किनवट : नांदेड येथे ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाच्या पूर्वतयारी साठी गोकुंदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात रविवारी (ता. २६) दुपारी चार वाजता बैठक आयोजित केली आहे. किनवट तालुक्यातील अनुसूचित जाती संवर्गातील सर्व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे , असे आवाहन आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा कृती समिती, नांदेडच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील अनुसूचित जाती प्रवर्गात एकूण ५९ जातींचा समावेश आहे. यापैकी ५८ जातींनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची कोणतीही मागणी केलेली नाही. उपवर्गीकरणाची मागणी एका जातीतील काही व्यक्ती, स्वयंघोषित नेते व तथाकथित विचारवंतांकडून केली जात आहे. ही मागणी संपूर्ण मातंग समाजाची भूमिका मानता येणार नाही, कारण या विषयावर त्या समाजातील अनेक व्यक्ती व संघटनांनीही असहमती व्यक्त केली आहे. त्यामुळे ही मागणी अनुसूचित जाती समाजाच्या एकमताचे प्रतिनिधित्व करत नाही, असे आमचे मत आहे. १ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने विशिष्ट अटींच्या अधीन राहून राज्यांना अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींमध्ये उपवर्गीकरणाचा विचार करता येईल, असे नमूद केले आहे. त्यासाठी सक्षम आयोग, अनुभवाधारित (Empirical) माहिती, सखोल अभ्यास आणि वस्तुनिष्ठ निकष आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले आहे. पण राज्य सरकार यातले काहीही न करता थेट उपवर्गीकरणाची घोषणा करण्याच्या तयारीत आहे.
राज्य सरकारला उपवर्गीकरणाची इतकी घाई का ? कारण त्यांना उपवर्गीकरण करायचे नाही तर त्यांना मतांचे राजकारण करायचे आहे. याआधी त्यांनी मराठा विरुद्ध ओबीसी, आदिवासी विरुद्ध धनगर असे भांडण लावले. आता त्यांना मातंग आणि इतर अनुसूचित जाती असे भांडण लावायचे आहे. फोडाफोडीचे हे दुष्ट षडयंत्र वेळीच हाणून पाडले पाहिजे. जाती समूहात द्वेष कलह निर्माण करण्याचे काम आरएसएस आणि भाजपासह महायुती सरकार करू लागले आहे. या सर्वांचा कडाडून विरोध म्हणून नांदेडमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आरक्षण उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडण्यासाठी येत्या रविवार, ता. ९ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड येथे भव्य 'आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा' आयोजित केला आहे. यामोर्च्यात डॉ. बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर , आनंदराज आंबेडकर , माजी मंत्री राजकुमार बडोले , चर्मकार महासंघाचे अध्यक्ष माजीमंत्री बबनराव घोलप , संविधान तज्ज्ञ सुरेश माने आदी मान्यवर सहभागी होत आहेत. तेव्ह किनवट तालुक्यातील जास्तीत जास्त कार्यक्रत्यांनी या बैठकीस उपस्थित रहावे , असे आवाहन आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा कृती समिती, नांदेड ,अखिल भारतीय भिक्खु संघ, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा यांनी केले आहे.





No comments:
Post a Comment