विश्वविख्यात, साहित्यसम्राट, थोर क्रांतिकारक, सत्यशोधक डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या आज (ता.1 ऑगस्ट 2024) 104 व्या जयंतीनिमित्त अनिल देवराव कांबळे यांचा लेख येथे देत आहोत. -संपादक
महाराष्ट्रातला सह्याद्रीचा परिसर ,प्रचंड डोंगरांच्या लांब सडक रांगा ,निसर्गानं नटून- थटून बसलेली मनमोहक वनश्री. कृष्णा आणि वारणेच्या आशीर्वादाने सुपीक व सुखमय झालेली ती धरित्री. या परिसरात सांगली जिल्ह्यात आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेले एक छोटेखानी खेडेगाव - *वाटेगाव* .
वाटेगाव निसर्ग सौंदर्याने नटलेले असून ते कोल्हापूर आणि साताऱ्याच्या मध्यभागी बसलेले आहे. वाटेगावच्या पश्चिमेस उत्तुंग अशा सह्याद्रीच्या पर्वतराजी खडा पहारा देत असून ,त्यांच्या मधूनच कृष्णा आणि वारणा नद्या आपल्या संथ प्रवाहान मधुर संगीत गात- गात आणि नागमोडी वळण घेत वाहतात. या नद्यांच शुद्ध पाणी, सुपीक जमीन आणि त्या खोऱ्यात पोटासाठी रात्रंदिवस कष्ट करणारे असंख्य लोक, शौर्यानं , धैर्याने आणि स्वाभिमानाने जीवन जगणारे मातंग जातीतील लोक, आपल्या देशातील धर्म व्यवस्थेने लादलेले अठराविश्व दारिद्र्य आणि शौर्याची लखलखती तलवार घेऊन संघर्षशील जीवन जगणाऱ्या या वाटेगावच्या वीर फकिराच्या शौर्य गाथेचे गुणगान होत असताना, मातंगाच्या अशा वीरश्रीयुक्त ऐतिहासिक पार्श्वभूमीवर त्या माणसं जगविणाऱ्या लोकांच्या मांगवाड्यात भाऊराव साठे आणि त्यांची पत्नी वाळूबाई साठे यांच्या पोटी 1 ऑगस्ट 1920 रोजी एक सूर्यपुत्र जन्मास आला. त्याचे नाव "तुकाराम भाऊराव साठे" म्हणजेच विश्वविख्यात, साहित्यसम्राट, थोर क्रांतिकारक, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे होत. डॉ. अण्णाभाऊंच्या आज 1 ऑगस्ट 2024 रोजी होत असलेल्या 104 व्या जयंतीनिमित्त डॉ. अण्णाभाऊंच्या चरणी कोटी - कोटी वंदन करतो व सर्व देश बांधवांना हार्दिक -हार्दिक मंगलमय शुभेच्छा!
वाटेगावच्या या निसर्ग सौंदर्याचं वर्णन करण्याचे कारण म्हणजे मी आणि माझे सहकारी मित्र श्री .धनाजी कांबळे सर जिल्हाध्यक्ष स्वतंत्र समता शिक्षक संघ नांदेड, डॉ.प्रा.एम.एम. गायकवाड सर, प्रो.डॉ.अशोक जाधव सर तसेच श्री. आनंदराव हनमंते सर अध्यक्ष खाजगी शिक्षक संघटना महाराष्ट्र आम्ही 1ऑगस्ट 2023 रोजी डॉ. अण्णाभाऊंच्या घरी वाटेगाव येथे उपस्थित होतोत. आम्ही डोळेभरून हा परिसर पाहिला आहे.अण्णाभाऊ ज्या गावात,ज्या घरात ,खेळले,बागडले, लहानाचे मोठे झाले, त्या पावन जन्मभूमी ला जावून नतमस्तक होऊन आलो आहोत.तेथेच वीर फकिरा राणोजी साठे यांच्या घरी जाऊन त्यांच्या वीरतेच्या पाऊलखुणा पाहून त्यांच्या शौर्याला , वीरतेला, धैर्याला मानवंदना देऊन ,तेथील आपल्या माणसात बसून ,अण्णाभाऊ विषयी, वीर फकिरा विषयी ,त्यांच्या नातवांशी गप्पा करून,त्यांची मुलाखत घेऊन आलो आहोत. कोटी कोटी नमन त्या वीर सुपुत्रांना व भारतभूमीला.
वाटेगावच्या निवडुंगात एकापेक्षा एक अशी धैर्यान आणि बळानं वाखाणण्यासारखी दौलती, आप्पा, बहिरू ही वयस्कर आगळीवेगळी माणसं होती. तर त्यांची मुलं राणोजी , बळी, पांडू ,दगडू ,सावळा आणि गोंदा ही मर्द बापाची मर्द अवलाद होती.दौलतीचा मुलगा राणोजी आणि राणोजी ची मुले वीर फकिरा व सहदेव ही वाटेगावची शूर वीर मंडळी होय.
तेथील इतिहास सांगतो - वीर फकिरा आणि त्यांच्या साथीदारांनी वाटेगाव ची माणसं भुकेने व्याकुळ झाली असता, उपासमार होत असताना, त्यांना जगवण्याचा विचार करताना वीर फकिरा म्हणाला," मर्दानो ,आरं इंग्रजांचा खजिना लुटुया ,म्हणजे आपली पोरंबाळ तरी चार दिवस सुखाने जगतील, कोणी बघितलंय मग म्होरचं!" वीर फकीराची ही धाडशी युक्ती सर्वांना पटली. त्यातूनच बेडसगावचा खजिना लुटला. त्याच लुटीतील दोन ओंजळी भरून कलदार रुपये वीर फकिराने अण्णाभाऊंच्या जन्माच्या वेळी भाऊ साठे यांच्या घरी बाळ आणि बाळंतीच्या साठी देऊ केले.त्याच गुट्टीच्या बळावर अण्णाभाऊंचा देह आकार घेत होता. तेव्हा वीर फकिराने भविष्यवाणी केली. तो म्हणाला ,"बाय ,खरं सांगू ,भाऊचा हा मुलगा आपल्या कुटुंबाचंच नव्हे ,तर आपल्या समाजाचा सुद्धा नाव मोठं करणार आहे. तेव्हा त्याला कसेही करून जगवा, त्याच्या आईची ही काळजी घ्या. बरं ,चालतो मी!." असे बोलून फकिरा घोड्यावरून तुफान वेगाने निघून गेला.
अण्णाभाऊंची मोठी बहीण भागुबाई, लहान बहीण जाईबाई ,लहान भाऊ शंकर असे सर्व बहिण- भाऊ अशा संघर्षमय वादळी वातावरणात लहानाचे मोठे होत होते.
*भाऊराव व वालुबाई साठे यांचे स्वप्न*
भाऊ साठे कामानिमित्त साताऱ्याला आले असता, तिथे ते बागकाम करायचे. त्यातून त्यांना बऱ्यापैकी कमाई व्हायची. तिथे इंग्रजांची छावणी होती. इंग्रजांचे राहणीमान पाहून भाऊराव साठे यांना पण तुकाराम म्हणजेच अण्णाभाऊंना शाळा शिकवावे. आपला मुलगा शिकून इंग्रजांसारखा सुटा- बुटात राहावा. असा विचार मनात आला. तो विचार वालूबाईकडे बोलून दाखवला. वालूबाईंनी अण्णाभाऊंना शाळेत प्रवेश दिला. पण दुसऱ्याच दिवशी तेथील गुरुजींनी तुकाराम ला खूप मारले. त्यामुळे अण्णाभाऊंची शाळा सुटली. आपल्या देशातील धर्मव्यवस्थेने व समाजव्यवस्थेमध्ये बहुजनांनी शिकू नये, असेच व्यवस्था केली होती. त्यामुळे अण्णाची शाळा दीड दिवसात सुटली.
डॉ. बाबासाहेबांना पण वर्गाबाहेर बसून शिकावे लागले अशीच आपल्या देशातील व्यवस्था होती; कारण मनुस्मृतीने शिक्षण बंदी घातली होती.
*वाटेगाव ते मुंबई प्रवास*
1932 चा काळ होता दुष्काळाने सारा महाराष्ट्र भुकेने तडफडत होता. अण्णाभाऊचे वय त्यावेळी केवळ 12 वर्षे होते. उपासमारीमुळे भाऊराव साठे यांनी कुटुंब मुंबईला हलवण्याचा विचार केला. वाटेगाव ते मुंबई असा पायी प्रवास करत ,ते काही दिवस सातारा, खंडाळा, कल्याण करत शेवटी भायखळा रेल्वे स्टेशनला पोहोचले.
*मुंबईतील संघर्ष*
भाऊराव साठे मुंबईत मिळेल ते काम करायचे व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. पुढे काही वर्षांनी अण्णाभाऊ पण कुटुंबासाठी गिरणी कामगार म्हणून काम करायचे. कामगारांसोबत काम करत असताना कामगारांवर होणारा अन्याय त्यांना सहन झाला नाही. तेथे त्यांनी कामगारांचा संप घडवून आणला. पुढे संप मिटला. पण गिरणीतील काम अण्णाभाऊंनी सोडून दिले.
*अण्णाभाऊंचे पुस्तकवाचन*
1934 चा काळ होता. अण्णाभाऊ सिनेमा पाहताना चित्राखाली येणारी अक्षरांची ओळ समजून घेऊ लागले. ॲडव्हर्टायझिंगच्या फलकावरील अक्षर दुसऱ्याकडून वाचून घेऊन स्वतः वाचावयास आणि लिहावयास शिकले. हेच अण्णाभाऊंचे शिक्षण होय. आधुनिक एकलव्य म्हणजे अण्णाभाऊ अशा स्वप्रयत्नाने वाचायला- लिहायला शिकले. पुढे अण्णाभाऊ मिळेल ते पुस्तक भराभरा वाचू लागले. अण्णाभाऊंची कष्टावर अपार निष्ठा होती. कष्ट करणाऱ्यांच्या जीवन जाणिवा हा त्यावेळेस त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. अण्णाभाऊ माणसांच्या इमानाशी जागले. माणसांचं दुःख आपल्या विद्रोही वैचारिकतेतून जगासमोर मांडण्यासाठी स्वतःला तयार केले.
*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे*
अण्णाभाऊस लहानपणापासूनच गायन- वादनाची आवड होती. ते उत्तम प्रकारचे गायक होते. त्यांचा आवाज चांगला मधुर होता. 1932 झाली मुंबईमध्ये कामगारांचा संप सुरू असताना त्यांनी प्रथम "मच्छरांचा पोवाडा" लिहिला नंतर "स्टॅलिनगार्डचा पोवाडा" लिहिला. 23 एप्रिल 1932 च्या मुंबई गिरणी कामगारांच्या संपात पोवाडा गायला. अण्णांभाऊंचे स्वतःचे अनुभव आणि पुस्तकांच्या वाचनामुळे त्यांची दृष्टी विश्वशोधी बनली. अण्णाभाऊ जगातील घटना घडामोडी शाहिरी वाङ्मयातून जनतेसमोर मांडू लागले. येथूनच अण्णाभाऊ एक निष्ठावंत क्रांतिकारक ,कामगार नेता व लोकशाहीर म्हणून जनतेने अण्णाभाऊंना डोक्यावर घेतले. अण्णांभाऊंनी संप यशस्वी केला. कामगारांच्या न्याय हक्काच्या मागण्या पूर्ण करून दिल्या. तर इकडे 1932 च्या काळात डॉ .बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेत आपल्या न्याय मागण्यासाठी लढा देत होते.दोन्ही महापुरुष वेगवेगळ्या पातळीवर न्यायी लढा लढत होते.
*साम्यवादी अण्णाभाऊ*
अण्णाभाऊ 1939 ते 1947 या काळामध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या प्रचाराची धुरा सांभाळत होते. त्यावेळी स्पेन मध्ये कामगारांचा लढा अधिक तीव्र झाला होता. त्यानंतर बातम्या येत होत्या. अण्णांनी "स्पेनचा पोवाडा" लिहिला .भारतीय कामगार नी शेतकर्यांची बाजू घेऊन पोवाडे, लावण्या लिहून त्यांचे दुःख आपल्या शायरी वांङमयातून जनतेला ऐकवली. सन 1938 मध्ये जर्मनी व रशिया यांच्यात अनाक्रमणाचा करार झाला होता. तरीपण जर्मनीने 22 जून 1941 रोजी मास्को आणि लेलिनग्राड शहरे जिंकण्यासाठी सैन्य पाठवले; पण रशियाच्या "लाल सेनेने" आपल्या अथक साहसाने स्टॅलिनग्राडचा अभूतपूर्व पराक्रम गाजवून 1942 साली विजय मिळविला. हिटलरचा पराभव झाला.
इकडे भारतातही 1942 मध्ये "चलेजाव" ,"भारत छोडो आंदोलन" सुरू झाले होते. अशा कठीण काळात स्टॅलिनग्राडचा पोवाडा लिहून अण्णांनी तो सर्वत्र गायन केला; आणि पार्टी फंडासाठी दोन लाख रुपये फंड गोळा करून दिला.अण्णाभाऊंच्या शाहिरी मध्ये अशी ताकद होती.
1932 ते 1947 च्या काळात अण्णाभाऊ कामगारांच्या हिताचा लढा लढत होते; तर तिकडे डॉ. बाबासाहेब मजूरमंत्री ,कायदामंत्री म्हणून कामगारांचे प्रश्न कायद्याने सोडवत होते. त्याचबरोबर धर्मांतराची घोषणा करून,परिषदा घेऊन जनमत बनवत होते.विविध आघाड्यांवर लढाई लढत होते.
*जागतिक किर्तीचे साहित्यिक डॉ.अण्णाभाऊ साठे*
अण्णांभाऊंची पहिलीच कादंबरी "चित्रा". ही रशियन भाषेतून सोवियत रशियामध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर सुलतान, गुलाम, बरबाद्या कंजारी या कथासुद्धा 1944 मध्ये कादंबरीच्या रूपाने झेक ,पोलंड आणि जर्मन या भाषेत प्रकाशित होऊन त्या- त्या देशात लोकप्रिय झाल्या. सुलतान या कादंबरीमुळे अण्णाभाऊस "सुलतान फेम" म्हणूनओळखल्या जाऊ लागले. एकूणच अण्णाभाऊंची किर्ती जगभर पसरली. अण्णाभाऊंना परदेशातून पत्र आणि निमंत्रण येत होती. 1948 मध्ये पॅरिस येथे भरणाऱ्या "जागतिक साहित्य परिषदेचे" निमंत्रण अण्णाभाऊंना मिळाले होते. पण पासपोर्टसाठी मुख्यमंत्र्याकडे दोन वेळा अर्ज करून ही त्यांना महाराष्ट्र सरकारने काही कारणास्तव पॅरिसला जाण्यास परवानगी दिली नाही.
अण्णाभाऊंनी 1948 ते 1959 या काळामध्ये एकूण 12 पुस्तके, 37 कादंबऱ्या ,11 कथासंग्रह, 2 नाटके, 1 प्रवासवर्णन, 10 लोकनाट्ये,7 चित्रपट कथा लिहिल्या. *अण्णाभाऊ साठे हे लोकनाट्याचे जनक आहेत*.
*कादंबऱ्या*
1) आग २)आघात ३)अलगुज ४)आवडी ५)अहंकार ६)अग्नीदिवे ७)केवड्याचे कणीस ८)कुरूप ९)गुलाम १०)गुऱ्हाळ११) चंदन १२) चिखलातील कमळ १३) चिराग नगरची भूत १४)चित्रा १५)जिवंत काडतुसं १६) ठासलेल्या बंदुका १७)डोळे मोडीत राधा चाले १८)तारा १९)धुंद २०) पाझर २१) फकिरा २२)फुलपाखरू २३) मंगला २४) माकडीचा माळ २५)मास्तर २६) मयुरा २७)मूर्ती २८)रानगंगा २९)रानबोका ३०)रत्ना ३१)रूपा ३२)वैजयंता ३३)वारणेच्या खोऱ्यात ३४)वारणेचा वाघ ३५)वैर ३६)संघर्ष ३७)सरनौबत
*कथासंग्रह*
१)आबी २) कृष्णाकाठच्या कथा ३) खुळवाडी ४) गजाआड ५)नवती ६) निखारा ७)पिसाळलेला माणूस ८) फरारी ९) बरबाद्या कंजारी १०)भानामती ११)लाडी
*नाटक*
१)इनामदार २)पेंग्याचे लगीन
*प्रवासवर्णन*
१) माझा रशियाचा प्रवास
*लोकनाट्ये*
१)अकलेची गोष्ट २)खापऱ्या चोर ३)दुष्काळात तेरावा महिना ४)देशभक्त घोटाळे ५)पुढारी मिळाला ६)बेकायदेशीर बिलंदर बुडवे ७)मूक मिरवणूक ८)माझी मुंबई ९)लोकमंत्री १०) सेटजीचं इलेक्शन
*शाहिरी वाङमय*
१) शाहिर. २) माझी मैना.
*चित्रपट कथा*
१)अशी ही साताऱ्याची तऱ्हा (अलगुज) २) टिळा लाविते मी रक्ताचा( आवडी)
३) डोंगरची मैना (माकडीचा माळ)४) फकीरा (फकीरा ) ५)मुरळी मल्हारी रायाची (चिखलातील कमळ)६) वारणेचा वाघ (वारणेचा वाघ) ७) बारा गावचे पाणी (वैजयंता)
*रशियाचा प्रवास शिवशाहीर ते विज्ञानवादी ,सत्यशोधक अण्णाभाऊ साठे*
अण्णाभाऊ 12 सप्टेंबर 1961 ते 18 सप्टेंबर 1961 या कालावधीत रशियाच्या प्रवासात होते. 13 सप्टेंबर 1961 रोजी "*चित्तोड की राणी*" या विमानाने रशियातील ताश्कंद ला प्रयाणकर्ते झाले. तेथील जनतेने डॉ.अण्णाभाऊंचा भव्य - दिव्य स्वागत व सत्कार सोहळा घेतला. रशियन जनता अतिशय आतुरतेने अण्णाभाऊंची प्रतीक्षा करत होती.
दुसऱ्या दिवशी ताश्कंद येते भव्य कार्यक्रम झाला. हजारोंच्या संख्येने रशियन जनता, पत्रकार, विद्वान मंडळी, कामगार उपस्थित होते. अण्णाभाऊंनी रशियन जनतेने राज्यक्रांती द्वारा तळातील माणसांच्या हाती सत्ता दिल्याबद्दल रशियन जनतेचे अभिनंदन केले. भारतीय कामगार चळवळी विषयी माहिती दिली. विचारांचे आदान- प्रदान झाले. अण्णाभाऊंची "चित्रा"ही कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली .अण्णाभाऊ 15 सप्टेंबर रोजी "लेलिनग्राड विश्वविद्यालयास" भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या विद्यापीठात भारतीय अभ्यासिका दलनात गौतम बुद्धाचा स्मितहास्य करीत असलेला ब्रॉजचा पुतळा पाहायला मिळाला . तो पाहून अण्णाभाऊंना खूप आनंद झाला . रशियन राज्यक्रांतीचा जनक कॉम्रेड लेलीन यांची अभ्यासाची खोली पाहून , रशियाचे वैभव पाहून आणि तेथील मानवाने केलेली प्रगती पाहून अण्णाभाऊ म्हणाले होते ," *रशियन माणूस हा इतिहास प्रिय आहे. तो जुना इतिहास जमा करून त्याचे जतन करतो आणि त्यावरच तो नवा इतिहास निर्माण करतो*."
17 सप्टेंबर 1961 रोजी भारतीय वकालतीने अण्णाभाऊ यांचे चर्चासत्र ठेवले. 17 सप्टेंबर 1961 रोजी अण्णाभाऊ मास्को शहरात भाषण देणार असल्याची बातमी प्रसारित होताच, भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली .तेथे अण्णाभाऊंनी "*ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून, ती दलितांच्या, कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे" ही ऐतिहासिक विज्ञानवादी घोषणा दिली. अण्णाभाऊंनी रशियामध्ये छत्रपती शिवरायांचा पोवाडा गायला आणि शिवरायांचा पराक्रम रशियन जनतेला सांगितला तेव्हा ते "*शिवशाहीर"* म्हणून रशियात प्रसिद्ध झाले. 18 सप्टेंबर रोजी अण्णाभाऊ मास्को वरून विमानाने अजरबैजानची राजधानी बाकू शहरात उतरले .तेथील जनतेने व अध्यक्षांनी अण्णाभाऊंचे भव्य स्वागत केले. तेथील चर्चासत्र पूर्ण करून त्याच दिवशी सायंकाळी अण्णाभाऊंचा ताश्कंद विश्वविद्यालयात सायंकाळी भाषणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
*सत्यशोधक आंबेडकरवादी डॉ.अण्णाभाऊ साठे*
1956 पासूनच अण्णाभाऊ कम्युनिस्ट पार्टी कार्यापासून बाजूला पडलेत. डॉ. बाबासाहेबांनी 1935 ला येवला येथे केलेली धर्मांतराची घोषणा केली होती. या चळवळीकडे अण्णाभाऊ लक्ष देऊन होते. डॉ. बाबासाहेबांबद्दल त्यांच्या मनात नितांत आदर होता. जेव्हा डॉ. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. त्या दुःखद प्रसंगी अण्णाभाऊंनी *"जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव*" हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महान संदेश आपल्या काव्यपुष्पात गुंफुन आंबेडकरी वैचारिकतेकडे निष्ठांतर केले.
"दलितांची शाहिरी" हे अण्णाभाऊंचे भाषणही आंबेडकरी निष्ठेवरील डोळस वैचारिकतेचे प्रतीक आहे. डॉ. बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीची धार शाहिरांनीच अधिक तेज केली. त्या शाहिरांना आणि जलसाकारांना बाबासाहेबांनी अनेक वेळा मार्गदर्शन केलेलं होतं. त्यांचे मार्गदर्शन अण्णाभाऊंना ही मिळालेलं होतं म्हणून तर 1 मार्च 1958 च्या "प्रबुद्ध भारत" या साप्ताहिकात 'दलितांची शाहिरी' हा लेख अण्णाभाऊंनी लिहिला त्यात ते म्हणतात दलित शाहिराने डॉ. बाबासाहेबांचा संदेश दलितांच्या झोपडीपर्यंत पोहोचविला. त्यामुळेच बाबासाहेबांचा लढा सतत पेटत राहिला. डॉ. अण्णाभाऊ आंबेडकरवादी असल्याचा दुसरा पुरावा म्हणजे 1मार्च 1959 रोजी अण्णाभाऊंनी आपली मौलिक कादंबरी *"फकीरा"* ही डॉ. बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीस अर्पण केली आहे. "फकिरा" अण्णाभाऊ साठे यांची उत्कृष्ट साहित्यकृती आहे. ती सत्य आहे.याच कादंबरीस महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरी हा पुरस्कार मिळाला आहे.8 जून 1958 मध्ये 'सिद्धार्थ कॉमर्स कॉलेज फोर्ट मुंबई' येथे 'महाराष्ट्र दलित साहित्य संघाच्या नाट्य शाखे'तर्फे अण्णाभाऊंच्या *इनामदार* या नाटकाचा उद्घाटन समारंभ प्रसंगी अण्णाभाऊ म्हणाले,'राष्ट्रउन्नतीसाठी निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांना ही नाटिका सुपूर्द केले. कारण ते मानवतावादी आंबेडकरी निष्ठावंत कार्यकर्ते होते.
1956 नंतर अण्णाभाऊ आंबेडकरवादी बनले. इथून पुढील आयुष्यात त्यांनी साहित्य रूपाने व शाहिरीच्या माध्यमातून आंबेडकरवाद प्रचार प्रसाराचे कार्य केले डॉ. अण्णाभाऊंनी *"बुद्धाची शपथ*" नावाची कथा लिहून तथागत गौतम बुद्धाला वंदन केले अण्णाभाऊंनी "*मरीआईचा गाडा*"नावाची कथा लिहून अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला. *प्रायश्चीत्त* नावाची कथा लिहून व्यसनाधीनता व त्याचे परिणाम जगासमोर मांडले.
