पैनगंगातिरी : जगण्याच्या पुनर्रचनेची मांडणी करणारे स्वकथन ! डॉ. युवराज मानकर, समीक्षक, विचारवंत - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, January 15, 2024

पैनगंगातिरी : जगण्याच्या पुनर्रचनेची मांडणी करणारे स्वकथन ! डॉ. युवराज मानकर, समीक्षक, विचारवंत

 



पैनगंगातिरी : जगण्याच्या पुनर्रचनेची मांडणी करणारे स्वकथन !

                                                                      -डॉ. युवराज मानकर, समीक्षक, विचारवंत

                                                               यवतमाळ -४४५००१, 

                                                                   मोबा .९८९०४६७६१३,

                                                                   Email ID : drysmankar@gmail.com


          आंबेडकरवादी साहित्याच्या सूर्यकुळाच्या तेजाने साहित्यिकांची लेखनी दिवसेंदिवस अधिकच सकस,समृद्ध आणि धारदार होत आहे. आंबेडकरवादी साहित्य प्रवाहाचा विस्तार हा जीवनमर्माचा आविष्कार करत गतिमान झाला आहे. हा आविष्कार कविता, कथा, कादंबरी, नाटक,स्वकथन, वैचारिक , संशोधनात्मक आणि समीक्षा अशा विविध प्रकारातून झाला आहे. मुळात हा विस्तार नाही तर त्यात जीवनाच्या पुनर्रचनेचे आणि परिवर्तनाचे तत्त्वज्ञानच आहे. या साहित्य प्रकारातील सम्यक सत्याने आंबेडकरवादी साहित्याचे दालन समृद्ध केले. सर्वहिताय सत्याच्या सौंदर्याच्या उत्खननाने हा साहित्य प्रवाह वैश्विक झाला. त्याची वैश्विकता समतेच्या निळया नभाशी बंधूतेच्या अतूट धाग्याने, न्यायाच्या सुईने आणि स्वातंत्र्याने कर्तृत्वाच्या दिलेल्या आविष्काराच्या मुभेमुळे विणली गेली. बुद्धिप्रामाण्यतेद्वारा करण्यात येणाऱ्या पुनर्रचनेला आंबेडकरवाद असे म्हणतात. बुद्धी ही मानवी डोक्याच्या चौकटीत वसलेली असली आणि ती त्याची वैयक्तिक मालमत्ता असली तरी ती चौकट विहीन स्वरूपाच्या स्वभावाची असते.मानवाची ती वैयक्तिक संपत्ती असल्याने तो स्वतःच्या हितासाठी जसा तिचा उपयोग करतो तसाच तो इतरांचे भले करण्याचाही विचार करतो. खरे तर मानवी बुद्धीला कोणतीही जात,वर्ण,वर्ग आणि धर्मही नसतो. ती या सर्व कोंडवाड्याच्या अतीत असते. तिचा मूळ स्वभाव सर्वहितवादी,सर्वकल्याणकारी असाच असतो. तिच्या या मूळ स्वभावाने ती जीवनाचे नेत्तृत्व करते. ती जीवनाला अधिकाधिक उन्नत करते. त्यामुळे ती मानवाची खरी संपत्ती ठरते. ही बौद्धिक संपत्तीच मानवी जगण्याचे आणि त्याच्या नानाप्रकारच्या आविष्काराचे खरे मर्मस्थान आहे. आंबेडक रवादी साहित्याच्या आविष्काराचे प्रकाशबेट मानवी बुद्धी हीच आहे. आंबेडकरवादी साहित्य हे या बुद्धीवादी उजेडाची नानारूपाने आविष्कृत झालेली प्रकाश किरणे आहे. हा बुद्धिप्रामाण्यतेचा अग्निविलास भावनोत्कटतेची प्रतिज्ञा घेऊन कविता, कथा, कादंबरी, नाटक, स्वकथन इत्यादीतून तर बुद्धिप्रामाण्यतेने प्रदीप्त होऊन जळणारी बौद्धिक आग वैचारिक लेखन, समीक्षा या साहित्य प्रकाराचे बाप म्हणून नेतृत्व करत आहे. 

