंचक्रोशीतील एक लाख बैलजोड्यांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा होतो. जातधर्म विसरून सर्व शेतकरी वर्ग एकत्र येतो. यातून फार मोठे एकतेचे दर्शन होते.
आज वस्तूस्थिती वेगळी दिसते. सध्याचा काळ हा आधुनिक तंत्रज्ञानाचा काळ आहे. त्यामुळे बैलांची गरज कमी झाली आहे. यंत्रे, अवजारे, उपकरणे वाढली आहेत. त्यामुळे मानसाऐवजीं यंत्राने कामे कमी वेळात व्हायला लागली आहेत. बाजारात छोटे ट्रँक्टर आली आहेत, आणि त्यामुळे बैलांची कामे कमी झाली. म्हणजेच बैलांचे प्रमाण कमी होत चालले आहे. एवढेच नाही तर काही ठिकाणी बैलांचा नाही, तर ट्रँक्टरांचा पोळा साजरा केला जातो. तर शहरी भागात पोळा काय असतो, हेही माहिती नसते.
यामधून सणांचे महत्त्व कमी होत चालले आहे.माणसे मानसांपासून दूर चालले आहेत. आनंद, खुशी कमी होऊन माणसामाणसात द्वेष भावना वाढत चालली आहे.
जातीय दूरी निर्माण होत चालली आहे.हे थांबणे गरजेचे आहे. यासाठी एकोपा वाढणारे सहकार्यक्रम व्हावेत. त्यातून बंधुत्वाची भावना निर्माण होईल. मैत्री भाव वाढेल. देश समृद्ध होईल.
म्हणून सर्वच सण हे एकात्मता वाढविणारे मोठे साधन होते, असे म्हटले तर, नक्कीच अतिशयोक्ती होणार नाही. म्हणून सणांचे महत्त्व आज सर्वांनाच पटत आहे.
शेवटी म्हणेन ,
आला आला पोळा
झाला गावाचा मेळा
असा समतेचा सण
लावी एकतेचा लळा
*बाबुराव पाईकराव*
*डोंगरकडा*
९६६५७११५१४




No comments:
Post a Comment