*संयुक्त महाराष्ट्राची चळवळ* गतिमान करून संपूर्ण महाराष्ट्र जागृत केला मुंबई ही महाराष्ट्रात राहिली पाहिजे मुंबईसह महाराष्ट्र राज्य झाले पाहिजे यासाठी महाराष्ट्रभर पोवाडे शाहिरीच्या माध्यमातून "*माझी मैना गावावर राहिली.....*" या गीताच्या माध्यमातून तसेच "लाल बावटा कलापथक" मध्ये शाहीर अमर शेख, कॉ. दत्ता गव्हाणकर, यांच्या सोबत महाराष्ट्र जागृत केला. शेवटी मुंबईसह महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी जनतेचा दबाव गट निर्माण करून मुंबईसह महाराष्ट्र अण्णाभाऊंनी निर्माण केला. सोबतच कोम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे पण सहकार्य अण्णाभाऊंना मिळाले.
"*स्मशानातील सोनं*"या कथेच्या माध्यमातून या देशातील कामगार वर्गाचे प्रतिनिधीक रूप जगाला दाखवून दिले आहे. येथील भांडवलदारी व्यवस्थेने गरिबांचा संसार उघड्यावर टाकला. त्यांचे शोषण केले. त्यांच्याकडे कुशल काम करण्याचे कौशल्य असूनही येथील व्यवस्था त्यांच्या हाताला काम देत नाही. तरीपण हा बहुजननायक ,वीर, बलवान धैर्यवान, चारित्र्यसंपन्न आहे. स्वाभिमानी, स्वावलंबी ,नीतिमान आहे. कुटुंबाची होणारी उपासमार भागवण्यासाठी शेवटी "स्मशानातील सोनं "म्हणजे मढ्याच्या तोंडातील सोनं घेऊन किंवा स्माशानातील राख चाळून त्यातून सोनं मिळवतो आणि त्यातूनच कुटुंबाचा चरितार्थ चालवतो. असे सत्यवादी नायक अण्णाभाऊंनी जगासमोर मांडले.
*डॉ.अण्णाभाऊंचा देशवासीयांना अंतिम संदेश*
डॉ. अण्णाभाऊ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना आपल्या देशातील मनुवादी व्यवस्थेने आपल्या देशातील लोकांवर विषमतावादी, जातीयवादी व्यवस्था लादून ,भेदभावपूर्ण वागणूक दिली असे सांगतात. या देशातील संपूर्ण बहुजन समाजाच्या समस्यांचे, दुःखाचे मूळ येथील धर्मव्यवस्थेत असून त्या गुलामगिरीतून आपण मुक्त व्हावे असा संदेश दिला आहे. अण्णाभाऊ म्हणतात डॉ. बाबासाहेबांनी बहुजन समाजाला गुलामगिरीतून मुक्त केले आहे. डॉ. बाबासाहेबांनी संविधान रूपाने सर्व मानवीहक्क प्रदान केले आहेत. स्वउद्धाराची संधी निर्माण करून दिली आहे.
*जग बदल घालुनी घाव | सांगून गेले मला भीमराव* |
*गुलामगिरीच्या या चिखलात |रूतून बसला का ऐरावत* |
*अंग झाडूनी निघ बाहेरी|घे बिनी वरती घाव*||
म्हणजेच धर्म व्यवस्थेने लादलेली जाती व्यवस्था ,विषमता ,भेदभाव, अंधश्रद्धा अशा अनेक प्रकारच्या गुलामगिरीत या देशातील बहुजन समाज जो संख्येने 85% जनसमुदाय आहे. तो या गुलामगिरीच्या चिखलात फसून बसला आहे. सर्वांनी अंग झाडून पहिल्या फळीचे सैनिक होऊन या व्यवस्थेवर घाव घालून मुक्त व्हावे ,असा मूलमंत्र डॉ.बाबासाहेब देतात असे अण्णाभाऊ सांगत आहेत.
*धनवंताने अखंड पिळले | धर्मांधांनी तसेच छळले*|
*मगराने जणू माणिक गिळले | चोर जाहले साव*||
या देशातील भांडवलदार लोक आणि धर्मांध लोकांनी बहुजन समाजाचे शोषण केले. त्यांचा अखंड छळ केला आहे. मान, सन्मान ,स्वाभिमान, शस्त्र ,संपत्ती या सर्वांवर बंदी घालून बहुजन समाजाला अधिकार वंचित केले आहे, शिक्षण बंदी घालून अडाणी, अज्ञानी ठेवले आहे. विविध अंधश्रद्धा पसरवून बहुजन समाजाला दारिद्र्यात लोटले व स्वतः मात्र ऐतखाऊची औलाद बनून सर्व फस्त करून मगरीसारखे शांत पडून आहेत .स्वतः चोर असलेले हे भांडवलदार धर्मांध लोक ,स्वतः पुढारी होऊन चांगुलपणाचा मुखवटा लावून साव होऊन बसले आहेत यांच्यापासून आपण सावध व्हावे असा संदेश अण्णाभाऊ देत आहेत.