         खरे तर आंबेडकरवादी साहित्यविश्वात आयु.सखाराम घुले यांची नोंद करणे आता अटळ आहे. त्यांनी 'पैनगंगातिरी’हे स्वकथन लिहून आंबेडकरवादी स्वकथनात महत्त्वाची भर टाकली आहे. १४ ऑक्टो .२०२३ रोजी प्रकाशित झालेल्या १४२ पृष्ठांच्या या स्वकथनाच्या प्रकाशिक स्मिता उतम कानिंदे, निवेदक मीडिया पब्लिकेशन गोकुंदा, किनवट ह्या असून या स्वकथनाचे मुखपृष्ठ रणजीत वर्मा यांनी काढले आहे. या स्वकथनाला उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे यांची अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लाभली आहे. या स्वकथनाचे मर्मस्पष्ट करणारी पाठराखण (मलपृष्ठावर ) उत्तम कांनिदे यांची आहे. या स्वकथनाच्या निमित्ताने या स्वकथन संज्ञेतील 'स्व 'संबंधी विचार करणे आवश्यक वाटते. 'स्व' म्हणजे 'स्वतः. स्वतः म्हणजे कोण तर 'मी'. 'मी' कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची जिज्ञासा मानवी मनात निर्माण झाली पाहिजे. या 'मी' ला जाणणे,समजून घेणे म्हणजे 'स्व' विषयीची जाणीव करून घेणे आहे. हा 'मी' म्हणजे 'स्व' ! या 'स्व' ची जाणीव करून घेणे, त्याचे अस्तित्त्व काय आहे, कसे आहे हे समजून घेणे होय. याचा अर्थ स्वतःला स्वतःच ओळखणे आहे. 'स्व' चे सामर्थ्य, क्षमता, बलस्थान, कमजोरी जाणून घेणे आहे. स्वतःला स्वतःचा पत्ता लागला की त्याला दुसऱ्याचा पत्ता विचारायची गरज नसते. स्वत:चा पत्ता स्वतः शोधणे म्हणजे 'स्व' चा शोध घेणे असते. या 'स्व' चा शोध लागला की हा 'स्व' वेगळा आहे आणि सृष्टीतील प्रत्येक जण हा सारखा नसून वेगळा आहे हा निष्कर्ष हाती लागतो. हे वेगळेपण हीच 'स्व' ची ओळख असते. म्हणून माणूस हा 'मी' 'मी' आहे म्हणजे माझ्यासारखा दुसरा नाही. हेच इतराना सांगत असतो. ’मी’ अमूक स्वरूपाचा आहे. तमूक स्वरूपाचा नाही. असा जेव्हा म्हणतो तेव्हा तो स्वतःला समजलेला ‘मी’ इतरांना सांगत असतो. हा 'मी ' ला समजलेला 'मी' आणि तमूक स्वरूपाचा नसलेला ‘मी' यात फरक आहे. या 'मी' ने अथवा 'स्व' ने स्वतः च 'स्व' च्या केलेल्या उत्खननाचे कथन म्हणजे स्वकथन होय.

          स्वकथन हे 'स्व' च्या अस्तित्त्वाची जाणीव करून देणारे असते. हा 'स्व' मी कसा घडलो.या घडण्याच्या प्रक्रियेचे ज्ञान करून देत असतो. कोणत्याही 'स्व' चा जन्म पोटातून होतो तो पुढे पोटासाठी वणवण करतो आणि धरतीच्या पोटातच गडपही होतो. 'स्व' चा जन्म हा कोणाच्या पोटी व्हावा हे त्याच्या हातात नसते म्हणून 'स्व' च्या जन्मापेक्षा पुढे त्याची पोटासाठी चाललेली वणवण ही महत्त्वाची असते. ही वणवणच 'स्व' च्या घडण्याच्या प्रक्रियेचा निर्देश करते. त्यामुळे कोणत्याही 'स्व' च्या जीवनात घडण्याच्या प्रक्रियेला विशेष महत्त्व असते. त्यामुळे प्रक्रिया या शब्दातील क्रियेला लक्षणीय महत्त्व प्राप्त होते. क्रियाशीलता हा 'स्व' चा लक्षणीय विशेष आहे. 'स्व' च्या घडण्याची क्रिया उभे राहण्यातून, चालण्यातून, फिरण्यातून, पाहण्यातून, बोलण्यातून, खाण्यातून, पिण्यातून, बसण्यातून, लिहिण्यातून, वाचण्यातून, हाताळण्यातून होत असते. या क्रियांचा संबंध हा वास्तवाशी असतो तसाच तो भूतकाळाने त्या वास्तवाला दिलेल्या संस्कारांशीही असतो. संस्काराचा भूतकाळ चांगला असेल तर वास्तव आणि त्यातील क्रिया चांगल्या आणि भूतकाळीन संस्कार वाईट असतील तर वास्तव आणि त्यातील क्रियाही वाईट असतात. क्रिया ह्या वास्तवातच केल्या जातात आणि वास्तवाचा दरक्षणी भूतकाळ होत असतो. भूतकाळ झालेल्या वास्तवातील क्रिया 'स्व' चा वर्तमान आणि भविष्यकाळही घडवतात. त्यामुळे या क्रिया जाणीवपूर्वक शिकल्या आणि शिकवल्या जातात. या शिकण्या आणि शिकवण्यातून 'स्व' ची भावसंवेदना आणि मानसिकताही घडवली जाते. 'स्व' चे जगणे आणि वागणे जबाबदार करण्याचे कार्य जसे घरातून होते तसेच ते समाजातूनही होते. क्रिया हया समाज आणि संस्कृतीसापेक्ष असतात. या देशात विविध प्रकारचे समाज आणि संस्कृत्या आहे. या प्रत्येक समाज आणि संस्कृतीच्या हितसंबंधाची क्रिया त्या त्या समाज आणि संस्कृतीला अभिप्रेत असते.या समाज संस्कृतीच्या गडाला सुरुंग लावणारी, विरोध करणारी क्रिया समाज संस्कृतीला मान्य नसते. 'स्व' च्या क्रियेतून समाज आणि संस्कृती एक विशिष्ट भूमिका घेऊन उभी राहत असते आणि ही भूमिका 'स्व' ने सातत्याने जिवंत ठेवावी आणि त्या भूमिकेचे संवर्धन करावे ही अपेक्षा समाज आणि संस्कृतीकडून केली जाते. 'स्व' या भूमिकेच्या निरीक्षणातून, अनुकरणातून आणि वर्तनातून घडतो आणि तो समाज संस्कृतीसापेक्ष होतो. 'स्व' च्या या समाज संस्कृती सापेक्ष वर्तनव्यवहाराची क्रिया त्याच्या अभुदयाच्या आड येते याचे त्याला उशिराने भान येते तेव्हा तो या सापेक्षतेतून निरपेक्षतेला जन्म देतो.त्यामुळे सापेक्ष क्रिया ही 'स्व' च्या निरपेक्ष क्रियेला जन्म देणारी धरती आहे.

