किनवट : तालुक्यातील उमरी (बाजार) येथे स्मृतीशेष यादवराव मुनेश्वर यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त " उन्हाळ्यात काळी माती भारी तापली तापली , शेतामधी मह्या 'बा' ची नाळ औताला जुपली..." अशा कवितांच्या भन्नाट सादरीकरणांनी दुपारी ग्रामीण कवी संमेलन, " मी सावित्री बोलतेय " सायंकाळी एकपात्री अभिनय व रात्री प्रबोधन गीते उत्साहात संपन्न झाली.
तेलंगाणातील प्रसिद्ध गझलकार मधु बावलकर अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ पत्रकार ऍड. मिलिंद सर्पे, बळीराम पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पंजाब सेरे, सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी रवींद्र जाधव हे प्रमुख पाहुणे होते. सर्वप्रथम स्मृतीशेष यादवराव मुनेश्वर यांना आदरांजलीपर अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. स्वागताध्यक्ष पुंडलिक मुनेश्वर यांनी पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी दादाराव मुनेश्वर, जितेंद्र कांबळे, सुरेश पाटील, जीवन कोटरंगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकार गोकुळ भवरे , भाग्यवान भवरे,विजय कावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यांनंतर ग्रामीण कवी संमेलन सुरु झाले. संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. प्रा. उमेश मुनेश्वर यांनी आभार मांनले.
"कडक उन्हातही बाप सावली वाटत होता ,
लेकुरवाळा पंढरीचा माऊली वाटत होता ,
स्वाभिमानी ताट मान गाजावाजा होता ,
फाटक्या कपड्यातही बाप राजा वाटत होता..
प्रा. विनोद कांबळे यांच्या या कवितेने संमेलनात रंगत आणली. त्यानंतर प्रा. गजानन सोनोने यांनी माणसाच्या हृदयाचा ठाव घेणारी रचना सादर केली..
"पाखरांनी खाल्ल्यावर उरली ती कणसे तुझी आहे ,
या गावाचा नाही मी तरी ही माणसे माझी आहे..
गझलकार रुपेश मुनेश्वर यांनी ग्रामीण शेतकऱ्यांचे जीवन आपल्या रचनेतून उभे केले..
"उन्हाळ्यात काळी माती भारी तापली तापली ,
शेतामधी मह्या 'बा' ची नाळ औताला जुपली ,
चाले नांगराचा फाळ धरतीच्या अंगावरी ,
धारा वाहते घामाच्या बा'च्या अंगा खांद्यावरी ,
रोज सूर्यनारायणा आग ओकतोही कसा
ढग दाटून आले सर मिरगाची आली..
सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी कष्टकऱ्यांचे मोल सांगणारी रचना सादर करून दाद मिळवली..
"शेतकरी राजा माझा पिकवतो धान ,
अनमोल श्रमाचे असू द्यावी जान
ऊन वारा पावसाचे नसे त्याला तमा ,
राबे शेतामधी कष्ट येतील ते कामा
चेहऱ्यावर असे त्याच्या सदा समाधान..
कवी सुभाष बोडेवार, अशोक वासाटे, वंदना तामगाडगे, तुकाराम जिवणे, तुकाराम जाधव, गौतम शिंगणकर, परसराम सोनकांबळे, रणजित वर्मा, शेषराव पाटील, मिलिंद कंधारे, मिलिंद पडगीलवार, राजू कांबळे, सदाशिव कानिंदे यांनी एकापेक्षा एक ग्रामीण कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
सांयकाळी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका पुण्यरथा नगारे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित "मी सावित्री बोलतेय.. हा एकपात्री प्रयोग सादर केला. गावकऱ्यांनी नाट्य प्रयोगाला चांगला प्रतिसाद दिला. रात्री महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक विकासराजा गायकवाड यांचा प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम झाला. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
निमंत्रक संत फुलाजीबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य सुबोध थोरात, राजेश मुनेश्वर, प्रा. सुबोध सर्पे आणि आयोजक यादवपुत्र रमेश मुनेश्वर यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले होते. शेख करीम, गजानन पाटील, गुणवंत तगलपल्लेवार, वामन कोटरंगे, परमेश्वर पवार, अशोक कोम्मावर, मसूद खान, गणेश पडगीलवार, गौतम उमरे, धम्मपाल भगत, भारत मुनेश्वर, दिलीप भगत, कविराज पाटील, रमेश जाधव, जीवन कांबळे, अशोक फुलझेले, श्रावण परेकार, गौतम भुरे, क्षितीज मुनेश्वर, रुपेश मुनेश्वर, जीवन भवरे, सुभाष जाधव, गौतम लढे आदिनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment