नांदेड ता. 1 नोव्हेंबर:- नैसर्गिक वाळूवरील दबाव कमी करण्यासाठी व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने राज्य शासनाच्यावतीने कृत्रिम वाळू (एम-सॅंड) उत्पादन प्रोत्साहन उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील उद्योजक, सहकारी संस्था, महिला बचत गट, युवक व कृषी-आधारित उद्योगांनी एम-सॅंड प्रकल्प स्थापन करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
जिल्हाधिकारी यांनी काल ३१ ऑक्टोबर रोजी लोहा येथील एम-सॅंड प्रकल्पाची भेट घेऊन प्रकल्पाची सविस्तर पाहणी केली. प्रकल्पाची प्रक्रिया, उत्पादन यंत्रणा, गुणवत्ता परीक्षण, पर्यावरणीय मानदंड व बाजारपेठेची मागणी याबाबत त्यांनी माहिती घेतली.
जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले, “शासनाच्या विविध औद्योगिक, पर्यावरण व उद्योजकता प्रोत्साहन योजनांतर्गत एम-सॅंड प्रकल्पांना प्राधान्याने वित्तीय सहाय्य, मार्गदर्शन आणि तांत्रिक मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. पर्यावरणपूरक विकासाला चालना देण्यासाठी एम-सॅंड हे अत्यंत आवश्यक व काळाची गरज आहे.”
नैसर्गिक वाळूचे संरक्षण, बांधकाम क्षेत्रातील गुणवत्ता व उपलब्धता वाढविणे, स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती, आणि युवक-उद्योजकांसाठी नवीन व्यवसाय संधी उपलब्ध करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
एम-सॅण्ड (कृत्रिम वाळू) युनिटसाठी मंजूर खाणपट्टा असलेले, तात्पुरता परवाना असलेले, कोणत्याही प्रकारचा खाणपट्टा नसलेले ईच्छूक व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रे जोडून 2 डिसेंबर 2025 पर्यत अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
इच्छुकांनी जिल्हा उद्योग केंद्र, पर्यावरण विभाग आणि पंचायत राज संस्था यांच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊन प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर करावेत, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.





No comments:
Post a Comment