       'स्व' चे हे समाजसंस्कृती सापेक्ष होणे म्हणजे 'स्व' चा मृत्यू घडवून आणणे आणि 'स्व' नव्याने जन्माला घालणेही होय. 'स्व' हा ज्या समाज संस्कृती संदर्भबंधाच्या सापेक्षेतेत घडतो. म्हणजे तो विशिष्ट काळ, भूमिका आणि परिस्थितीच्या संदर्भबंधात घडतो. त्याचे हे घडणे सापेक्ष असते.सापेक्षता ही चौकट असते. चौकटीत घडलेला 'स्व' हा पोपट असतो. पोपट हा शिकवलेलीच कृती करतो. 'स्व' चा असा पोपट झाला की तो सामान्य होतो. त्याच्यातल्या असामान्यतेचा मृत्यू होतो. ही सामान्यता 'स्व' ला जेव्हा अस्वस्थ करते तेव्हा 'स्व'सापेक्षतेला उधळून टाकतो. सापेक्षतेत 'स्व' च्या मनाचे दमन होते आणि बुद्धीची प्रभा मॅन केली जाते. 'स्व' च्या मनातील भावनेच्या पौर्णिमेचा उदय होऊ दिला जात नाही आणि बुद्धीच्या गर्भातील ग्लोबल विचारसूर्याला उदया अगोदरच मावळले जाते. 'स्व' ला 'स्व' ची जाण होण्या आधीच 'स्व' चे स्वतंत्र अस्तित्वच पुसून टाकले जाते आणि 'स्व" ची ओळख समाजिकीकरणातील जात, वर्ण, वर्ग, धर्म, पंथ, भू, भाषा' या आधारावरून केली जाते आणि प्रवाहमंदीत झालेल्या क्रियाशिलतेतून मतीमंद व गतीबंद झालेल्या संस्कृतीचे वाहक बनविले जाते. त्यामुळे या 'स्व' ला असलेली सन्मानाची भूक, त्याची कार्यक्षमता आणि त्याचे होणारे वास्तविकीकरण रोधले जाते आणि त्याला परलोकवादाच्या ध्यासाकडे वळवले जाते. सापेक्षेतेत 'स्व'चा रोधलेला श्वास हा निरपेक्षतेकडे प्रवास करतो. सापेक्षता म्हणजे सामान्यत्व ! आणि सामान्यत्त्व म्हणजे विविधतेतील विषमतेच्या पालखीचे भोई, त्यामुळे सामान्यत्व म्हणजे परावलंबीत्व आणि परावलंबीत्त्व म्हणजे मृत्यू ! निरपेक्षता ही चौकट मूक्त असते. चौकट हा पिंजरा असतो.तो पाळीव पशू-पक्षांसाठी असतो. निरपेक्षता म्हणजे असामान्यत्व ! 'स्व' चा नवा जन्म ! 'स्व' च्या इच्छेची जागृती होणे, मन आणि सदसदविवेकबुद्धीचे अस्तित्त्व मान्य करून जगणे आणि जगण्याला बाधा आणणाऱ्या घटकाशी संघर्ष करून जगण्याची पुनर्रचना करणे, जगण्याच्या पुनर्रचनेसाठी सृष्टीतील साधनसंपत्तीचा उपयोग करून आकलन करणे, तिची माहिती घेणे, मिळवलेल्या माहितीचा अन्वयार्थ लावणे, तो जतन करणे, त्याचे हस्तांतर करणे, त्याचे रूपांतर करणे, कलांतर करणे, सतत बदल, सतत नवे नवे प्रयोग करणे, 'स्व' च्या बदलणाऱ्या गरजानुरूप 'स्व' च्या क्षमतेचा विकास करणे असा बुद्धिप्रामाण्यतेचा पाया हा निरपेक्षतेच्या गर्भजलात आहे.या गर्भजलात उद्याच्या पौर्णिमेचा चंद्र आणि अत्त दिपत्वाचा सूर्य दडलेला आहे. हा चंद्र आणि सूर्य विश्वातील विघटीत झालेल्या 'स्व' ला आपल्या प्रकाशाने सौंहार्दपूर्णतेने जोडते. हा प्रकाश तुटलेल्या,तोडलेल्या,विघटीत केलेल्या 'स्व' च्या नातेसंबंधाची पुनर्जोडणी करतो. ही पुनर्जोडणी 'स्व' ला आयुष्याच्या संध्याकाळी सुचते. या पुनर्रजोडणीचे दुसरे नाव सलोखा तत्त्व असे आहे.हे सलोखातत्त्व या दोहोंच्या प्रकाशाने निर्माण होते.निरपेक्षतेचे हे गर्भजल नवनिर्माणक, नवसर्जनात्मक आहे. नवनिर्माणक असलेल्या निरपेक्षतेत 'स्व' च्या घडण्याला अधिक संधी आहे.संधीच्या उपयोगाचे यात स्वातंत्र्य आहे.या स्वातंत्र्याच्या जोडीला समता, बंधुता आणि न्याय आहे.ही मूल्यांतर क्रांतीसंहिता 'स्व' ला सन्मान देते,त्याची कार्यक्षमता वाढविते आणि त्याला वास्तवाची भूमी देते. सर्व 'स्व' हे सारखे आहेत, समान आहेत.हा समानतेचा भाव निर्माण करते. हे स्वसमान भावीत्त्व सर्वकल्याणकारक आणि सर्वहितकारक असेच असते.ही सर्वहितकारकता सर्वच 'स्व' ना न्यायपूर्ण आणि स्वीकारण्यायोग्य असते.या स्वसमानभावाने 'स्व' चा विकास होतो आणि नवे मूल्यांतर घडते.हे नवे मूल्यांतर नवा समाज आणि संस्कृती निर्माण करते. त्यामुळे 'स्व' ची घडण्याची प्रक्रिया ही समाज आणि संस्कृती निरपेक्षतेत असते.

