कायम विनाअनुदान तत्वावरील शाळेत तुटपुंज्या पगारावर काम करता करता काही शिक्षक निवृत्रही होतात ; पण कायम होत नाहीत , शिक्षक दिना निमित्र हीच खंत मांडलीय -प्रा. सुदर्शन किशनराव शेळके यांनी - संपादक
5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून सर्व शाळा व कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्या दिवशी एक प्रकारे शिक्षकांचा सणच म्हणावा लागेल. कारण वेगवेगळ्या रंगी बेरेगी पोशाखामध्ये शिक्षक त्या दिवशी शाळेत उपस्थित राहतात व विद्यार्थ्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव स्विकारतात. त्यांना 'सर' म्हटले की एक आदराची भावना निर्माण होते. 'सर ' या शब्दाने तो भाराऊन जातो.
शिक्षक म्हणजे
शि... म्हणजे... शिस्तप्रिय.
क्ष... म्हणजे क्षमाशील..
क... म्हणजे कर्तव्य दक्ष
असा हा शिक्षकाचा अर्थ आहे. शिक्षक हे आपली भूमिका निभावतात. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लावणे. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची रुची निर्माण करणे व आपले जे कर्तव्य आहे ते पार पाडणे ही जबाबदारी शिक्षकांची आहे. समाजामध्ये शिक्षकाला एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. आरशाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रतिबिंब निर्माण करतो आणि त्या प्रतिबिंबाच्या द्वारे अनेक विद्यार्थी घडत असतात. त्यांचे जीवन प्रकाशमय व तेजोमय होत असते. विद्यार्थ्यांना ते एक नव संजीवनी पाजण्याचा किंवा चेतना निर्माण करण्याचे कार्य हे शिक्षक करीत असतात.
आजच्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालेले दिसून येते. 2005 पासून शिक्षण क्षेत्रामध्ये खाजगीकरण झालेले दिसून येते. तेव्हापासूनच शिक्षकांमध्ये शिक्षण सेवक हे पद तयार झालेले दिसून येते. पदवी शिक्षणामध्ये तासिका तत्त्वावर प्राध्यापक पद भरले जाते. तेव्हापासून शिक्षकांमध्ये खूप मोठी उदासीनता व बेकारी निर्माण झालेली पाहावयास मिळते. पण शिक्षक हा ना ईलाजाने विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी तयार असतो. शिक्षकांना एक आदर्श पिढी घडवायची असते. एक आदर्श नागरिक निर्माण करून राष्ट्राचा विकास करायचा असतो , ते ही कुठलीच अपेक्षा न ठेवता आपले काम करीत असतो. खडू ,फळा ,पुस्तक व विद्यार्थी हे आपले दैवत मानतो.
शिक्षक हा सर्वच क्षेत्रांमध्ये सर्व गुण संपन्न असतो म्हणून त्यांना शासनाची अनेक कामे करावी लागतात. मतदार यादी. जनगणनेची कामे. शाळेतील खिचडी वाटपाची कामे. स्वच्छता अभियान ,झाडे लावणे. विविध शैक्षणिक कार्यामध्ये उपस्थिती दाखविणे. निवडणुकीची कामे. माझी शाळा सुंदर शाळा अशी विविध उपक्रम शिक्षकांना राबवावी लागतात. आणि ते निस्वार्थपणे करतही असतात. पण आज शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात खाजगीकरण आढळून येते. डी. एड्.,बी.ए डड्. व्यावसायीक कॉलेज आज मोठ्या प्रमाणात उभारलेली आहेत. तसेच शासनाच्या धोरणामुळे कायम विनाअनुदानित. विना अनुदानित. व अनुदानित अशा शाळा व कॉलेज आहेत. त्यामध्ये काम करणारे हजारो शिक्षक आहेत. पण प्रत्येक शिक्षकांना मानधन हे वेगवेगळ्या प्रकारे मिळत असते. यामध्ये विषमता आढळून येते. मात्र काम हे सर्वांनाच सारखे करावे लागते. बऱ्याच शिक्षकांना तुटपुंज्या पगारावर नोकरी करावी लागते. ते तेथे परमनंट होत नाहीत. आज ना उद्या शाळा व कॉलेज त्यांना अनुदान येईल या आशेपोटी ते काम करत असतात. त्यांचे अख्ख आयुष्य तसेच निघून जाते. त्यांना पगार हा खूप कमी मिळतो. तरीही ते ना ईलाजाने काम करत असतात. विनाअनुदानित धोरणामुळे टप्प्या टप्प्याने अनुदान मिळत असते. पण अनुदान येते तेव्हा संस्थाचालकाकडून त्यांना पैशाची मागणी केली जाते. आणि पैसे नसतील तर त्यांना घेतलं जात नाही. जो कोणी जास्त पैसे देईल त्याचाच विचार करण्यात येतो. शिक्षक हा फक्त आशेवरच आपले जीवन जगत असतो.
