महाआवास अभियानाच्या अंमलबजावणीतून लाभार्थ्याच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन #महाआवास अभियान राज्यस्तरीय कार्यशाळा शुभारंभ व पुरस्कार वितरण सोहळा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Thursday, November 23, 2023

महाआवास अभियानाच्या अंमलबजावणीतून लाभार्थ्याच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन #महाआवास अभियान राज्यस्तरीय कार्यशाळा शुभारंभ व पुरस्कार वितरण सोहळा

 


मुंबई, दि. 23 : प्रत्येकाच्या आयुष्यात स्वत:चे घर असावे, हे स्वप्न असते. गरीब, समाजाच्या शेवटच्या घटकातील व्यक्ती यांना, तर घरकुल म्हणजे स्वप्न असते. ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी केंद्र व राज्य शासन घरकुलांच्या विविध योजना राबविते. या योजनांच्या समन्वयातून राज्य शासनाने महाआवास अभियानाचा शुभारंभ केला आहे. महाआवास अभियानाच्या अंमलबजावणीतून लाभार्थ्याच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी आज केले.

    यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात महाआवास अभियान 2023-24 राज्यस्तरीय कार्यशाळा शुभारंभ व सन 2021-22 चे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयेाजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामसडक योजनेचे सचिव के. पी. पाटील, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक डॉ. राजाराम दिघे उपस्थित होते.

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घरे स्वप्न असल्याचे सांगत मंत्री श्री. महाजन म्हणाले की, समाजातील अंत्योदय पर्यंत योजनांचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. गरिबांना गॅस जोडणी, नळ जोडणी, वीज जोडणी, शौचालयाची सुविधा देण्यात येत आहे. शासन समाजातील शेवटच्या घटकाला पुढे आणण्यासाठी विविध योजना राबविते. या योजनांची अंमलबजावणीची जबाबदारी यंत्रणांची आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत 50 हजार रूपयांचे अर्थसहाय्य सध्या देण्यात येते. यामध्ये 1 लाख रूपयापर्यंत वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. लवकरच ही मागणीही पूर्ण होणार आहे.

    मंत्री श्री. महाजन म्हणाले की, अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांपैकी निवारा देण्याचे चांगले काम यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने गंभीरतेने या कामाकडे लक्ष देऊन काम पूर्ण करावे. घरांचे बांधकाम दर्जेदार करावे. केवळ घरकूलच नाही, तर अन्य योजनांचा लाभसुद्धा घरकुल लाभार्थ्याला देण्यात यावा. स्वच्छतेचा संस्कार हा शालेय जीवनापासूनच रुजायला पाहिजे. देशाच्या अर्थव्यवस्थेने 10 व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. मात्र स्वच्छतेच्या बाबतीत अधिक काम करावे लागणार आहे. 

  प्रास्ताविकात प्रधान सचिव श्री. डवले म्हणाले की, महाआवास अभियान 20 नोव्हेंबर 2023 पासून 31 मार्च 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे. जागा नसलेल्या कुटुंबांना घरकुले देण्यामध्ये महाराष्ट्र राज्याची कामगिरी देशात अव्वल आहे. या अभियानाच्या माध्यमातून बांधकाम अपूर्ण असलेली, मंजूर असलेली मात्र बांधकाम सुरू नसलेली घरकुले पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.  महाआवास अभियानाबाबत सादरीकरण राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण संचालक डॉ. दिघे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान अभियान पुस्तिका, मागील वर्षाची अभियान गौरव गाथा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच अभियानाच्या माहिती पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी मोदी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात घरकुल मंजुरीपत्र देण्यात आले.

    कार्यक्रमाला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपायुक्त (विकास), ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी,  विभागीय प्रोग्रॅमर, डाटा एन्ट्री ऑपरेटर, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

सन 2021-22 चे महाआवास अभियान पुरस्कार

    विभाग : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) सर्वोत्कृष्ट विभाग प्रथम नागपूर, द्वितीय नाशिक, तृतीय पुणे, राज्यपुरस्कृत योजनेत कोकण प्रथम, नागपूर द्वितीय, पुणे विभागाने तृतीय क्रमांक पटकाविला. जिल्हे :  केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये प्रथम भंडारा, द्वितीय जळगाव व तृतीय गोंदिया हे जिल्हे असून राज्य पुरस्कृत योजनेत सिंधुदुर्ग प्रथम, भंडारा द्वितीय व गडचिरोली तृतीय आहे.