        आंबेडकरवादी स्वकथनातील 'स्व' हा समाज आणि संस्कृती निरपेक्षतेतून घडला आहे.ही निरपेक्षता अधिकाधिक समाज आणि संस्कृतीला निरपेक्षतेचे स्वातंत्र्य देणारी आहे.

          समाज संस्कृती सापेक्षता आणि निरपेक्षता ही 'स्व' ला 'स्व' च्या अस्तित्त्वाची जाणीव करून देते.या जाणीवेतून 'स्व' अस्वस्थ होतो. त्याची अस्वस्थता त्याला अनुभव,ज्ञान आणि कौशल्याकडे मार्गक्रमण करायला लावते. सखाराम घुले हे असेच स्वतःचा शोध घेतात. यासाठी ते आपल्या भूतकाळात शिरतात. भूतकाळातील समाज आणि संस्कृतीत ते कसे घडले, कोणत्या क्रिया केल्या आणि समाज आणि संस्कृतीतील मनाला व बुद्धीला न पटणाऱ्या बाबीसंबंधी कशा प्रतिक्रिया दिल्या याचे दर्शन त्यांच्या क्रिया- प्रतिक्रियेवर उभ्या असलेल्या अनुभवावरून त्यांनी सिध्द केले.त्यांचा हा ऐतिहासिक जीवनानुभव वर्तमानातील जगण्याच्या पुनर्रचनेची मांडणी करण्यासाठी साकार झाला. या साकार झालेल्या पुनर्रचनाकारी स्वकथनाचे नाव 'पैनगंगातिरी' हे आहे. या स्वकथनाचे शीर्षक हे बुद्ध आणि नद्या यांच्या नातेसंबंधांची जाणीव करून देणारे आहे. रोहिणीनदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलिय यांच्यात झालेल्या संघर्ष संबंधाची आठवण करून देते. मानव आणि नदी यातील अंतर ज्या पाण्यानी जोडले जाते त्याला जीवन असे नाव आहे. सखाराम घुले यांचे जीवन पैनगंगातिरी या नदीतील पाण्याने समृद्ध केले आहे. या नदीतील पाणी जसे प्रवाही आहे तसेच या लेखकाचेही जीवन प्रवाही आहे. त्यांच्या या जीवनप्रवाहाच्या एका तिरावर बुद्ध आहेत तर दुसऱ्या तिरावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्या या जीवनप्रवाहात हे महामानव आणि त्यांची आजी नसती तर त्यांची जीवनाची नौका पुनर्रचनेच्या दिशेने वाटचाल करू शकली नसती.त्यांच्या आजीनेच त्यांचे संगोपन केले. बालवयातच त्यांचे छत हरवले,आईचे दुसरे लग्न झाले.त्यामुळे त्यांच्या आयुष्यात दुःख दैन्याची भरती झाली.या दुःखांवर मात करण्याचे बाळकडू बालवयातच वडिलांच्या आंबेडकरी विचारवारस्यातून प्राप्त झाले. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा संदेश त्यांनी डोक्यात घेतला आणि त्यांनी संघर्ष करत शिक्षण घेतले. लेखक म्हणतात, 'डॉ. बाबासाहेबांच्या शिक्षणाची चळवळ व धर्मांतराची चळवळ या काळात गावोगावी जोरात पसरत होती म्हणून आम्ही त्यांच्या प्रेरणेने इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेण्याची सर्व तयारी केली. ' (पृ .२८) त्यांचा शैक्षणिक प्रवास हा टाकळी ते किनवट असा झाला. त्यांच्या या शैक्षणिक प्रवासात त्यांना विविध जाती धर्माचे मित्र मिळाले. त्यांना वसतीगृहात राहून शिक्षण घ्यावे लागले. त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांपैकी देशमुख आडनावाचे एक शिक्षक होते. लेखक आणि त्यांचे मित्र त्यांच्या घरी जाऊन त्यांनी सांगितलेली कामे करत असायचे. एकादिवशी सरांच्या पत्नीने दूध आणण्यासाठी लेखकाच्या गणपत पवार या मित्राला बोलावले. पण सरांच्या पत्नीने त्या मुलाकडून दूध बोलावून घेतले नाही. लेखक जेव्हा नाल्यावरुन आंघोळ करून येतात तेव्हा लेखकाकडूनच दूध बोलावून घेतले जाते. यासंदर्भात लेखक आणि सरांच्या पत्नीचा संवाद होतो. या संवादात सरांची पत्नी लेखकाला विचारणा करते, 'तो छोटा मुलगा कोण आहे .