*ठरवून आम्हा हीन कलंकित| जन्मोजन्मी करून अंकित*|
*जिणे लादूनी वर अवमानित| निर्मुन हा भेदभाव*||
अण्णाभाऊ सांगत आहेत की, आम्हा बहुजन समाजाला येथील धर्मांधशक्तीने हीन, कमी दर्जाचे लेखले आहे. जातीव्यवस्था निर्माण करून चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण करून, आम्हाला हजारों जातीत विभागून उच्चनीचतेची भावना निर्माण केली. धर्माची बंधने लादून आम्हाला अधिकार वंचित केले. सर्व शूद्रांना , जातीची बंधने लादून अंकित केले आहे. त्या आधारेच स्पृश्य- अस्पृश्यता निर्माण करून अपमानित जीवन आमच्या वाट्याला लादले आहे . हा भेदभाव धर्मव्यवस्थेने निर्माण केला आहे. या व्यवस्थेला लाथाडून आपण डॉ. बाबासाहेबांच्या संविधानिक मार्गाने चालावे असा संदेश अण्णाभाऊ देतात.
*एकजुटीच्या या रथावरती| आरुढ होऊन चल बा पुढती*|
*नव महाराष्ट्र निर्मून जगती| करी प्रकट निज नाव*||
अण्णाभाऊ म्हणतात ,आपल्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांचा मंत्र हा एकमेव उपाय आहे. बाबासाहेब मंत्र " शिका ,संघटित व्हा ,संघर्ष करा!" म्हणून अण्णाभाऊ सांगत आहेत, बंधूंनो !आपली एकजूट हीच आपल्या यशाचे गमक आहे. आपल्या उद्धारासाठी बाबासाहेबांचा संदेश प्राणपणाने जगला पाहिजे. त्यातूनच आपला नवीन जन्म . नवीन नाव मिळणार . नव्याने आपली ओळख निर्माण करू असा संदेश अण्णाभाऊ देत आहेत.
*क्रांतीकारक अण्णाभाऊ साठे*
15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री आपल्या देशाला स्वातंत्र्य देऊन इंग्रजी सत्ता सत्तेची सूत्रे मनुवादी ,भांडवलदार लोकांच्या हातात देऊन जात आहेत. केवळ उच्चवर्णीय लोकांच्या हातात सत्तेची सूत्रे जात आहेत.यामध्ये सामान्य माणसांचे कल्याण दिसत नाही.म्हणून देशातील जनतेला स्वातंत्र्य मिळाले नाही. अजूनही धर्मव्यवस्था सबळ आहे. जातीव्यवस्था प्रबळ आहे. विषमता, भेदाभेद कायम आहे. हे खरे स्वातंत्र्य नाही म्हणून अण्णाभाऊने 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई येथे हजारों लोकांच्या उपस्थितीत मोर्चा काढला,त्या मोर्च्यात"*यह आजादी झुठी है, देश की जनता भुखी है*"| अशी क्रांतिकारी घोषणा अण्णाभाऊ साठे यांनी दिली.
*अण्णाभाऊ साठे विविध भूमिकेत लोकशाहीर ,कलावंत ,नायक ,नट ,कादंबरीकार, लोकनाट्याचे जनक, शिवशाहीर, कथाकार, चित्रपट निर्माते, सत्यशोधक, विज्ञानवादी, क्रांतीकारी कामगार नेते, जागतिक कीर्तीचे साहित्यिक,रशियामध्ये पुतळा असलेले एकमेव साहित्यिक, चित्रपटांचे दिग्दर्शक ,मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, डॉ. बाबासाहेबांवर निष्ठा असलेले निष्ठावंत आंबेडकरवादी. लावणी ,पोवाडे, लिहून जागतिक दर्जाचे साहित्य वांग्मयीन साहित्य निर्माण करून भारताचा जगात नावलौकिक केला.अण्णाभाऊंनी आपल्या देशाची पताका जगभर पसरवली. अशा महान क्रांतिकारक ,जगविख्यात साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊंना भारत सरकारने "*भारतरत्न*" हा सर्वोच्च नागरी पुरस्कार द्यावा. ही मागणी देशवासियांकडून होत आहे.
डॉ. अण्णाभाऊंच्या नावाने विद्यापीठ असावे.
डॉ. अण्णाभाऊंच्या जन्मगावी वाटेगाव येथे आणि चिरागनगर ,घाटकोपर मुंबई येथे जागतिक दर्जाचे डॉ. अण्णाभाऊंचे स्मारक व्हावे. "*डॉ. अण्णाभाऊ साठे लोककला विद्यापीठ*" स्थापन करावे. *डॉ. अण्णाभाऊ साठे लोककला लोकसाहित्य संशोधन केंद्रे* स्थापन करावेत. डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने देश पातळीवर पुरस्कार सुरू करावा व तो साहित्यिकांना देण्यात यावा. डॉ.अण्णाभाऊ साठे दलित साहित्याचे जनक आहेत.त्यांचा जन्मदिन "मराठी भाषादिन" म्हणून साजरा करावा.अश्या विविध भावना भारतीय जनमानसांच्या आहेत तश्या मागण्या आहेत. यासाठी वेळोवेळी शासन दरबारी निवेदने देण्यात आले आहेत. तेव्हा शासनाने अण्णाभाऊंना "भारतरत्न" हा पुरस्कार देऊन या 104 व्या जयंती दिनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करावा हीच जनतेकडून अपेक्षा .
