किनवट : येथून जवळच असलेल्या कोठारी (चि) येथील मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 15- हिगोली लोकसभा मतदार संघा अंतर्गत येणाऱ्या 83- किनवट विधानसभा मतदार संघातील नियुक्त एक हजार सातशे पासष्ट मतदान केंद्राध्यक्ष / मतदान अधिकारी यांना पहिले प्रशिक्षण सुव्यवस्थित पार पडले.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कावली मेघना(भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या सत्रात मतदान केंद्राध्यक्ष व पहिले मतदान अधिकारी (915 ) व दुसऱ्या सत्रात इतर मतदान अधिकारी (850) यांना सभागृहात पॉवर पाँईंट प्रेझेंटेशन (पीपीटी ) द्वारे प्रशिक्षण व्यवस्थापन कक्ष प्रमुख मुगाजी काकडे व सहायक मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी प्रशिक्षण दिले. सर्व क्षेत्रिय अधिकारी व सर्व मास्टर ट्रेनर यांनी 19 वर्ग खोल्यांमधून (इव्हीएम हँडसॉन ) इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षण दिले.
कुणीही नेमणूक रद्द करण्यासाठी प्रयत्न करू नका. घरी असलेल्या लग्न कार्यासारखं देशाच्या सर्वात मोठ्या या उत्सवात स्वतःला झोकून देऊन मन लावून काम करा. आज प्रशिक्षणातून घरी जातांना सकारात्मक विचार घेऊन जा , त्यामुळे उत्साहाने अधिक जोमाने कार्य करण्यास उर्जा मिळेले, असे प्रेरणादायी विचार नांदेडचे निवासी उप जिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी या प्रसंगी मांडले.
निवडणूक खर्च निरीक्षक कमलदीप सिंग यांनी प्रशिक्षण स्थळाला भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कावली मेघना यांनी मतदान यंत्र हाताळणीच्या प्रत्येक कक्षात जाऊन प्रशिक्षणार्थीशी संवाद साधला. त्यांना प्रश्न विचारले व माहिती सांगितली. यावेळी तहसिलदार शारदा चौंडेकर (किनवट ), किशोर यादव (माहूर) व क्षेत्रिय अधिकारी कक्ष प्रमुख वन विकास महामंडळाचे सहायक व्यवस्थापक जगदीश पऱ्हाड उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षण व्यवस्थापन कक्षाचे सहाय्यक रामेश्वर मुंडे, एम.डी. वांगीकर, एम.बी. स्वामी , सचिन भालेराव , एम.के. सांगवीकर, डी.जे. क्षीरसागर , मतदान कर्मचारी व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख नायब तहसीलदार व्ही.पी. राठोड, सहाय्यक डी.सी. भुरे , नितीन शिंदे , प्रभू पानोडे , संदीप पाटील व कर्मचारी सोई सुविधा कक्षाचे सहायक गोविंद पांपटवार यांनी परिश्रम घेतले.
प्रशिक्षण स्थळाच्या प्रवेशद्वारा समोर स्वीपकक्ष प्रमुख गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी इंदूरकर या कलावंतांनी काढलेली मतदार जनजागृती संदेश रांगोळी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. आजच्या प्रशिक्षणातील तो एक सेल्फी पॉईंट बनला होता.
No comments:
Post a Comment