आम्ही म्हणालो तो आमच्याच गावचा आहे तो मराठा आहे. असे म्हणल्यावर ताईने तो तुमच्यासारखा वागत नाही म्हणून मी त्या मुलाला नाकारले. ' ( पृ.२९) संवादातून एकजातीय आणि एकधर्मीय शिक्षक आणि विद्यार्थी असले तरी शिक्षकाने आणि त्यांच्या पत्नीने स्वजातीय आणि स्वधर्मीय गणपत पवार या विद्यार्थ्याच्या वागण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. लेखकाने या अनुभवातून जीवनात वागणे फार महत्त्वाचे असते कारण वागणे हे तुमच्या क्रियेतून घडत असते. क्रिया हया कारणातून जन्माला येतात. कारण म्हणजे हेतू . हेतू चांगला असला की क्रिया चांगल्या घडतात. हेतू चांगला नसला की क्रिया चांगल्या होत नाही. म्हणून क्रियेच्या तळाशी कारणे असतात आणि कारणाच्या तळाशी हेतू असतो. हेतू हे नैतिकशी संबंधीत असतात आणि नैतिकता ही संस्काराने घडवली जात असते. याऊलट लेखकाच्या जीवनात मदत अली, त्याची बहिण मेरणनिस हे श्रीमंत मुस्लिम धर्मीय असून मेरणनिस या वर्गमैत्रिणीने लेखकाला त्याकाळी सायकल शिकवली. लेखकाचा हा जीवनानुभव दोन धर्मीय भिन्न लिंगी वर्ग मित्रांच्या वागण्यातील द्वंदात्मकता अधोरेखित करते. ही द्वंद्वात्मकता जातीच्या,धर्माच्या आणि अन्य स्तरावरील असली तरी ती विविधतेच्या क्रियांचा, वागण्याचा तपशील सांगते आणि हा तपशील आदर्श वागण्याच्या दिशेचे सूचन करते. या दिशेचे सूचन करतांनाच लेखकांनी आपल्या बालवयात नदीत पोहणे, नदीतील मासोळ्या पकडणे, महूळ झाडणे, सहलीत सहभागी होणे,जंगलाचे दर्शन, अळणेचा जीव वाचवणे, सिनेमा पाहण्याची ओढ, सिनेमा तयार करण्याची रूची, जबलपूरला बडा भाई या चित्रपटासाठी खलनायक म्हणून निवड या सर्व क्रिया- प्रतिक्रिया लेखकांनी केल्या आहेत. त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होते. परंतु त्यांची सर्वस्व असलेली आजी कोंडाबाई पोटाच्या विकाराने मृत्यू पावते. मृत्यू समयी त्यांच्या आजीने त्यांच्याशी साधलेला संवाद हदयद्रावक आहे. आजी लेखकाला म्हणाली, 'माझा बाबा आता मॅट्रीक झाला, खूप हुशार झाला, मला आता वर जायचे आहे .असे म्हणून तिने माझ्या जवळ मांडीवर हात ठेवून आपला प्राण सोडला. मी मोठ्याने रडू लागलो ...माझ्या आजीमुळे मी इथपर्यत आलो माझ्या आजीसारखी आजी मिळो हीच शेवटची इच्छा आहे. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.' ( पृ.४१,४२) सर्वच पातळ्यावरून माणसाची उलंगवाडी झाली की माणसे हताश होतात. लेखकाला आजीने शिकवल्यामुळे लेखकाकडे शिक्षण हेच एकमेव सर्व प्रगतीच्या वाटा विस्तारणारे दार होते. लेखकाचा विवाह त्याकाळी सावकार असलेल्या विठोबा येरेकार यांच्या मुली सोबत झाला. शिक्षणाने गरीबीवर मात केली. गरीबी पुढे करून होणारा साळा देखील लग्नाला विरोध दर्शवित होता. परंतु शिक्षणाची महत्ता येरेकारांना चांगलीच उमजलेली होती. शिक्षणाने जोडले अन्यथा गरीबीने तोडले असते. म्हणून शिक्षण हे सर्वच प्रकारच्या विभागणीला जोडणारे फेव्हिकॉल आहे.

    लेखक किनवटच्या कॉस्मापॉलिटन प्रा.विद्यालयात १९७१ ला शिक्षक म्हणून रूजू झाले. खरे तर विश्वाची निर्मिती आणि प्रलय हे शिक्षकाच्या हातात असते. याची जाणीव लेखकाला आहे. हा या स्वकथनाचा दुसरा भाग आहे. त्यांनी धर्माबाद येथे सेवेंतर्गत डि.एड केले. त्यानंतर ते पांगरपहाड येथील जि. प.शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करू लागले. शिक्षकाची विविध ठिकाणी नौकरी करतांना धामनदरी या गावातील जि. प. शाळेत पाच वर्ष नोकरी करतांना या गावातील कऱ्हाळे पाटील यांनी जेवायला बोलावले. त्यांच्या घराच्या भिंतीवर अनेक धार्मिक फोटो लावलेले होते. त्यात विक्तूबाबाचाही फोटो होता.तेव्हा लेखक प्रकाश नावाच्या मुलाला विचारतात.' तुम्ही हे देवधर्माचे फोटो लावले त्यात विक्तूबाबा कसे आले ? त्यांनी सांगितले की आमच्या घराण्यात दोघे जणींना भानामती येत होती म्हणून आम्ही त्या विक्तूबाबाच्या गावी टाकळघाट येथे गेलो असता भानामती कमी झाली. '( पृ.६८) लेखकाला प्रकाशकडून मिळालेल्या उतरातून लेखक प्रकाशला विक्तूबाबासंबंधीचा संपूर्ण इतिहास कथन करतात. त्याच्या विचित्र वागण्यामुळे त्याच्या हातापायात बेड्या घातल्या कालांतराने चमत्कारिक विक्तूबाबाच्या नावाने टाकळ घाटला भव्य मंदिर उभारले. या विक्तूबाबाच्या दर्शनासाठी अंधश्रद्धाळू लोक मोठ्या संख्येने जातात. पैसे दान करतात. या मंदिराच्या समितीत विक्तूबाबाच्या घरातील कोणीही सभासद नाहीत. एका चमत्कारिक मुलाला विक्तूबाबा बनवून त्याच्या नावे मंदिर उभे करणारे अध्यक्ष हे महार समाजाचे असून प्राप्त होणाऱ्या दानावर ते मजा मारतात. ही वस्तुस्थिती सांगतात. त्यानंतर 'हा महाराचा माणूस आपल्या देवाबरोबर कसा म्हणून दुसऱ्याच्या दिवशी त्यांनी ते फोटो काढला. मी सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा फोटो व डॉ.बाबासाहेबांचा फोटो प्रकाश कऱ्हाळे यांनी लावला. या महामानवांनी आपल्याला सन्मार्ग दाखविला त्यांचा आदर्श ठेवा. '(पृ.६९) या देशातील बहुसंख्य शिक्षक हे समाज आणि संस्कृतीला मान्य होणारेच वर्तनव्यवहार आणि कृती विद्यार्थ्याकडून वर्गात करून घेतात. या समाज आणि संस्कृतीच्या मान्यतेसंबंधी कोणताही शिक्षक स्वतः ही आणि विद्यार्थ्यांनाही प्रश्न विचारू देत नाही. उलट मुलांना देवासारखे गप्प बसा असेच शिकवत असतात. त्यामुळे विद्यार्थ्याना प्रश्न पडत नाही. प्रश्न पडले नाही तर चांगले काय आणि वाईट काय ? याचा सारासार विचार करता येत नाही.या देशातील धर्माने आणि संस्कृतीने समाजाला चमत्काराचा, अंधश्रध्देचा परवानाच दिला आहे. वैज्ञानिक दृष्टी आणि बुद्धीप्रामाण्यवाद नाकारला आहे. त्यामुळे शिक्षकांनी अशा धर्मसंमत्त, संस्कृतीसंमत्त मान्यतेला नाकारून स्वतःलाही आणि समाजालाही आकार दिला पाहिजे.माणसाला परावलंबी करणाऱ्या या समाज आणि संस्कृती विरुद्ध नवी आणि हवी समाज आणि संस्कृती बुद्धाने आणि बाबासाहेबानी दिली आहे. या समाज आणि संस्कृतीच्या दृष्टीला रुजवण्याचे कार्य हे शिक्षकाचे आहे.सखाराम घुले यांनी हे कार्य आपल्या डोक्यात बुद्ध आणि बाबासाहेब घेऊन केले आहे. त्यांच्या या कृतीमागे परिवर्तन आणि पुनर्रचना या सभ्यतेचे कारण दडलेले आहे. त्यामुळे ते केवळ शिक्षक ठरत नाही तर ते समाजशिक्षक आहे. त्यानी बहुजनात परिवर्तन आणि प्रवर्तन घडून आणले आहे .

