किनवट : वाढदिवसानिमित्त इतर खर्च न करता , कुटूंबाला घेऊन देवदेव करत पर्यटन करण्यापेक्षा वृक्षमित्र रवि नेम्माणीवार यांनी फळ रोपटे वाटप करून वृक्ष लागवड चळवळीला बळ दिल्याचा स्तुत्य उपक्रम आयोजित केला आहे , असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांनी केले.
तालुक्यातील गोकुंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नयाकॅम्प केंद्राचे केंद्रिय मुख्याध्यापक वृक्षमित्र रवि नेम्माणीवार यांनी आपल्या 53 व्या वाढ दिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना घरी लावण्यासाठी सिताफळ व पेरूचे रोपटं वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
यावेळी उपसरपंच शेख हैदर शेख युसूफ उपाख्य सरू भाई, माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य शेख सलीम, मनसब योग साधना केंद्राचे संचालक अखिल खान, सभापती अमजद पठाण (वाई), ग्राम पंचायत सदस्य ज्योतिब गोणारकर, ज्ञानेश्वर सिडाम, उमेश पिल्लेवार, शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड, केंद्रप्रमुख ग.नु. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती
प्रारंभी राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व हरित क्रांतीचे जनक दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांना मान्यवरांचे हस्ते पुष्पार्पण करण्यात आले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सत्कारमूर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त करून आभार मानले.
संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असे सांगत झाडांचे महत्त्व सांगितले. त्यांच्या श्रद्धेपोटी एक झाड घरोघरी लावण्यासाठी पुढे येऊन नवा आदर्श निर्माण करायला हवा, जमिनीची धूप थांबेल. माती वाहून जाणार नाही. धरणे गाळाने भरणार नाहीत. जलसंवर्धन मोठ्या प्रमाणात होईल. पर्जन्यमानात सुधारणा होईल. आज वातावरणात होणाऱ्या बदलामुळे वृक्ष लागवड काळाची गरज बनली आहे. सर्वच नागरिकांनी वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमावर होणारा खर्च कमी करून झाडे लावण्याची गरज आहे. वृक्ष लागवड चळवळ वाढीस लागली पाहिजे, हा उदात्त हेतू समोर ठेऊन वृक्षमित्र रवि नेम्माणीवार यांनी साडेसात हजार रुपये किमतीची सिताफळ व पेरूची रोपटे घरी लावण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोकुदा व जिल्हा परिषद (मुलींचे) हायस्कूल किनवट येथील सर्व शिक्षकांनी भेटवस्तू देऊन श्री नेम्माणीवर यांचे अभिष्टचिंतन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अशोक नेवळे, सर्व शिक्षक योगेश वैद्य, प्रवीण गीते, अफजल, शुभम , रमणा रच्चावार, शीतल पाटील, श्रीमती कवटीकवार, श्रीमती कौसर तसनीम, श्रीमती वागरे आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment