नांदेड दि. ३ : कालच्या खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज नायगाव व बिलोलीमध्ये तालुकास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. संभाव्य टंचाईला लक्षात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश दिले.
नायगाव,बिलोली येथील अधिकाऱ्यांसोबत आज झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी संभाव्य पाणीटंचाई परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, चाऱ्याची उपलब्धता, जलजीवन अंतर्गत सुरू असलेल्या कामाची स्थिती, पुढील दीड महिन्यात प्रत्येक गावात जलसंधारणाची कामे सुरू करण्याबाबतची अधिकाऱ्यांची आखणी, त्यांनी यासाठी केलेले नियोजनाचा आढावा घेतला.
जूनच्या मध्यात मान्सूनच्या आगमनाची शक्यता आहे.तोपर्यंत सर्व यंत्रणेकडे दीड महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये प्रत्येक गावात जलसंधारणाची कामे झाली पाहिजे.परंपरागत जलसाठे गाळमुक्त करणे गरजेचे आहे. गाव तलाव, गावालगतचे नाले, जुने बंधारे याचे खोलीकरण रुंदीकरण विस्तारीकरण लोकसहभागातून होतील याकडे लक्ष देण्याची त्यांनी सांगितले नागरिकांनी देखील आपला जिल्हा हा पाणीटंचाईचा जिल्हा असून जलस्त्रोत वाढण्यासाठी या काळात लोकसहभागातून होणाऱ्या जलसंधारण कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
या बैठकीला नायगाव, बिलोली तालुक्याचे तहसीलदार ,तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, जलसंधारण व पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंत्याची उपस्थिती होती. प्रलंबित कोणतीही कामे राहणार नाही याकडे लक्ष वेधण्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment