नांदेड,ता.5 : प्रदुषणाची समस्या लक्षात घेता गणेशोत्सव साध्या व पारंपरिक पद्धतीने साजरा करणे गरजेचे झाले आहे. परंपरे नुसार पार्थिव गणेशाची स्थापना करणे योग्य आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती आणि त्याला दिलेले रासायनिक रंग यामुळे पाणी प्रचंड प्रमाणात प्रदूषित होत आहे. प्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसावा या साठी शाडू माती पासुन गणेश मूर्ती बनवणे व घरीच एखाद्या मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात विसर्जन करणे योग्य ठरेल असे प्रतिपादन कला शिक्षिका व पक्षीमित्र कविता जोशी यांनी केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस. आर. कदम यांच्या प्रेरणेने महात्मा फुले हायस्कूल बाबानगर सकाळ सत्र, दुपार सत्र आणि विजयनगर शाखेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला. इयत्ता 5 ते 10 वी च्या 200 विद्यार्थ्यांनी 3 दिवस वेगवेगळ्या गटांत शाडू मातीच्या सुंदर गणेशमूर्ती साकारल्या. कला शिक्षिका कविता जोशी यांनी अतिशय सोप्या पद्धतीने गणेशाचे शिल्प कसे घडवावे ते सांगीतले.
विद्यार्थी अतिशय तन्मयतेने मूर्ती शिल्प साकारत होते. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका एस. आर. कदम, पर्यवेक्षक ए. आर. कल्याणकर, पर्यवेक्षिका जे. सी. महाराज व व्ही. आर. देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव रावसाहेब शेदारकर व कार्यकारिणी सदस्य नरेंद्र चव्हाण यांनी कार्यशाळेस भेट दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या वेळी संतोष पांडागळे, जी. जे. जाधव, साहेबराव मावले, ज्ञानेश्वर डोंगरे, अनिकेत हंबर्डे, संतोष सूर्यवंशी, कोल्हे, सावळे उपस्थित होते.




No comments:
Post a Comment