नांदेड, ता.17 : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव येथील श्री खंडोबाच्या यात्रेचे आयोजन उत्कृष्ट व उत्तम पद्धतीने पार पडावे, यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. त्यामुळे यात्रेच्या वैभवात आणखी भर पडेल, असे प्रतिपादन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
माळेगाव यात्रा नियोजनासंदर्भात आज माळेगाव येथील जिल्हा परिषद भंडारगृहात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, यात्रा सचिव डी. बी. गिरी, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, उपविभागीय अधिकारी रामेश्वर गोरे, तहसीलदार विठ्ठलराव परळीकर, कृषी संवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त राजकुमार पडीले, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, बांधकाम कार्यकारी अभियंता संजय शिंदे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. अनिलकुमार ऐतवडे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता अशोक भोजराज, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, लोहा पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील, सचिन पाटील चिखलीकर, चंद्रमणी मस्के, शंकरराव ढगे, भगवानराव हाके, गीते महाराज, बोरगावकर, दत्ता वाले, माळेगाव सरपंच हनमंतराव धुळगंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी आमदार चिखलीकर म्हणाले, माळेगाव यात्रेच्या वैभवात भर पडावी, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. यात्रा चांगली पार पाडण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. ही यात्रा कलावंतांची आहे. अनेक नामवंत कलाकार माळेगाव यात्रेतून घडले आहेत. त्यामुळे यात्रेत सहभागी कलाकारांचे संरक्षण व सन्मान करण्यात यावा,असे त्यांनी निर्देश दिले.
शेतकऱ्यांठी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने भव्य कृषी प्रदर्शन आणि पशुस्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच यात्रेदरम्यान पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, वीजपुरवठा, आरोग्य सेवा आणि इतर भौतिक सुविधा यांची प्रभावी व्यवस्था करण्याचेही निर्देश आमदार चिखलीकर यांनी संबंधित विभागांना दिले. यावेळी त्यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला.
माळेगाव यात्रेतील श्री खंडोबारायांच्या पालखीचे पूजन शासकीय पूजा म्हणून व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. मी देखील या आशयाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार आहे,असे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या वतीने यात्रेचे योग्य नियोजन करण्यात येत आहे. आमदार महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार सर्व अधिकारी यात्रेदरम्यान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतील. यात्रा शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासन दक्ष राहील. तसेच सर्व माध्यम प्रतिनिधी व ग्रामस्थांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, श्री खंडोबाच्या माळेगाव यात्रेला 18 डिसेंबर 2025 रोजी देवस्वारी व पालखी पूजन होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेदरम्यान जिल्हा परिषदेच्या वतीने विविध स्पर्धा, कुस्त्यांची प्रचंड दंगल, लावणी महोत्सव, पारंपारिक लोककला महोत्सव आणि अन्य आकर्षक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा यात्रा सचिव डी. बी. गिरी यांनी केले.




No comments:
Post a Comment