मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य तथा समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष कपिल हरिश्चंद्र पाटील यांनी बदलापूरच्या घृणास्पद घटनेने संतप्त झालेल्या प्रत्येकाच्या मनात असलेला शाळा , विद्यार्थी सुरक्षेबाबतचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (गृह) व शिक्षण मंत्र्यांना खरमरीत पत्र लिहून विचारला आहे.
त्यांनी लिहिलेले पत्र जसेच्या तसे ...
दिनांक : 23/08/2024
प्रति,
मा. मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य.
मा. उपमुख्यमंत्री (गृह)
महाराष्ट्र राज्य.
मा. शिक्षणमंत्री
महाराष्ट्र राज्य.
विषय : शाळा / कॉलेजमधील मुली, मुलांच्या सुरक्षेबाबत...
महोदय,
बदलापूरच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर एका ताईने मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला, ''या जागी तुमची मुलगी असती तर ?''
बदलापूरच्या घृणास्पद घटनेने संतप्त झालेल्या प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न असेल !
मुंबई हायकोर्टाच्या माननीय न्यायमूर्ती महोदया श्रीमती रेवती मोहिते ढेरे यांनी सुद्धा ''If the school is not a safe place than what is the use of speaking about right to education'' अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे.
गिरीश महाजन गर्दीला सामोरे तरी गेले. पण बदलापूरच्या पोलिसांनी पीडित मुलीच्या गरोदर आईला 12 तास पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं. दाद लागत नाही, न्याय मिळत नाही म्हणून बदलापूरकरांचा उद्रेक झाला.
राज्यात गेल्या पाच वर्षात स्त्रियांवरील अत्याचाराच्या 20 हजार घटनांची नोंद झाली आहे. सरकारं बदलतात, सत्तेवर कोणीही येवो परिस्थिती बदलत नाही. म्हणून लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना आणि व्यवस्थेविरोधात चीड निर्माण झाली आहे.
अशा घटना घडू नयेत म्हणून शाळा व्यवस्थेने व पोलिस यंत्रणेने जे करायला हवं, जी संवेदनशीलता दाखवला हवी ते होत नाही, म्हणून लोक संतप्त आहेत.
शाळेत जाणारी प्रत्येक मुलगी आणि मुलगाही सुरक्षित राहिला पाहिजे यासाठी शिक्षणमंत्री काही गोष्टी आपण सहज करू शकतील. आपण काही पावलं उचलली आहेत. CCTV सारख्या उपाययोजना या घटना घडून गेल्यानंतर गुन्हेगार पकडण्यासाठी योग्य आहेत. पण अशा घटना घडूच नयेत आणि मुला, मुलींना निर्भयपणे वावरता यावं, यासाठीही काही उपाययोजना करणं आवश्यक आहे.
शिक्षक आमदार असताना मी मुंबई पोलिसांच्या मदतीने काही उपक्रम राबविले होते. पोलिसांची शाळेला भेट, मुलांसाठी हेल्पलाईन. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शिक्षक भारतीच्या कार्यक्रमात येऊन मुलांसाठी हेल्पलाईनची घोषणा केली होती. त्या धर्तीवर काही नव्याने गोष्टी करता येतील.
1) स्थानिक पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा / कॉलेजेस् यांना नियमित भेट देणे.
2) स्कूल बस / रिक्षा / टॅक्सी चालक, वाहक यांची नियमित तपासणी / चौकशी करणे.
3) पोलिस हेल्पलाईनचा नंबर ठळकपणे शाळा / कॉलेजमध्ये प्रत्येक वर्गात आणि स्वच्छतागृहात लावणे.
4) शाळा / कॉलेजमध्ये अडचणींच्या जागी पॅनिक बटणची व्यवस्था करणे. (शहरी भागात हे सहज शक्य आहे.)
5) प्रत्येक पोलिस स्टेशनला 'माझी बहीण सुरक्षित बहीण' या मथळ्याखाली स्त्रियांचे तक्रारीचे अधिकार, हेल्पलाईनचे नंबर आणि संबंधित अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर मोठ्या अक्षरात लिहणे.
6) कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून घेण्यास उशीर झाल्यास थेट कंट्रोल रूमचा नंबर उपलब्ध करून देणे.
7) शाळांमध्ये लहान मुली, मुलांसाठी Bad Touch आणि Good Touch बद्दल समुपदेशकांचे कार्यक्रम ठेवणे.
8) शाळा / कॉलेज व्यवस्थापनाने मुलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाय करणे.
कृपया याबाबत तातडीने आपण उचित कार्यवाही कराल, ही अपेक्षा. धन्यवाद !
आपला स्नेहांकित,
कपिल पाटील
No comments:
Post a Comment