बाबुलतार ता.पाथरी जि.परभणी येथे घेतलेली बाजरी परत घे म्हणणाऱ्या हिंदू मातंग युवकाला दुसऱ्या हिंदू कडून डोक्यात रॉड घालून जखमी केले आहे ..! यानुषंगाने प्रा. डॉ. मारोती कसाब यांचा लेख येथे देत आहोत . - संपादक
पूर्वी असेच गावोगावी स्वतःला हिंदू म्हणवून घेणाऱ्या मांग- महारांवर हल्ले केले जायचे. कारण मांग महारेतर हिंदूंच्या मनामध्ये मांग महारांबद्दल पोथ्या- पुराणांतून, मनुस्मृतीतून आणि पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या मौखिक परंपरेतून प्रचंड विद्वेष पसरवला गेलेला आहे.
" कुत्रं- मांजर जनावर नाही आणि मांग- महार माणूस नाही", अशा म्हणींतून मांग महारांचे आपल्या समाजात, तथाकथित हिंदू धर्मात काय स्थान होते, ते स्पष्ट आहे. म्हणजेच मांग महारांना आमच्या बरोबरीने जगण्याचा अधिकार नाही, हेच या व्यवस्थेकडून हजारो वर्षे इतरांना शिकविण्यात आले होते. मांग - महारांच्या बाबतीत " पायीची वहाण पायीच बरी ! " हा संतांचा दाखला वारंवार दिल्या जायचा. मांग आणि महारांना आमच्या सेवेसाठीच ईश्वराने निर्माण केले आहे, असा समज पद्धतशीरपणे निर्माण करून देण्यात व्यवस्था यशस्वी झाली होती.
या सनातनी व्यवस्थेचा महारांपेक्षाही मांगांवर अधिक राग होता. कारण गावागाड्यात मांग स्वतःला कृषीचे पुरोहित, पंडित समजत. आम्हीच बळीला बैल दिला, अशा गुर्मीत वावरत. त्यामुळे तरण्याबांड मांगांना पकडून, त्यांच्या तोंडात तेल आणि शेंदूराचे पातळ मिश्रण ओतून त्यांचा आवाज कायमचा बंद करून, कथित धर्माच्या नशेत झिंगलेल्या जमावाकडून मारहाण करत त्यांना गढीबुरुजात जिवंत पुरले जायचे. आधी मांग मारला जायचा आणि नंतर त्याला 'मांगवीर' म्हणून घोषित केले जायचे. कधी विहिरीला पाणी लागत नाही म्हणून, कधी किल्ल्याची तटबंदी, वाड्याची, धरणाची भिंत चढत नाही म्हणून तर कधी मातीची गढी, बुरुज ढासळू लागला म्हणून मांगाला जिवंत गाडले गेल्याची शेकडो उदाहरणे महाराष्ट्रात आहेत. त्याशिवाय गावाचं भलं व्हावं म्हणून मांगांनी दुसऱ्या गावावरून जिवंत विस्तव आणण्याची प्रथा होती. असा विस्तव आणताना मांग सापडलाच तर ज्या गावातून त्याने विस्तव आणला त्या गावचे गावकरी त्याला शिवेच्या आत ठार करीत. आणि तिथेही मांगवीराचे ठाणे उभारले जाई. आजही गावा- गावातील वेशीत, मोठमोठ्या वाड्यात, गढी- बुरुजात आणि गावागावांच्या सीमांवर बळी ठरलेल्या मांगवीरांची तेल शेंदूर फासून ठेवलेल्या दगडांच्या स्वरूपात असंख्य स्मारके आढळून येतात.
महात्मा फुले यांनी सर्वप्रथम मांग- महारांच्या या बिकट स्थिती गतीचा अभ्यास केला. मांग महार हे या भूमीचे मूळ क्षत्रिय असल्याचे त्यांनी दाखले दिले. इ. स. १८६९ साली ' ब्राह्मणांचे कसब ' हा आपला ग्रंथ त्यांनी कुणबी, माळी यांच्यासह मांग महारांंना अर्पण केला. बाहेरून आलेल्या आर्यांनी या देशातील मूळनिवासी मांग महारांना कसे छळले, हे सांगताना जोतीराव लिहितात- " मांग महाअरी केले बहु जेर । शिक्षा खडतर । आर्याजींची ।। "
धर्माच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या आर्यांनी मांगमहारांना एकत्रच छळले असल्याचे दाखले वारंवार महात्मा फुले देतात. एका अखंडात ते म्हणतात - " शूर मांग महारा आर्यें नागविले । पशुवत केले । जोती म्हणे ।। " पूर्वीच्या काळी मांगासोबतच महारांचाही बळी दिला जात असे. त्यांनी साक्षात बळीराजाला पाताळात घातले ; तिथे मांगामहारांचे काय..? जोतीराव लिहितात - " आर्यें जेर दस्त मांग महारा केले । पाताळी घातले । स्पर्श बंदी । धूर्त ऋषीजींनी वेदास रचिले । द्वेशाने छळिले सीमा नाही ।। " वेद, पुराणे आणि मनुस्मृतीच्या माध्यमातून मांग महारांचे जगणेच नाकारण्यात आले होते.
महात्मा फुले यांच्या शाळेतील विद्यार्थिनी मुक्ताबाई साळवे लिहिते, " जर वेद आधारे करून, आमचा द्वेष करणारे लोक यांच्या मताचे खंडन करावे तर हे आम्हांपेक्षा उंच म्हणविणारें; विशेष करून लाडू खाऊ ब्राह्मण लोक असे म्हणतात की, वेद तर आमचीच मत्ता आहे, आम्हीच ह्याचे अवलोकन करावे. .... ज्या वेदाच्या योगाने ईश्वराविषयी व मनुष्यांविषयी कसे वागावे व शास्त्रीय व कला कौशल्याच्या योगाने आपल्या आयुष्याचा क्रम या जगात चांगल्या रीतीने घालविता यावा (असे जर त्यात आहे) तर तो आपल्यापाशी बळकावून बसणे, हे किती क्रूर कर्म आहे ...? परंतु इतकेच नाही, आम्हा गरीब मांग महारांस हाकून देऊन, आपण मोठमोठ्या इमारती बांधून, हे लोक बसले व त्या इमारतीच्या पायांत आम्हांस तेल शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा क्रम चालविला होता." यावरून मांग महार माणूस या भूमीवर जिवंत राहूच नये अशी व्यवस्था इथल्या सनातनी धर्म व्यवस्थेने केलेली दिसून येते. आमचा निर्वंश करण्याचा प्रयत्न या लोकांनी चालवला होता, असा स्पष्ट आरोप मुक्ता साळवे यांनी केला आहे.
महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानून पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांग-महारांच्या दुःखाचे कारण शोधले. येथील मनुस्मृति प्रणित धर्म व्यवस्थेत आणि त्यातून निर्माण झालेल्या जातीव्यवस्थेत या दुःखाचे कारण बाबासाहेबांना सापडले. ' ऍनहिलेशन ऑफ कास्ट्स ' (जातीसंस्थेचे निर्मूलन ) या शोधनिबंधात त्यांनी मांगा - महारांच्या दुःखाचे मूळ शोधून काढले आहे. इथल्या पारंपरिक धर्म व्यवस्थेच्या शिकवणुकीतच ते असून या व्यवस्थेचा पायाच तसा आहे, हे त्यांनी दाखवून दिले. आणि यावरचा उपाय त्यांनी ' मुक्ती कोण पथे?' या लिखित भाषणातून स्पष्टपणे सांगितला आहे. आमच्या मुक्तीचा मार्ग कोणता? हे सांगताना त्यांनी सर्व स्पष्ट केले आहे. १९३५ साली त्यांनी "मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही " ही प्रतिज्ञा केली आणि १९५६ साली ती खरी करून दाखवली.
शेकडो वर्षांपासून सोबत असलेले मांग महार १९५६ साली वेगवेगळे झाले. महार बौद्ध झाले आणि मांग व्यवस्थेच्या गाळात खोल रुततच गेले. सनातनी धर्म व्यवस्थेला छळण्यासाठी हक्काचे गुलाम मिळाले. ज्याप्रमाणे मांजर उंदरांशी खेळते त्याप्रमाणे ही व्यवस्था आता मांगांशी खेळत आहे.
१९५० साली आपण भारतीय संविधान स्वीकारल्यामुळे काही काळ हे अन्याय अत्याचार बंद झाले होते. पण आता भारतीय संविधानच बासनात गुंडाळले गेले असून, पुन्हा एकदा सनातनी व्यवस्थेचा नंगानाच सुरू झाला आहे. आता मांगाचे पुन्हा एकदा ' मांगवीर ' करणे सुरू झाले आहे. फक्त तेल शेंदूर पाजण्याची रूढी तेवढी बदलली आहे. बाकी सर्व काही तेच आहे. दररोज कुठे ना कुठे अन्याय होत आहे आणि दुर्दैव हे की, आपलेच काही लोक अन्याय करणाऱ्यांच्या बाजूने उभे आहेत..!
या व्यवस्थेचे सर्वाधिक बळी तरुण ठरणार आहेत. तेव्हा तरुणांनो, तुम्हीच विचार करा. पुन्हा एकदा 'मांगवीर' व्हायचे का माणूस म्हणून जगायचे...?
- प्रा. डॉ. मारोती कसाब




No comments:
Post a Comment