किनवट : तालुक्यातील गोकुंदा येथील अंगणवाडी क्र. 5 च्या अंगणवाडी सेविका अनुसया यलप्पा इपलवाड यांनी आपले कार्य सांभाळत विविध स्पर्धा परीक्षा देऊन जिद्दीने तलाठी पद मिळविले आहे. अंगणवाडी सेविका ते तलाठी अशी झेप घेतल्या बद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
एम.ए. पर्यंत शिक्षण घेतलेल्या अनुसया इपलवाड यांनी अंगणवाडी सेविका म्हणून सतरा वर्षे सेवा बजावली . या पदावर कार्यरत असतांना त्यांनी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवून शासकीय योजनांचा लाभ महिला व बालकांना दिला आहे. हे कर्तव्य व संसार सांभाळतांना त्यांच्यातील अभ्यासूपणास त्यांनी चालना दिली. मोठ्या जिद्दीने त्यांनी अनेक परीक्षा दिल्या . त्या एम. पी. एस. सी. कंबाईन - क्लर्क प्री परीक्षा, पुरवठा निरीक्षक मेरिट परीक्षा, जलसंपदा मोजणीदार परीक्षा सुद्धा पास झाल्या आहेत. या सर्वांपैकी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदास त्यांनी प्राधान्य दिले असून तालुक्यातीलच आंदबोरी (चि) येथे त्या रूजू झाल्या आहेत. त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते सुरेश जाधव यांनी त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले आहे. या भरीव यशाबद्दल बालविकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठकरोड यांनी कार्यालयात अनुसया इपलवाड यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
No comments:
Post a Comment