*'पॉक्सो कायद्यांतर्गत तातडीने कार्यवाही करा'; कोंढवा परिसरात स्कूल बस चालकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, December 26, 2024

*'पॉक्सो कायद्यांतर्गत तातडीने कार्यवाही करा'; कोंढवा परिसरात स्कूल बस चालकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश*

 



पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : पुणे शहर परिसरात महिला आणि लहान मुलींवर विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.एकंदरितच पुणे शहर व ग्रामीण परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.

     अशीच आणखी एक संतापजनक घटना कोंढवा परिसरात घडली आहे. येथे एका शाळकरी मुलीवर दि. ११ डिसेंबर, २०२४  रोजी विनयभंगाची घटना घडल्याचे समाजमाध्यमांद्वारे निदर्शनास आले आहे. याप्रकरणात कोंढवा पोलीस स्टोशनमध्ये गुन्हा क्र. १३८८/२०२४ नोंदविण्यात आला असून आरोपीस दि. २४ डिसेंबर, २०२४ रोजी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी असे निर्देश शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्त यांना दिले आहेत. 


     सदरची घटना पुण्यासारख्या पुरोगामी आणि महिला सक्षमिकरणास प्राधान्य देणाऱ्या शहराला निश्चितच शोभणारी नाही. अशा परिस्थितीत पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारावी आणि मुली व महिलांना सुरक्षिततेचे वातावरण मिळावे असं म्हणत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत. 


     आरोपी बस चालकावर पॉक्सो कायद्यांतर्गत तत्काळ कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी व त्यास जामीन मिळणार नाही याची दक्षता घेण्यात घ्यावी. या घटनेतील सर्व परिस्थितीजन्य पुरावे व न्यायवैद्यकीय दस्तऐवज एकत्रित करून न्यायालयापुढे सादर करण्यात यावे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे व यासाठी शासनातर्फे विशेष सरकारी अभियोक्त्यांची नियुक्ती प्राधान्याने करण्यात यावी. जेणेकरून, आरोपीस कठोर शिक्षा होणे सुलभ जाईल. पीडित मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्यात यावे व त्यांना मनोधैर्य योजनेतून यथाशक्य मदत देण्यात यावी. 



     शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या वाहतूक बसबाबत शासनाने काही मार्गदर्शक सूचना दि. १८ मार्च, २०१६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे निर्गमीत केल्या आहेत.

      सदरच्या शासन निर्णयान्वये मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांच्या निर्देशांचे अवलंबन करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर राहील व संबंधित शिक्षणाधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून कार्य करतील. अशा सूचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर, संबंधित शाळेने मुलींच्या सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसंदर्भात कोणत्या उपाययोजना केल्या याची चौकशी करावी. तसेच, शाळकरी मुलींच्या संरक्षणाच्या व सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीकोनातून शासनाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. 'आपणातर्फे करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल कृपया माझ्या कार्यालयास अवगत करण्यात यावा', असेही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्तांना सूचित केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News