     लेखकांनी मदनापूर येथील परसराम सोमला राठोड या बंजारी समाजाच्या मुलाच्या शिक्षणासाठी तन,मन आणि धनाने मदत केली. त्याला शिक्षकाची नोकरी लागली.त्यानंतर त्याचे लग्न जुळले.त्यात त्याने हुंडा घेतला नाही. लग्नाच्या पत्रिकेवर बाबासाहेब यांचा फोटो छापून बौद्ध पद्धतीने लग्न लावले. त्याने बौद्ध पद्धतीचा लग्नात पोशाख परिधान करून लग्न केले. त्याने लग्नात बाबासाहेब आणि वसंतराव नाईक यांच्या प्रतिमा ठेवल्या. त्याच्या घरातही बाबासाहेबांचा प्रथमदर्शनी फोटो लावला. लेखकाने या विद्यार्थ्यात परिवर्तन व प्रवर्तन घडून आणले. हे त्यांच्या जीवनानुभवाच्या कथनातून स्पष्ट दिसून येते. लेखक कसे घडले हे जसे महत्वाचे आहे तसेच त्यांनी समाजाला आणि संस्कृतीला कसे घडवले. हे देखील महत्त्वाचे असून त्यांचे हे स्वकथन समाज आणि संस्कृती सापेक्षता ही कोंडवाडा असून निरपेक्षता ही नवे कृतीकार्य करण्याची मोकळीकता प्रदान करणारी आहे. त्यांचे हे स्वकथन नव्या पर्यायी समाज आणि संस्कृतीला घडवण्याच्या टप्यातील एक महत्त्वाचे स्वकथन आहे. अनेक घटना प्रसंग त्यांच्या पुनर्रचनेची साक्ष त्यांच्या स्वकथनातून देतात.

