बँडिट क्वीन -दासू भगत - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, July 26, 2024

बँडिट क्वीन -दासू भगत

 



चित्रपटातील हिंसाचार अनेक संस्कृती रक्षक प्रेक्ष्कांना  भयंकर वाटतो जो खोटाखोटा असतो. मात्र वास्तवातील महाभयंकर हिंसा व अत्याचाराने तर आता इतका कळस गाठला आहे की चित्रपटातील हिंसा वा अत्याचार लाजुन काळा ठिक्कर पडावा... प्रकर्षाने  फुलनदेवी आठवली. कारण  २५ जुलै यानुषंगाने दासू भगत यांच्या शब्दातील वास्तव येथे देत आहोत. -संपादक


प्रसंग : वास्तवात घडलेला.   

पात्रे : सर्वच प्रत्यक्षातील अस्सल माणसं.

स्थळ : उत्तरप्रदेशातील एक गोरहा नावाचे छोटे खेडे . 

वेळ : अर्थातच वाईट. 

नेपथ्य : भीषण दारीद्र्य.

संगीत : परिस्थितीने पिळवटलेले.  

रंगभूषा : धुळीने बरबटलेले चेहरे.

नायिका : जात उतरंडीतील सर्वात खालच्या स्तराची.

नायक : जात उतरंडीतील वरच्या स्तरातील.

खलनायक : परंपंरावादी सभेावताल.


       जन्माला येणे ही झाली नैसर्गिक प्रक्रिया ती निसर्ग सदैव पार पाडतो….मग ते नर मादी कोणत्याही वर्ण,रंग, धर्म,जात, वंशाचे असोत….जीवनाचा प्रवास कुठेही सुरू होऊ शकतो. मात्र तो अखेरपर्यंत सुरक्षित राहील याची हमी निसर्ग घेत नाही ती माणूस नावाच्या प्राण्याला आणि संस्कृती नावाच्या अजब घटकाला घ्यावी लागते आणि इथेच सर्व घोळ होतो……………….. 


देवीदिन मल्लाह आणि मूलाबाई यांच्या पोटी स्त्री जातीची दोन मूलं जन्माला आली. तशी या जोडप्यानां मुलं बरीच झाली पण दारीद्रय, कुपोषण व जात नावाच्या खऱ्याखुऱ्या चेटकीणीने ती सर्व उचलून नेली. ही दोन जगली. कशासाठी जगली? तर आयुष्यातील सर्वात दाहक चटके सोसायचे होते. आजही स्त्री भोगण्यासाठीच जन्म घेते काय? असे वाटत राहते. अपवाद  हे अपवादच असतात..


पोर दिसायला रंगरूपानं कितीही वाईट असो जन्मदात्यासाठी ते विलक्षण सुंदर व लोभसच असते. तो त्यांच्या रक्तमासांचा अंश असतो.  देवीदिन मल्लाह आणि मूलाबाई या जोडप्याची प्रचंड संपत्ती म्हणजे जुन्या लिंबाच्या झाडांनी भरलेले एक एकर खरबरीत शेत. देवीदीनचे वडील गेले अन् भावाचा मोठा मुलगा मायादिन मल्लाहने शेतातील लिंबाची झाडे तोडण्याचा निर्णय घेतला. कारण ती झाडे जी फळे देत ती कडू होती. कडू  नाही आवडत आम्हाला मग ते फळ असो की सत्य. देवीदिनने हो नाही करत होकार दिला….त्याच्या दोन्ही मुली त्यावेळी खूप मोठ्या नव्हत्या पण धाकटीला हे काही आवडलं नाही. तिच्या डोक्यात आलं आपल्याला सख्खा भाऊ नाही याने आपली जमीन हडपली तर? यातुनच मग कुरबुरी सुरू झाल्या. धाकटी भारी फाटक्या जीभेची काही पण बोलायची. अगदी बाजारात पण चोर म्हणायची चुलत भावाला. एकदा तर शेतातच धरणे देऊन बसली. खंडाजंगी झाली. भावाने हात उगारला तर हिनेही हात उगारला. भाऊ असला तरी शेवटी पुरूषच. अहंकारा समोर नाती क्षुद्र असतात.  त्याने तिच्या डोक्यात वीटा घातल्या…ती तिथेच बेशुद्ध पडली. रक्तबंबाळ होऊन…


या घटने नतंर काही महिन्यानी जेव्हा ती अकरा वर्षाची झाली तेव्हा परंपंरेच्या ओझ्याखाली दबलेल्या मायबापाने कर्तव्य म्हणून लांबच्या गावातील एक पोरगा बघून तिचं लग्न लावून दिलं. पुट्टीलाल मल्लाह हे त्याचे नाव. त्याची कर्तबगारी म्हणजे तो तिच्यापेक्षा दुपटी तिप्पट मोठा होता आणि त्याचेकडे सायकल सारखे वाहन पण होते म्हणजे श्रीमंत होता.  ११ वर्षाच्या मुली बरोबर संसार करायचा म्हणजे काय तर दिवसा मारहाण व रात्री लैगिंक सुखासाठी छळ. आगोदरच ही पोरगी मूँहफट तिने काही त्याला शिरस्त्यप्रमाणे पती परमेश्वर वगैरे मानले नाही आणि परत आई बापाच्या घरी परतली. अशी बंडखोरी आमच्या संस्कृतीला मान्य नसते हे त्या पोरीला अजिबात समजत नव्हतं. 


