किनवट : विविध बातम्यांतून विद्यार्थ्यांवरील शारीरिक शिक्षेच्या घटना समोर येत असल्याने समाजात याविषयी चिंता व्यक्त होत आहे. तेव्हा विद्याथ्यांचे मानसिक आरोग्य , सुरक्षा आणि शिक्षक - विद्यार्थी नाते बळकट करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री महोदयांच्या संकल्पनेतील "सकारात्मक शिस्त" सर्व शाळांमध्ये राबविणे आवश्यक आहे. असे प्रतिवादन गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी केले.
ते येथून जवळच असलेल्या कोठारी (चि) येथील मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित गोकुंदा व शनिवारपेठ केंद्राच्या "केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत" मार्गदर्शन करतांना बोलत होते.
यावेळी गोकुंदा केंद्राचे केंद्रप्रमुख उत्तम कानिंदे व केंद्रिय मुख्याध्यापक रवि नेम्माणीवार , शनिवारपेठ केंद्राचे केंद्र प्रमुख राम बुसमवार व केंद्रिय मुख्याध्यापक आर .आर. जोशी , मुख्याध्यापक संघटनेचे तालुका सचिव अरविंद राठोड , महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद मुनेश्वर , एमकेटीचे शेख शेहबाज यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना गट शिक्षणाधिकारी श्री महामुने असे म्हणाले की, आपण प्रथम मुलांमध्ये राष्ट्रप्रेम जागविण्यासाठी संविधानातील मूलभूत कर्तव्ये दैनिक परिपाठात घ्यावी. संविधानातील
मूल्यांची रूजवणूक करावी. रोजच्या वर्तमानपत्रातील बातम्या पाहता अशा घटना घडू नयेत यासाठी शाश्वत उपाययोजना गरजेच्या आहेत म्हणून शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतील " सकारात्मक शिस्त " प्रत्येक शिक्षकांनी शाळेत अनुसरणे अत्यावश्यक आहे . विद्यार्थ्यांना भीती , अपमान किंवा शिक्षा न देता योग्य वर्तन शिकविण्याची विज्ञानाधारित पद्धती म्हणजेच सकारात्मक शिस्त होय.
यावेळी सकारात्मक शिस्त या विषयावर मुक्ता आलेवार , डॉ. जयंत नारळीकर गणित विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम आणि पुढील दिशा या विषयावर विनय वैरागडे , योगेश वैद्य , बाल सुरक्षा या विषयावर राजेश राठोड व माता पालक गट या विषयावर अविनाश पिसलवार या सुलभकांनी सविस्तर माहिती दिली. तथागत पाटील यांनी पीपीटी सादरणीकरणास संगणक सहाय्य केले.
केंद्र प्रमुख राम बुसमवार यांनी प्रास्ताविक केले. केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले आणि सकारात्म शिस्त , याचा उद्देश , सकारात्मक शिस्तीचे तंत्र , उपाय , उपक्रम यावर चर्चा घडवून आणली. तसेच मेंदू तज्ज्ञ डॉ. पॉल मॅक्लिन यांचा शिअरी ऑफ डाऊन शिफ्टींग हा सिंद्धात समजावून शिक्षेचा मनावर व मेंदूवर होणार परिणाम सांगितला .




No comments:
Post a Comment