नांदेड ता. ८ : आपल्या परिसरातील व घरातील ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करण्यासाठी जिल्ह्यात आज सोमवारी (ता. ८ जुलै पासून ) स्वच्छतेचे दोन रंग अभियाला सुरुवात झाली आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत राज्य माहे डिसेंबर पर्यंत हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावयाचे आहे. मॉडेल झालेल्या गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे यासाठी विविध विषयाच्या अनुषंगाने गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गावात ५ संवादकांची निवड करण्यात आली असून हे संवादक प्रत्येकांच्या घरी जावून संदेश देत आहेत. यात सरपंच, उपसरंपच, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामसेवक, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, स्वच्छागृही, बचत गटातील महिला व गाव स्तरावरील स्वंयसेवक गृहभेटी करून स्वच्छतेचे महत्व पटवून देत आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात दिनांक ८ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान हे अभियान राबविण्यात येणार आहे. ओला कचरा हिरव्या रंगाच्या डब्यात ठेवावा. तसेच सुका कचरा निळ्या रंगाच्या डब्यात ठेवण्यासंदर्भात तसेच नियमित शौचालयाचा वापर करणे, शास्त्रयुक्त पध्दतीने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक व्यवस्थापन, सुयोग्य मैला गाळ व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय आणि नियमित वापर आदि बाबत गृहभेटीतून माहिती देण्यात येणार आहे. भेटी दरम्यान शासनाच्या गुगललींकव्दारे त्या कुटुंबांची फोटोसह माहिती भरण्यात येणार आहे.
यासाठी गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यातील गावांचे प्रती कुटूंब पाच या प्रमाणे संवादकांची निवड केली आहे. या कामी तालुक्यातील सर्व अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी संनियंत्रण करुन अंमलबजावणी करावी. दर आठवडयाला या अभियानाचा जिल्हास्तरावरुन आढावा घेण्यात येईल. तसेच ओला व सुका कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग घेवून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, ग्राम पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.
अर्धापूर तालुक्यातील शेलगाव बु. व शेलगाव खुर्द या गावांमधून स्वच्छतेचे दोन रंग या अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक तथा माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ मिलिंद व्यवहारे, अर्धापूर पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी एस.पी. गोखले, स्वच्छ भारत मिशनचे तालुका गट समन्वयक राजू जाधव, सरपंच हनुमान राजेगोरे, अंगणवाडी कार्यकर्ती निलावती पवार, अनिता कपाटे, वनिता कल्याणकर, आशा वर्कर कविता राजेगोरे, संगीता वानेगावे, रंजना राजेगोरे, ग्रामसेविका सौ. पी.एन. जाकापुरे, शिवाजीराव राजेगोरे, ग्रामसेविका के.पी.जाधव यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
यावेळी स्वच्छतेचे दोन रंग या अभियानांतर्गत ओला व सुका कचरा विलगीकरण व स्वच्छतेचे महत्व याविषयी मिलिंद व्यवहारे यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. तर विस्तार अधिकारी आरोग्य एस.पी. गोखले यांनी स्टाँप डायरिया अभियानाच्या अनुषंगाने ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच गृहभेटीतून कुटुंबांना स्वच्छतेची माहिती देऊन गुगल फॉर्म भरण्यात आला.
*जिल्ह्यात ६,५५० संवादक*
■ जिल्ह्यात एक हजार ३१० ग्रामपंचायती असून, एकूण कुटुंब संख्या चार लाख ५७ हजार ७७७ आहे. गृहभेटीसाठी प्रति ग्रामपंचायत पाच याप्रमाणे सहा हजार ५५० संवादक या कामी राहणार आहेत.
*गावपातळीवर स्वच्छतेचे दोन रंग*
■ संवादक स्वच्छतेच्या दोन रंगाबाबत मार्गदर्शन करतील. ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या घरी दोन कुंड्या ठेवाव्यात. ओला हिरवा व सुका निळा या प्रमाणे कचऱ्याची विल्हेवाट लावावी.
*अभियान कालावधी*
■ गावपातळीवर स्वच्छतेचे दोन रंग हे अभियान दिनांक ८ जुलै ते ७ ऑगस्ट २०२४ या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment