किनवट : एकीकडे अनेक शाळा विद्यार्थ्यांच्या शोधात असतात परंतु प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी जिथे होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित व सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव असलेल्या या शाळेचे अनेक विद्यार्थी डॉक्टर्स, इंजिनियर्स तसेच इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणूनही काम करताहेत ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. अशाच प्रकारे गुणवंत विद्यार्थ्यांनी आपलं उज्ज्वल भवितव्य निवडून देशपातळीवर विविध क्षेत्रात आपलं नाव गाजवावे, असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले.
येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले व मातोश्री कमलताई ठमके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूल , कोठारी (चि)च्या वतीने गुरुवारी (ता.13 ) एम.के.टी. कॅम्पस , कोठारी (चिखली) येथे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते.
याप्रसंगी आदिवासी सेवक नारायण सिडाम, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे वरिष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, शालेय पोषण आहार अधिक्षक अनिलकुमार महामुने, निवृत्त उप विभागीय कृषी अधिकारी नारायण डवरे, चंद्रलेखा डवरे, मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभि. प्रशांत ठमके, मानव विकास कार्यक्रम तालुका समन्वयक उत्तम कानिंदे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
शालेय पोषण आहार अधिक्षक अनिलकुमार महामुने व आदिवासी सेवक नारायण सिडाम यांनी आपले विचार मांडले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महानायकांच्या प्रतिमेचे पुष्पपुजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. 10 वी , 12 वी परिक्षेत विशेष प्राविण्य घेणारे , काही विषयांत पैकीच्या पैकी गुण घेणारे , देश पातळीवरील विविध स्पर्धा परिक्षांमध्ये यशवंत ठरलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालककांसह शाल, पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन मानवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्राचार्य शुभांगीताई ठमके यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या यशाचा आलेख मांडला. पर्यवेक्षक संतोष बैसठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. तसेच वैशाली साबळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
याप्रसंगी पत्रकार गोकुळ भवरे, बापुसाहेब तुप्पेकर, रविराज कानिंदे व गंगाधर कदम आदिंसह गुणवंतांचे पालक , शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप प्राचार्य राधेश्याम जाधव, उप मुख्याध्यापक किशोर डांगे, पर्यवेक्षक रघुनाथ इंगळे, मुकिंद मुनेश्वर , एम.एम. भोयर यांचेसह सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.





No comments:
Post a Comment