किनवट (नांदेड) : पोलीस अधिकारी असलेल्या तालुक्यातील लेकीचा शनिवारी (ता. १५ ऑगष्ट २०२६) ८० व्या स्वातंत्र्य दिनी यवतमाळ येथील मुख्य शासकीय ध्वजारोहन प्रसंगी यवतमाळात जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आल्याने सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, डॉ. आंबेडकर नगर गोकुंदा येथील रहिवाशी यशोधरा लिलाबाई दिगंबर मुनेश्वर ह्या महाराष्ट्र पोलीस अंतर्गत यवतमाळ जिल्हा पोलीस विभागात सायबर पोलीस स्टेशन, यवतमाळ येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत भा.न्या.सं. चे कलम १३७ (२) अन्वये नोंद गुन्ह्यातील अपहृत मुलींचा शोध घेण्यासाठी ता.०८ जून २०२६ ते ता. २२ जून २०२६ दरम्यान "ऑपरेशन शोध-४' ही विशेष मोहीम राबविण्यात आली होती. यादरम्यान त्यांनी उपलब्ध पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण करून व गोपनीय माहितींच्या आधारे एकूण ६० मुलींचा शोध घेऊन त्यांचे समुपदेशन करून त्यांना त्यांच्या कुटुबियांचे स्वाधीन केले. त्यांनी केलेली कामगिरी ही निश्चितच कौतुकास्पद व प्रशंसनीय आहे.
या गुन्ह्यात दाखविलेली तपासातील दक्षता, चिकाटी व तत्परता ही नक्कीच स्तुत्य असून त्यांची कामगिरी ही यवतमाळ जिल्हा पोलीस विभागाकरिता अतिशय अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांना महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्हाचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना (भा.प्र.से.) व यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से.) यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यांनी अल्पावधीत केलेल्या अभिमानास्पद कामगिरीची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविल्या बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.






No comments:
Post a Comment