किनवट : तालुक्यातील धानोरा (दिगडी) येथील मूळनिवाशी तथा सिध्दार्थनगर गोकुंदा येथील ज्येष्ठ नागरिक प्रबोधन चळवळीतील शिलेदार गंगाराम माधव मुनेश्वर (वय 80 वर्षे) यांचे वृद्धापकाळातील अल्पशा आजाराने बुधवारी (ता. 31 जुलै 2024) पहाटे 03.10 वाजता राहत्या घरीच निधन झाले.
बुधवारी (ता. 31 जुलै 2024) दुपारी 04.00 वाजता सिद्धार्थनगर गोकुंदा येथील त्यांच्या घरून त्यांची प्रेतयात्रा निघणार असून एरिगेशन कॉलनी गोकुंदा जवळील पैनगंगातिरी असलेल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांचे पश्चात पत्नी, चार मुलगे, चार मुली, दोन बहिणी, सुना, जावई , नातवंडे असा मोठा परिवार असून वन विभागातील निवृत कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते तथा कवी मधुकर सुदाम मुनेश्वर यांचे काका, सिध्दार्थ मुनेश्वर, भीमराव मुनेश्वर, दिलीप मुनेश्वर, राहुल मुनेश्वर यांचे ते वडील होत.
"बुद्ध, फुले, आंबेडकर' हा विचार महाकवी वामनदादांचा श्वास व उर्जाकेंद्र होते. त्यांच्या प्रमाणेच डोक्यावर व्हार्मोनियम घेऊन आपले मोठे बंधू प्रबोधन चळवळीतील शिलेदार स्मृतिशेष सुदाम माधव मुनेश्वर यांचे समवेत महाराष्ट्रच नव्हे तर तेलंगाणा, आंध्रप्रदेशातील घराघरांत, खेड्या -पाड्यात, वाडी -तांड्यात जाऊन आपल्या ओजस्वी वाणीतून ; तर कधी प्रबोधनकार गायकांना हार्मोनियमची साथ संगत करून हा परिवर्तनवादी विचार पोहचविण्याचे काम तहहयात त्यांनी केले आहे. ते आदिवासी दंडार , दंडारणं पथकातील हरहुन्नरी कलाकार म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. जुन्या पिढीतील गायक , वादक , कलावंत , प्रबोधन चळवळीतील शिलेदार गंगाराम माधव मुनेश्वर यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पावन स्मृतींना समस्त मुनेश्वर परिवार, गायक, कलावंत व धम्मबांधव यांनी विनम्र अभिवादन करून आदरांजली अर्पिली आहे.
No comments:
Post a Comment