नांदेड, ता.१२ : नांदेडचे भूमिपुत्र तथा यशदा पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या सामाजिक, शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईच्यावतीने त्यांना नुकताच डॉ. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवॉर्ड महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईत प्रदान करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने यावर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महाराष्ट्रातील निवडक १८ व्यक्तींना हा अवॉर्ड देण्यात आला. त्यामध्ये डॉ. बबन जोगदंड यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, ज्येष्ठ सरकारी वकील ॲड.उज्वल निकम, ॲड.बी.के. बर्वे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. वामन आचार्य, कार्यकारी समिती अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांची उपस्थिती होती.
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांनी पुरस्कारार्थी यांच्या योगदानाची महाराष्ट्राला निश्चित मदत होईल, असा आशावाद व्यक्त केला.
डॉ. बबन जोगदंड यांना यापूर्वीचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्तेही गौरविण्यात आले. डॉ. जोगदंड यांनी आतापर्यंत २५ विषयात पदव्या, प्राप्त केल्या असून या पदव्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मौलिक योगदान असून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी भरीव काम केले आहे. त्याचबरोबर दुबईमध्ये व इतर देशात त्यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील अनेक जणांना पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.
डॉ. बबन जोगदंड हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील सावरगाव माळ येथील रहिवासी असून ते चांगले वक्ते, अभ्यासक, विचारवंत आहेत. त्याचबरोबर शासनाच्या विविध समित्यांवरही ते कार्यरत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र प्रकाशन साधने समितीचे सदस्य व बालभारती अभ्यासक्रम मंडळावरही ते सदस्य आहेत. त्यांना राज्यपालांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment