![]() |
| मुख्याध्यापक आर.आर. सोनकांबळे |
अष्टपैलू व्यक्तिमत्व मुख्याध्यापक आर. आर. सोनकांबळे आज सेवानिवृत्त होताहेत ; यानिमित्त त्यांच्या कार्याची ओळख करून देणार मधुकर चांदोबा पवार यांचा लेख येथे देत आहोत. - संपादक
अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे काय असतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आर. आर. सोनकांबळे सर!
आज एकूण 36 वर्षे 10 महिने अशी प्रदीर्घ सेवा बजावून त्यांचं नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणं म्हणजे शिक्षण क्षेत्रातील एक पोकळी निर्माण होणं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
शिक्षण क्षेत्रातील तालुका स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार 2002 साली त्यांना मिळाला. तर जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार पुढल्याच वर्षी म्हणजे 2003 या वर्षी मिळाला. त्यांच्या अंगी असणाऱ्या विविध गुणांचं, सखोल विषयज्ञान, प्रभावी अध्यापन शैली, इंग्रजी व गणित या अवघड वाटणाऱ्या विषयातील त्यांची पकड या बाबींचा गौरव म्हणजेच हे पुरस्कार होते असेच म्हणावे लागेल.
आर. आर. यांचा जन्म उमरी येथे 19/10/1966 रोजी झाला.आईचं मायेचं छत्र अगदी बालपणातच हरवलं. अशाही अवस्थेत वडिलांच्या छायेत मोठे बंधू स्मृतिशेष प्रकाशदादा सोबत अध्ययन सुरु ठेवले. अभ्यासाची प्रचंड आवड, जीद्द, संगीत कलेचा वडिलांकडून मिळालेला वारसा प्रभावी ठरला. अभ्यासातील सातत्य यामुळे शालांत परीक्षेत मिळविलेले यश त्यांना नांदेडच्या सायन्स कॉलेजकडे खेचून नेले खरे पण ते तेथे रमले नाहीत. त्यांनी शासकीय अध्यापक विद्यालय नांदेड येथून डी. एड. पूर्ण केले. त्या ही ठिकाणी त्यांनी आपल्यातील चुणूक दाखवली.
त्यांच्या सेवेची सुरुवात प्रा. शा. लामकानी ता. भोकर येथे दिनांक 02/01/1988 पासून झाली. तेथून तळेगाव येथे त्यांची बदली झाली. आजही तळेगाव ही त्यांची कर्मभूमी त्यांच्या प्रभावी व अष्टपैलू व्यक्तिमत्वाला कधीच विसरू शकत नाही. आजही शाळेच्या कमानीवर कोरलेली शाळेच्या नावाची अक्षरे आजही खुणावतात.चित्रकला, गायन, वादन यांसह प्रभावी सूत्रसंचालन ही त्यांची खास क्षेत्रे अनेक ठिकाणी कौतुकास्पद ठरली.
सुंदर, रेखीव हस्ताक्षर असावे तर आर. आर. सरांसारखेच असे आम्हास आजही वाटते. बोलण्यातील माधुर्य, सहज पण विनोदी शैलीतून मार्गदर्शन असा त्यांचा स्वभाव!
सामाजिक, धार्मिक कार्यातील त्यांचा सहभाग हा नित्याचाच.'जेथे जावे तेथे'आपली छाप पाडणारं त्यांचं व्यक्तिमत्व! तळेगाव नंतर धानोरा बु. येथून ते धर्माबाद तालुक्यातील कें. प्रा. शा. चिकना येथे रुजू झाले. आजही तेथील गावकरी कमी कालावधीची सेवा करूनही त्यांची आपुलकीने आठवण काढतात.आपल्या अंगी असलेली संगीत, गायन कला त्यांनी बालपणापासूनच जोपासली. वडिलांची हार्मोनियमवर फिरणारी बोटे कोवळ्या वयात त्यांनी न्याहाळली होती. त्याचाच परिपाक म्हणजे ते उत्कृष्ट हार्मोनियम वादक आहेत. शाळेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रमातील त्यांचे वादन, गायन, सूत्रसंचालन नेहमीच उच्च दर्जाचे व अविस्मरणीय असे ठरले आहे. त्यातूनच संगीताची मेजवानी देणारा बहारदार असा “भावधारा” संगीत रजनीचा जन्म झाला. या भावधारा ने 2006 ते 2008 या काळात खूपच लोकप्रियता मिळवली होती. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी या मंचाचे कार्यक्रम झाले. राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम पुरस्कार या भावधारास मिळाला, त्याचं सर्व श्रेय आर. आर. यांनाच जातं. त्यांचं प्रभावी सूत्रसंचालन रसिकांना मोहून टाकतं.आजही त्यांनी सेवा बजावलेल्या गावातील पालक त्यांचे नाव गौरवाने घेतात. त्यांनी विद्यार्थी घडवण्यात घेतलेल्या तळमळीची गावकरी अभिमानाने आठवण काढतात.
मे-2012 मध्ये त्यांना पदोन्नती मिळाली. पदोन्नत मुख्याध्यापक म्हणून ते भोकर तालुक्यातील प्रा. शा. हाडोळी येथे रुजू झाले. आधीच ग्राम स्वच्छता अभियानात नावाजलेल्या हाडोळी या गावी त्यांची सेवा अजूनच बहरली. सोबत्याच्या सहकार्यासह तेथील अनेक विद्यार्थी नवोदय व शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.आज रोजी पदोन्नत मुख्याध्यापक पदावर असताना प्रा. शा.पिंपळकौठा (मगरे )ता. मुदखेड येथून सेवानिवृत्त होत आहेत. या पदावर एकूण 12 वर्षे 5 महिने त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे.या पदावर भोकर तालुक्यातील प्रा. शा. बेंबर येथील कार्यकाळही खूपच नावाजला गेला.
जीवनातील या शिक्षण प्रवाहात साक्षरता अभियानामध्ये जिल्ह्याचे तत्कालीन लोकप्रिय जिल्हाधिकारी मा. सुधीरकुमार गोयल यांच्या मार्गदर्शखाली उत्कृष्ट कार्य केले आहे.
आज आर. आर. वयाने सेवानिवृत्त होत आहेत, पण त्यांच्यातील ‘गुरुजी’आजही तरुणच आहे, हे मात्र नक्कीच.
सेवानिवृत्ती हे एक निमित्त आहे, त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्य यापुढे आणखीनच बहरेल, यात शंकाच नाही.त्यांचा जीवनप्रवाह नव्या उमेदीने, जोमाने, सुखी समृद्धीने अजून समृद्ध व्हावा, अशा शुभेच्छा!
-मधुकर चांदोबा पवार,
मुख्याध्यापक, कें.प्रा.शा. ढोलउमरी, ता. उमरी(रे.स्टे.)जि. नांदेड




No comments:
Post a Comment