व्हायोलिन, सतार आणि तबला यांच्या रंगतदार जुगलबंदीने पं. वसंतराव शिरभातेंना चतुर्थ स्मृतिदिनी संगीतमय आदरांजली - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, December 26, 2024

व्हायोलिन, सतार आणि तबला यांच्या रंगतदार जुगलबंदीने पं. वसंतराव शिरभातेंना चतुर्थ स्मृतिदिनी संगीतमय आदरांजली

 



किनवट : आदिवासी  तालुक्यातील बोधडी (बुद्रूक) येथे संगीतासाठी महत्वाचे योगदान देणारे व हजारो प्रज्ञाचक्षू (अंध) विद्यार्थ्यांचे जीवन स्वर प्रकाशाने उजळवून नवी दृष्टी देणारे सुरमणी पंडीत वसंतराव शिरभाते यांच्या चतुर्थ स्मृति निमित्त अंध विद्यालयात संगीत भूषण  सुविख्यात कलावंत पंकज शिरभाते, अतुल देशपांडे व रमाकांत जोशी यांच्या अनुक्रमे व्हायोलिन, सतार आणि तबला जुगलबंदी कार्यक्रमामे स्वर वसंत संगीतमय आदरांजली वाहण्यात आली.

     प्रारंभी अंध विद्यालयाच्या प्राचार्या नंदा नवसागरे, ज्येष्ठ विद्यार्थी दत्ता पांचाळ, राजेश ठाकरे, निमंत्रित कलावंत आणि गुरुमाय शारदाताई व  शिरभाते  परिवार यांनी प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन केले. कार्यक्रमाचे संयोजक पंकज, संतोष व गुरुमाय शारदाताई व मनीषा ताई  शिरभाते यांनी सर्व कलावंतांचा आणि मान्यवरांचा सत्कार केला. गुरुजींचे जेष्ठ शिष्य दत्ता पांचाळ यांनी प्रस्तावना करताना गुरुजी स्व. वसंतराव यांच्या प्रेरणादायी जीवन कार्याचा परिचय देऊन त्या काळातील सुरुवातीपासूनच्या आठवणी सांगितल्या. गुरुजींच्या जीवन चरित्रावर भारत शिंदे (नांदेड ), वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील, वासुदेव राजूरकर (नागपूर ) यांनी मनोगत व्यक्त केले.

     आरंभी अंध विद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख राजेश ठाकरे व विद्यार्थी कृष्ण देवकते, लक्ष्मण भिंगेवार, दिनेश घोगरे व शेख नावेद यांनी सुमधुर स्वरात स्वागत गीत सादर करून वातावरण भावपूर्ण केले. त्यानंतर संगीत सभेत पं. वसंतरावांचे जेष्ठ पुत्र तथा शिष्य पंकज शिरभाते यांनी आरंभी व्हायोलिन वर  राग देश सहज सुंदर हरकतीच्या तोड्यांसह द्रुत अतिद्रुत तबला जुगलबंदी सह सादर करून सुंदर सुरुवात केली. त्यांना तबल्यावर सुंदर साथ ज्येष्ठ कलावंत दत्ता पांचाळ यांनी करून रंगत आणली. त्यानंतर निमंत्रित कलावंत अतुल देशपांडे यांनी सतारीवर राग यमन सादर केला. सुंदर आलाप जोड आणि झाला सादर करून मध्यलयीत गतीमध्ये मोत्याच्या लडी प्रमाणे तोडे वाजवून रसिकाना मंत्रमुग्ध केले. या वेळी सतार वादनाला तबल्यावर दमदार साथ करणारे रमाकांत जोशी यांनी सुंदर उठाण घेऊन आरंभीपासूनच जुगलबंदीत रंगत आणली. यमन रागानंतर पहाडी धून ऐकवून त्यातील विविध हरकती व तबल्यासोबत ची तोडे, पलटे, द्रुत लयकारी सह जुगलबंदीने कार्यक्रम रंगत गेला. आपल्या बहारदार सतार वादनाचा समारोप रसिकांच्या आग्रहास्तव सुंदर भैरवीतील धून वाजवून केला. कार्यक्रमाचे सुंदर ओघवत्या शब्दात सूत्रसंचालन डॉ. प्रमोद देशपांडे यांनी केले. 

      या कार्यक्रमासाठी अंध विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांसमवेत गंगुताई पांचाळ, शंकर पोले, मुकुंद कुंटुलवार, भारत शिंदे, रामराव जोजार , ज्ञानेश्वर अहेरकर, सचिन जाधव, अमर चाडावर, शिवा  कोंडे, वंदना दुर्गपुरोहित-सदावर्ते, उत्तम कानिंदे, सुरेश पाटील, सोमवंशी, उमाकांत सोमवंशी, गजानन वानखेडे, विश्वनी गट्टम, सुरेश कराड, उमाकांत केंद्रे, पांडुरंग गर्दसवार, रघुनाथ पांचाळ यांसह बोधडी, किनवट , हिमायतनगर, नांदेड अशा दूर दूर भागातील गुरुजींचे शिष्य आणि शेकडो  संगीत रसिक भरगच्च संख्येने उपस्थित होते.

     कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिरभाते परिवारासह आदिवासी कला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजू टारपे व सचिव प्रकाश टारपे, प्राचार्या नंदा नवसागरे, राजेश ठाकरे, राजूरकर गुरुजी , विशाल शेरे यांचेसह अंध विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News