*अण्णाभाऊ मनामनात, जयंती घराघरात*
माझा देश बंधूंनो अण्णाभाऊ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांच्या जनतेच्या मनावर राज्य करत आहेत. मित्रांनो डॉ. अण्णाभाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी अण्णाभाऊंचा संदेश समजून घ्यावा त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या शिकवणुकीप्रमाणे वागावे असे सांगितले आहे. त्या शिकवणुकीचा अंगिकार करावा. आपण प्राणपणाने आंबेडकरवाद स्वीकारावा. बौद्ध बांधवांच्या सोबत चालावे; कारण 1956 च्या नंतर ते आज पर्यंत बौद्ध बांधवांनी जी तुफान वेगाने प्रगती केली आहे, त्याचे कारण म्हणजे डॉ. बाबासाहेबांच्या शिकवणुकीचा स्वीकार हेच होय. डॉ.बाबासाहेब हे *सिम्बॉल ऑफ नॉलेज* आहेत. ते प्रेरणास्त्रोत आहेत. डॉ.बाबासाहेबांचे नाव हे अवकाशातील एका ताऱ्याला दिले आहे तसेच डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे नाव पण अवकाशातील एका ताऱ्याला नुकतेच देण्यात आले आहे.
"मातंग" या शब्दाचा अर्थ "हत्ती" असा होतो. हत्ती हे बुद्धाचे प्रतीक आहे. आपण मातंगानाच "अंबुज" पण म्हणतो अंबुज याचा अर्थ ' कमळ 'असा होतो. बुद्धाच्या जीवनात कमळाचे विशेष महत्त्व आहे. ते बौद्ध परंपरेचे प्रतीक आहे. बुद्धाचा समकालीन मातंग राजा प्रसेंनजित हा पण
बुद्धांचा अनुयायी झाला होता. याचा अर्थ आपण सर्वजण एकेकाळचे बौद्ध आहोत. राजेलोक आहोत. एवढेच नव्हे तर तथागत गौतम बुद्धांनी भारत बौद्धमय केला होता. नंतरच्या काळात परत एकदा सम्राट अशोकाने भारत हा बौद्धमय राष्ट्र केला होता. भारत हा जम्बुद्वीप अफगाणिस्तान पर्यंत बौद्धमय होता. आजही देशातील विविध ठिकाणी होणाऱ्या उत्खननातून केवळ बौद्ध मूर्ती बाहेर येते आहेत याचा अर्थ भारत हा एकेकाळी बौद्ध राष्ट्र होता. नंतरच्या काळात आपल्या देशात धर्मांधशक्तीने धर्माच्या, मनुस्मृतीच्या माध्यमातून प्रतिक्रांती करून आपल्याला आता दारिद्र्यरेषेत आणून ठेवले आहे.
आता आपण डॉ. बाबासाहेबांच्या 'रूल बाय पेन अँड ब्रेन' च्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून मोक्याच्या जागी जायचे आहे. हेच डॉ. बाबासाहेब आणि डॉ. अण्णाभाऊंचे स्वप्न आहे. ते आपणास ज्ञानाचे घाव घालून पुन्हा बुद्धिसामर्थ्य व प्रतिभेच्या बळाने या देशाचे राज्यकर्ते व्हायचे आहे. हीच डॉ. अण्णाभाऊंच्या 104 व्या जयंतीदिनी त्यांच्या चरणी मंगलमय मानवंदना.
डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य परिवर्तनाचे ,जनजागृतीचे,सामाजिक सुधारणेचा ध्यास असलेले,नवीन समाज आणि राष्ट्र निर्मितीचे साहित्य आहे.म्हणून त्यांना 27 नोव्हेंबर 2022 रोजी महात्मा गांधी मेमोरियल युनिव्हर्सिटी (MGMU) छत्रपती संभाजीनगर या विद्यापिठाने त्यांच्या पहिल्याच दीक्षांत समारंभात अण्णाभाऊंना मरणोत्तर D. LIT (Doctor of literature) पदवी प्रदान केली.तेव्हापासून आपण डॉ.अण्णाभाऊ साठे असा उल्लेख करत आहोत.डॉ अण्णाभाऊंना अपेक्षित तरुण,समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण योगदान देऊया,आपला पण विकास करूया,त्यासाठी एकजुटीचा रथावर एकत्र येऊया. अण्णाभाऊंचा संदेश आपल्या जीवनात अनुकरण करणे हीच खरी अण्णाभाऊंची जयंती आहे असे माझे मत आहे.
लेखक
-अनिल देवराव कांबळे , शिक्षक
जि.प.हा.हुंडा( गं.प.) नांदेड
जिल्हाउपाध्यक्ष,
स्वतंत्र समता शिक्षक संघ नांदेड
सदस्य सचिव,
प्रबुद्ध सेवाभावी संस्था, नांदेड
Mob.9403524852





No comments:
Post a Comment