तालुके : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये प्रथम कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, साकोली जि. भंडारा द्वितीय व गगनबावडा जि. कोल्हापूर तृतीय तसेच राज्य पुरस्कृत योजनेत लाखनी, जि. भंडारा प्रथम, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग द्वितीय व कळवण जि. नाशिक तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला आहे.

  ग्रामपंचायत : राज्य पुरस्कृत योजनेत संयुक्त प्रथम क्रमांक लोरे ता. वैभववाडी जि. सिंधुदुर्ग व जिंती ता. पाटण जि. सातारा, द्वितीय क्रमांक खलंग्री ता. रेणापूर जि. लातूर, तृतीय क्रमांक खोलापूर ता. भातकुली जि. अमरावती, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) यामध्ये प्रथम क्रमांक निंबर्गी ता. द. सोलापूर, जि. सोलापूर, द्वितीय गोळवण, ता. मालवण जि. सिंधुदुर्ग व तृतीय क्रमांक पोही, ता. अंजनगांव सुर्जी, जि. अमरावती.

    बहुमजली इमारत या घटकात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये ताडगांव ता. मोहाडी, जि. भंडारा, द्वितीय लोणी बु., ता. रिसोड जि. वाशीम, तृतीय दीपकनगर ता. तुळजापूर जि. धाराशीव तसेच राज्यपुरस्कृत योजनेत प्रथम येरखेडा ता. कामठी, जि. नागपूर, द्वितीय नेवपूर, ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर आणि तृतीय क्रमांक गणेशपूर, ता. रिसोड जि. वाशीम या ग्रामपंचायतीने पटकाविला आहे.  

  सर्वोत्कृष्ट गृहसंकुले या घटकात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये प्रथम भांबुर्डी, ता. माळशिरस, जि. सेालापूर, द्वितीय मजरा (रै), ता. वरोरा जि. चंद्रपूर, तृतीय बुधला ता. कळमेश्वर जि. नागपूर, राज्यपुरस्कृत योजनेत प्रथम रायताळे, ता. जव्हार जि. पालघर, द्वितीय मोहकळ, ता. खेड जि. पुणे, तृतीय क्रमांक शेंद्रे, ता. जि. सातारा या ग्रामपंचायतीने पटकाविला आहे.

  अधिकारी व कर्मचारी यांना विशेष पुरस्कार : राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माणमधील राज्य समन्वयक डॉ. संघरत्न सोनवणे, वास्तू विशारद परमेश्वर शेलार, लेखा सहायक अंकिता राऊळ यांना मिळाला आहे.  

      विभागीय प्रोग्रॅमर पदासाठी मोहेसीन अहमद अयुब अली, जि अमरावती, जिल्हा प्रोग्रॅमर पदासाठी आशिष चकोले, जि. भंडारा, विवेक गोहील, जि. जळगांव, चंद्रकांत पाटील, जि. कोल्हापूर, जिल्हा डेटा एंन्ट्री ऑपरेटर पदासाठी प्रफुल्ल मडामे, जि. भंडारा, सुमीत बोरसे, जि. जळगांव, राजेंद्र कवडे जि. कोल्हापूर, तालुका डेटा एंन्ट्री ऑपरेटर पदासाठी सानिका चव्हाण ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग, हर्षल मेंढे ता. साकोली जि. भंडारा, उमाकांत पडवळ ता. गगनबावडा जि. कोल्हापूर, सतिश पवार ता. पारोळा जि. जळगांव, दीपक शिंगणे ता. देऊळगाव राजा जि. बुलढाणा, किसन मांजरमकर ता. भोकर जि. नांदेड, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता पदासाठी राकेश चलाख ता. आरमोरी जि. गडचिरोली, करण पाटील ता. चाळीसगाव जि. जळगांव, भूषण ठाकरे ता. मालेगांव जि. नाशिक, परिक्षित चव्हाण, ता. जत, जि. सांगली, उमेश श्रीरामे, ता. मुखेड, जि. नांदेड, पवन म्हातारमारे, ता. बाळापूर जि. अकोला यांना पुरस्कार मिळाला आहे. तसेच महाआवास अभियानातील विविध घटकांसाठी सर्वोत्कृष्ठ जिल्ह्यांना विशेष पुरस्कार देण्यात आले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News