सदाशिव पुंडलिक पाटील यांचे निधन ; मुंबईत गुरुवारी (ता.9) रोजी रात्री 10 वाजता अंत्यसंस्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, November 9, 2023

सदाशिव पुंडलिक पाटील यांचे निधन ; मुंबईत गुरुवारी (ता.9) रोजी रात्री 10 वाजता अंत्यसंस्कार

 


मुंबई : समतानगर , कांदिवली (पूर्व) येथील रहिवाशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा आंबेडकरी विचाराचे पाईक सदाशिव पुंडलिक पाटील ( वय 77 वर्षे ) यांचे बुधवारी (ता.8 ) रात्री 9.20 वाजता एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता  निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर  गुरुवारी (ता.9) रोजी रात्री 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

      त्यांचे पश्चात पत्नी शकुंतला , मुकुंद, जीवक ,सुशिल ही तीन मुलगे , रत्नमाला गायकवाड व उज्ज्वला प्रमोद कानिंदे (गोकुंदा,किनवट) ह्या दोन मुली , सुना, जावई , नातवंडं असा मोठा परिवार आहे.

      त्यांनी अनेक वर्षे वास्तव्य केलेल्या 705 / बी विंग , मॉर्निंग स्टार , तीन डोंगरी , गोरेगाव येथील निवास स्थानापासून गुरुवारी (ता. 9 नोव्हेंबर 2023 ) रात्री 10 वाजता प्रेतयात्रा निघणार असून ओशिवरा , जोगेश्वरी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

     मौजे चिखली (बु) ता. किनवट जि.नांदेड येथे सर्वसाधारण कुटूंबात  त्यांचा जन्म झाला. गावातीलच जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण त्यांनी घेतले. त्यानंतर औरंगाबाद येथील नागसेनवन परिसरातील मिलिंद विद्यालय , महाविद्यालय येथे माध्यमिक ते बी. एस्स.सी. पर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन पदस्पर्शाने आणि कार्याने पावन झालेल्या या भूमित त्यांनी अनेक वर्षे वास्तव्य केल्याने आंबेडकरी विचार त्यांच्यात ऋजला. त्यानंतर मुंबईत गोदीत ते कामाला लागले. 

     तिथे गेल्यानंतर त्यांनी गोरेगावातील तीन डोंगरी चाळीत वास्तव्य केले. तिथेच वर्दळीच्या रस्त्यावर प्लंबरसाठी लागणाऱ्या साहित्याचे दुकान (हार्डवेअर ) थाटले. मराठवाडा व विदर्भातील पाहुणे मंडळीतील अनेक होतकरू तरुण कामाच्या शोधात मुंबईत यायचे. त्यांना तिथे कुठे आसरा मिळायचा नाही. तेव्हा सदाशिव पाटील त्यांना आपल्या घरी आणायचे त्यांना जेवू घालायचे व आपल्या दुकानातच त्यांची रात्रीला राहायची जागा करून द्यायचे. त्यांच्या-त्यांच्या शैक्षणिक स्थितीनुसार व अवगत कौशल्यानुसार कामे शोधून द्यायचे. नाहीच कुठे जमलं तर प्लंबरचं काम शिकवायचे व कामे लावून द्यायचे. आज मुंबईत त्यांच्याच आश्रयाने मोठी झालेली अनेक माणसं आहेत. 

     आपली नोकरी सांभाळत ते धम्म कार्यातही अग्रेसर होते. अनेक ठिकाणी झोपडपट्टी भागत ते घर विकत घ्यायचे गावाकडील आलेल्या एखाद्या होतकरू नातलगास तिथे ठेवून त्याला स्थिरस्थावर करायचे. आपल्या पाहुण्यांनी मराठवाड्यात शिक्षण संस्थांचा बोधीवृक्ष वाढवल्याचं त्यांना अप्रूप वाटायचं. मग त्यांनीही एक नव्हे दोन माध्यमिक शाळा सुरु केल्या. चाळीतील आपल्याच घरी ते शाळा भरवीत. प्रशिक्षित शिक्षक त्यांनी नेमले. त्यांना स्वतःच पगार द्यायचे. अनेक वर्षे असेच चालले. शासनाची मान्यता न घेताच त्यांनी ह्या शाळा चालविल्या होत्या. नंतर त्या अनधिकृत शाळा त्यांना बंद कराव्या लागल्या. यात त्यांना प्रचंड आर्थिक भार सोसावा लागला.

     निवृत्ती नंतर आपल्या गावी त्यांनी कृषी केंद्र उघडलं. बी-बीयाणे , खते , फवारणीसाठी औषधे अशा मुबलक सुसज्ज साहित्याने ते दुकान थाटले होते. याच गावचे मूळनिवासी असून सुद्धा  लाकडी फर्निचरच्या व्यवसायाने प्रसिद्ध असलेल्या गावातील लोकांच्या व्यवहाराचा त्यांना अंदाज नव्हता. त्यामुळे लोकांनी दुकानातील माल उधारीवर भरमसाठ खरेदी केला. सुगीवर शेतातील माल किंवा रक्कम देण्याचा वायदा त्यांनी पाळला नाही. त्यामुळे त्यांना येथेही प्रचंड आर्थिक ताण पडला. काही चांगलं गावाकडे करावं या उद्देशाने आलेले पाटील नाईलाजाने पुनःश्च मुंबईत परतले. सिद्धार्थनगर गोकुंदा येथे राष्ट्रीय महामार्गालगत दोन मजली इमारत बांधली येथे धर्माथ दवाखाना त्यांना सुरु करावयाचा होता. परंतु  मागील काही दिवस हृदय विकाराच्या तीव्र आजाराने ते ग्रस्त होते. त्यांच्यावर बायपास  शस्त्रक्रिया सुद्धा करावी लागली होती.