घरात परत तिच्या वरून खटके उडू लागले. चुलत भाऊ मायादिन तर आगोदरच दुखावलेला त्यातला पुरूष मग पुन्हा जागा झाला. बस्स हीला चांगलाच धडा शिकवायचा…… हरामखोर साली.. मला भिडते काय???? तो थेट पोलिसात गेला आपल्या घरातून सोन्याची अंगठी व घड्याळ चोरले म्हणून तक्रार दिली. ग्रामीण भागातील पोलिस खूपच कर्तव्यनिष्ठ असल्यामुळे ते तातडीने तिच्या घरी पोहचले. तिला उचलून थेट चौकीत आणले…पूढचे तीन दिवस त्यांची चंगळच झाली….पोरीला जाणीव झाली नवरा आणि यांच्यात तसूभरही फरक नव्हता. स्त्रीदेह कितीही लहान असो त्याच्याशी कसे झोंबायचे ही कला ‘पौरूष’ ठासून भरलेल्या पुरूषानां चांगलीच येते….तीन दिवसानी तिला समज देऊन त्या समजदार पोलिसांनी तिला सोडून दिले……… हा प्रसंग या पोरीच्या मेंदूत घट्ट बसला. याच प्रसंगाने पूढे तिच्या आयुष्यात इतकी वादळं निर्माण केली की उत्तरप्रदेश व मध्यप्रदेश दोन्ही राज्ये तर ढवळून निघालीच पण अख्खा भारतही घुसळून निघाला……….


या पोरीचे नाव आई बापाने आवडीने ठेवले होते ‘फुलन’. काळाने तिच्यावर इतके अनन्वित अत्याचार केले अन् ती झाली फुलनदेवी…… जिच्यावर एकावेळी २२ पुरूषांनी अनैसर्गिक  बलत्कार करून आपल्या पुरूषत्वाचा गौरव केला. इतकं सगळे अत्याचार होऊन ती जीवंत राहिली. हे सर्व अनाकालनीय आहे. 

फुलनदेवीच्या १९८३ मधील आत्मसमर्पणा नतंर  १० वर्षांनी १९९३ मध्ये माला सेन यांचे ‘बँडिट क्वीन: ट्रू स्टोरी ऑफ फुलन देवी’हे तिच्या आयुष्याची कथा सांगणारे पुस्तक बाजारात आले. या पुस्तकावर बेतलेला “बँडीट क्वीन” शेखर कपूरने १९९६ मध्ये प्रदर्शीत केला. ज्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शीत झाला त्या दिवशी भारत आपला ४६ वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत होता….हा योगायोग मुळीच नसावा…  मात्र या  चित्रपटाला स्वत: फुलनदेवीने तीव्र आक्षेप घेतला. यातील अचुकतेवर विवाद उभा केला व भारतात हा चित्रपट प्रदर्शीत होऊ नये म्हणून संघर्षही केला. इतकेच नाही तर एका चित्रपटगृहा समोर आत्मदहन करण्याची चेतावणीही दिली होती. मात्र चित्रपट मागे घेतला नाही. अखेर चॅनेल-४ ने ४० हजार डॉलर्स फुलनदेवीला देऊन हे प्रकरण मिटवले.


“बँडीट क्वीन” बघतानां आजही तो अंगावर येतो व मेंदू बधीर होतो. कायदे कस्पटासमान दोरीवर वाळत घातल्या सारखे वाटतात. चित्रपटाचे शुटींग व त्या त्या लोकेशनवर जिथे फुलनदेवीचा आयुष्यपट घडला करण्यात आले. सीमा विश्वास या अभिनेत्रीने फुलन मनापासून साकारलीय. या चित्रपटाने अतंराष्ट्रीय स्तरावर फुलनदेवीची ओळख निर्माण केली. लेखिका व पत्रकार अरूधंती रॉय यांनी “द ग्रेट इंडियन रेप ट्रिक”  या आपल्या लेखात- "restage the rape of a living woman without her permission" या स्त्रींयाच्या अधिकाराचा मुद्दा उपिस्थत केला होता. दिग्दर्शक शेखर कपूरवरही आरोप केले होते.


फुलनदेवी विना मुकदमा ११ वर्षे तुरूंगात राहिली. १९९४ मध्ये मुलायम सिंह यादव यांच्या शासनाने तिची तुरूंगातून सुटका केली. नंतर १९९६ मध्ये उत्तर प्रदेशतील मिर्झापूर येथून फुलनदेवी खासदार म्हणून निवडून आल्या.  दिल्लीच्या तिहार जेल मध्ये बंद असलेला अपराधी शेर सिंह राणाने तिची दिवसा ढवळ्या तिच्या निवासस्थानी हत्या केली. विशेष म्हणजे हत्येच्या आगोदर काही दिवसापूर्वी  खोट्या पद्धतीने जामिन मिळून राणा बाहेर आला व हत्ये नंतर गायब झाला.


चित्रपटातील हिंसाचार अनेक संस्कृती रक्षक प्रेक्ष्कांना  भयंकर वाटतो जो खोटाखोटा असतो. मात्र वास्तवातील महाभयंकर हिंसा व अत्याचाराने तर आता इतका कळस गाठला आहे की चित्रपटातील हिंसा वा अत्याचार लाजुन काळा ठिक्कर पडावा...


आज प्रकर्षाने  फुलनदेवी आठवली. कारण आज २५ जुलै. 


-दासू भगत

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News