              या स्वकथनाच्या तिसऱ्या भागात लेखकाने सेवानिवृत्ती नंतरचा काळ येवला, वेरुळ अंजिठा,ताडोबा अभयारण्य,दिल्ली, विजयवाडा, भूवनेश्वर, कोकण, सिंधूदूर्ग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव अंबावडे, उतर भारतातील बौद्ध स्थळे, सारनाथ, नालंदा, वैशाली, कपिल वस्तू, सिद्धार्थाचे तीन महल, लुंबिनी, श्रावस्ती, आंबेडकर पार्क लखनौ, सिध्दर्थाची तपश्चर्या डुगेश्वरी, सांची स्तूप आणि कुशीनगर अशा बौद्ध स्थळांना भेटी देऊन बाबासाहेब आणि बुद्ध या महामानवाच्या ऐतिहासिकतेचे आकलन केले. भारतातील धम्मा संबंधीच्या स्थितीगतीचा अनुभव घेतला अनेक धम्मानुयायांना स्वतःशी जोडले आणि धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी प्रयत्न केले .

       'पैनगंगातिरी' या स्वकथनाचे वैशिष्टये हे की लेखकाने आपल्या आयुष्यात जे घडले ते प्रांजळपणे मांडले आहे. आपला अपमानही आणि सन्मानही मांडला आहे. अन्यथा काही लेखक स्वनिष्ठेची,स्वकर्तृत्त्वाची स्वस्तुती करण्यात घडलेल्या घटना प्रसंगाला काल्पनिकतेच्या पातळीवर सजवतात.तेव्हा स्वकथनातील वस्तुनिष्ठ कथनाची हत्या होते आणि ते स्वकथन न होता कथा कादंबरी होते.लेखकाने वस्तुनिष्ठतेला यात कुठेही बाधा येऊ दिली नाही. त्यांनी आपला भूतकाळ शिलगावत वर्तमानाला आणि भविष्याला मूल्यांत्तराचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या स्वकथनातून ‘स्व’ चे मन जरी व्यक्त होत असले तरी ते समूहमन बोलत आहे असे जाणवते. हे स्वकथन मानवी जीवनाला दुःखमुक्तीचे कारण सांगून हितसंबंधातीत जगण्याचा आणि वागण्याचा सल्ला देते. मानवी सन्मान,त्याची प्रतिष्ठा अबाधित ठेवणाऱ्या मूल्यांचे सूचन करते. या स्वकथनातून टाकळी,किनवट,माहूर अशा मराठवाडा आणि विदर्भातील सीमेरेषेवरील भूप्रदेशाचे दर्शन घडविले आहे.यातून त्यांनी गाव,गावातील लोक, त्यांच्या समजूती, त्यांच्या मान्यता, त्यांचे जगणे,त्यांच्याशी असलेले सलोख्याचे नातेसंबंध व्यक्त केले आहे. हे स्वकथन सचित्रासह लेखकाच्या वस्तुनिष्ठ जीवनानुभवाला अधिक स्पष्ट करणारे आहे.आजवर चालत आलेल्या स्वकथनाच्या परंपरेपेक्षा हे स्वकथन थेट बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणाऱ्या स्वप्नातील बुद्धमय भारताकडील वाटचालीतील शत्रूना मित्र बनवणारे आहे.हे या स्वकथनाचे सामर्थ्यस्थळ आहे. पैनगंगातिरी या स्वकथनातून सखाराम घुले यांनी आपले अनुभव हेच जीवनसत्याची निर्मिती आहे.ही निर्मिती त्यांनी अत्यंत साध्या सोप्या भाषेत व्यक्त केली आहे.या लेखकाच्या धाडसाचे हे पहिले अपत्य आहे. त्यांना यातील किरकोळ चुकासह संज्ञासंकल्पनेच्या उपयोजनातील गोंधळ टाळता आला असता पण अनवधानाने टाळा गेलेला दिसत नाही. त्यांच्या या स्वकथनाचे मी स्वागत करतो आणि लेखकांना पुढील सकस पण निर्दोष लेखनासाठी मंगलमय सदिच्छा देतो !

-----------------------------------------------


पुस्तक: पैनगंगातिरी


लेखक: सखाराम घुले


प्रकाशन : निवेदक मीडिया पब्लिकेशन गोकुंदा, किनवट. (२०२३)


पृष्ठे १४१. किंमत ₹ २००/-


परीक्षक: प्रा.डॉ. युवराज मानकर

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News