नऊ महिन्यांच्या आदिवासी गर्भवती महिलेच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करा; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर नियंत्रण नसल्याचा आमदार भीमराव केराम यांचा आरोप - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, August 2, 2026

नऊ महिन्यांच्या आदिवासी गर्भवती महिलेच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करा; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर नियंत्रण नसल्याचा आमदार भीमराव केराम यांचा आरोप



किनवट, ता. २ ऑगस्ट : किनवट तालुक्यातील शिवणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रातील लोखंडवाडी येथील नऊ महिन्यांच्या आदिवासी गर्भवती महिलेचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी व गंभीर असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी किनवट–माहूरचे आमदार भीमराव केराम यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रभावी नियंत्रण राहिले नसल्याचे चित्र दिसून येत आहे. दुर्गम व आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य सेवांवर आवश्यक देखरेख व समन्वयाचा अभाव असल्यामुळे अशा गंभीर घटना घडत असल्याची खंत आमदार केराम यांनी व्यक्त केली.

गर्भवती महिलांना वेळेवर उपचार, तज्ज्ञ डॉक्टर, रुग्णवाहिका व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याने आदिवासी भागातील माता व बालकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा, निष्काळजीपणा किंवा प्रशासकीय दुर्लक्ष झाले आहे का, याची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच मृत महिलेच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी. किनवट–माहूरसारख्या दुर्गम आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये डॉक्टर, परिचारिका, औषधसाठा, रुग्णवाहिका आणि प्रसूतीसाठी आवश्यक सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध करून आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यात यावी, अशीही मागणी आमदार भीमराव केराम यांनी केली.

आरोग्य यंत्रणेतील त्रुटी लपविण्याऐवजी जबाबदारी निश्चित करून आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे, असेही आमदार भीमराव केराम यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News