आज ना उद्या आपण परमनंट होऊन व आपल्या कुटुंबाचा व मुलाबाळांना सुख सुविधा पुरवु एवढीच अपेक्षा असते. गाडी ,बंगला व मोटारसायकल हे तर दुरच राहिले ! ते फक्त स्वप्नच..पाहावे लागते.
काही काही शिक्षकांचे तर वय वाढत आहे. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बऱ्याच शिक्षकांना आज पर्मनंट नोकरी नसल्यामुळे त्यांचे लग्न सुद्धा होत नाही. त्यांना पगार कमी म्हणून मुलीचे वडील मुलगी सुद्धा द्यायला तयार नसतात. अचानक एखादा आजार उदभवला तर त्यांच्याकडे दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नसतात. ते आपला आजार अंगावर तसेच काढत असतात. शिक्षक हे खोट्या प्रतिष्ठेमुळे समाजापुढे स्वतःचे शोषण करून घेतात. शिक्षकांची पिळवणूक मोठ्या प्रमाणात पैशामुळे होत असताना दिसून येते. ज्यांच्याकडे पैसा आहे त्याची नोकरी आहे . असे चित्र पाहायला मिळते. होतकरू हुशार शिक्षकांना दहा पंधरा वर्षे शाळेमध्ये सेवा देऊनही घेतले जात नाही. एखादा जवळचा नातेवाईक किंवा राजकारणी लोकांच्या जवळचा असेल तर फक्त डिग्री असावे आणि त्याला काही ज्ञान असो वा नसो काही बघितलं जात नाही.
समाजामध्ये शिक्षकाला मान प्रतिष्ठा मिळत असते त्यांचा आदर सन्मान केला जातो. पण शिक्षकांवर अशी वेळ येते की त्याला कर्ज काढून सण उत्साह साजरे करावे लागतात. कर्जबाजारी व्हावे लागते. एकतर कमी पगार आणि खाणारे जास्त. यामुळे तो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चिंताग्रस्त होत असतो. सध्या तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आढळून येते. अशी उदाहरणे आपण वर्तमानपत्रे. टिव्ही. फेसबुक यावर आपण पाहत असतो. आजच्या घडीला शिक्षकांची अशी दुरावस्था झालेली दिसून येते...
माय जेवायला वाढत नाही.......
बाप भिक मागु देत नाही..
अशी दुरावस्था आमच्या शिक्षक बांधवांची झालेली आहे. आज अनेक पदव्या घेऊन आमचे शिक्षक बंधू ताणतणावात जीवन जगत असताना दिसून येतात.
आज आम्हाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पुर्ण झाले आहेत. तरीही आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य , समानता , हक्क , न्याय मिळत नाही. एकीकडे आपला भारत देश महासत्ताक बनवण्याचे स्वप्न पहात आहे. आणि जे शिक्षक आपल्या राष्ट्राची पिढी घडवू पाहत आहेत अशाच शिक्षकांना अनेक योजना पासून व विविध अशा सेवा पुरती पासून वंचित रहावे लागत आहे. हे एक सत्यच म्हणावे लागेल. आज मोठ्या प्रमाणात विषमतेची दरी पाहावयास मिळते. ह्या सर्व गोष्टीमुळे किंवा कारणामुळे असे म्हणावेसे वाटते की. बरेच शिक्षक बंधू हे रिटायर्ड झाले पण परमनंट नाही झाले... अशी म्हणण्याची वेळ आजच्या शिक्षक दिनाच्या प्रसंगी आली आहे.. आमचे शिक्षक बांधव हे संपूर्ण आयुष्य खडु फळा व पुस्तक यामध्ये घालवले आहे. पण शासनाच्या नियम व अटीमुळे आज ते रिटायर झाले.
अशाप्रकारे आमचा हा शिक्षक दिन साजरा करण्यात येतो...
सर्व शिक्षक बंधू-भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा......
-प्रा. सुदर्शन किशनराव शेळके ,
श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत.
ता. वसमत जि.हिगोली .
(9822644781)
No comments:
Post a Comment