     त्यांनी महाराष्ट्र , तेलंगाणा व आंध्रप्रदेश फिरून वयोवृद्ध  नातलगांच्या भेटी गाठी घेऊन वंशावळी तयार केली. पूर्वीच्या भाटाकडे असलेल्या भाटासारखी मागील तीन पिढ्या पासून ते आजच्या वर्तमानापर्यंतची ही वंशावळी एक ऐतिहासिक दस्तऐवज ठरला आहे. त्यांच्या अचानक जाण्याने अत्यंत हुशार , दिलदार, उद्योगी , स्पष्टवक्ता काळाच्या पडद्याआड गेल्याने आंबेडकरी चळवळीचं न भरून निघणारं नुकसान झालं आहे. त्यांच्या पावन स्मृतींना 'निवेदक न्यूज' परिवाराची विनम्र आदरांजली.

अनेकांनी वाहिली आदरांजली

           सदाशिव पुंडलिक पाटील हे अत्यंत चांगले व्यथिमत्व होते. माझे ते आदरणीय स्थान आहेत. त्यांनी मला मुंबईत स्थिरस्थावर होण्यासाठी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. खंबीर साथ दिली. आम्ही सदैव त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन .

-गोविंद कानिंदे ,पवई , मुंबई



           सदाशिव पुंडलिक पाटील हे असाधारण व्यक्ती महत्त्व काळाच्या आड गेल.  सत्तर अंशी च्या दशकातील एक समाजातील लोकांचा मुंबईतील अधार. गावातील बेरोजगार तरुणांना मुंबईला घरी ठेवून त्याला नोकरीला लावण्यासाठी प्रयत्न करायचे. आडल्या नडल्याला मदत कराचे. यावी बारकाईने वागणारा माणूस परंतु आलेल्या पाहुण्यांना स्वखर्चाने मुंबई दाखवायचे. त्या काळात मुंबई ला मुक्कामी राहाने मोठी गोष्ट होती परंतु हे त्या माणसाची सगळी उठबैस करायचे.मी ही एक त्याचा लाभार्थी आहे.आताच्या पिढीला ते करने दुरापास्त झाले आहे. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. माझ्या संपूर्ण कानिंदे परिवाराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो.                  

-अभि.भरतकुमार कानिंदे ,

बानाई , नांदेड


             स्मृतिशेष सदाशिव पाटील हे बौध्द धम्माचे अभ्यासक,पाली भाषेचे जानकार, मुंबईमध्ये स्वतः नौकरी निमित्त गोरेगाव, मुंबई येथे स्थायिक होऊन नौकरी करत करत हार्डवेयर चे दुकान चालवण्याचा व्यवसाय देखिल करत असत.हे दुकान म्हणजे गावाकडून कामासाठी आलेल्या कामगारांचे आश्रयस्थान आसायचे.कोणालाही मुंबईमध्ये आश्रय नसेल तर स्मृतिशेष सदाशिव पाटील यांचे दुकान. अतिशय मोठ्या मनाचा,प्रेमळ,आदराने पूर्ण परिवाराची चौकशी करुन आदरातिथ्य करणार दुर्मिळ व्यक्तिमत्व , गावागावात भेट देऊन सर्वांची विचारपुस करणारे,खास करुन वयोवृद्धाची भेट घेऊन त्यांच्याशी गप्पागोष्टी करुन त्यांचे फोटो घेऊन आपल्या संग्रही ठेवणारे,माणसांची मानुसकी, सामाजिक भान जोपासणार व्यक्तिमत्व होत.बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन, बौद्ध धम्माच्या मार्गावर मार्गक्रमण करणार दुर्मिळ व्यक्तिमत्व होत.त्यांनी केवळ आपला वेळ नौकरीतच घातला नाही तर नौकरीतून मिळालेल्या फावल्या वेळेत अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबिवण्याचा प्रयत्न केले.शैक्षणिक संस्था उघडून सामाजिक क्रांति घडविण्याची त्यांची फार मोठी महत्वकांक्षा होती.त्या दृष्टिकोणातून त्यांनी खूप मोठे प्रयत्नही केले.त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी जोगेश्वरी, गोरेगाव येथे शाळेचिही उभारणी केली होती.अनेक वर्ष शाळा चालवूनही त्यांना त्यामध्ये यश प्राप्त झाले नाही.आभ्यासाची आवड, भरपूर मेहनत घेण्याची तयारी ,निरव्यसनामुळे कधिही थकवा न जानवता नौकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर देखिल कलीना विद्यापीठात एम ए-पालीचे त्यांनी शिक्षण घेतले.सामाजिक क्षेत्राचे भान आणि सोयरे-संबंधाची परिपूर्ण जान असल्याने समाजामध्ये मोठ्या प्रमाणात प्राबल्य असणार व्यक्तिमत्व आज अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने,आज जी पोकळी निर्माण झाली,ती कधिही भरुन न निघणारी अशीच आहे.माणूस गेल्यानंतर त्याची खरी किंमत कळते.आशा या गुणी व्यक्तिमत्वास भावपूर्ण आंदराजली 

-विनायक भगत आणि परिवार, मुंबई

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News