नांदेड : लोकशाहीर महाकवी डॉ.वामनदादा कर्डक यांच्या शब्दांतून ...
“सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?
सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो?”
... अशा गीत गायनातून आर्जव करुन आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (ता.२५ ऑगस्ट २०२६) बहुजन टायगर युवा फोर्स व पारंपारिक लोककला संवर्धन मंडळाच्या वतिने आयोजित भव्य भजन आंदोलनाने नांदेडचा जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.
आपल्या न्याय व हक्कासाठी साहित्यिक व लोकपारंपारिक कलावंतांनी बहुजन टायगर युवा फोर्स आणि पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तसेच, राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी निवड जिल्हास्तरीय समितीचे अशासकीय सदस्य त्रिरत्नकुमार मा.भवरे कामारीकर यांच्या नेतृत्वात या भजन आंदोलनात सहभागी लोकपारंपारिक कलावंतानी जिल्हाधिकारी तथा,राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत सन्मान योजनेंतर्गत मानधन लाभार्थी निवड जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष यांना निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर त्यांनीही यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज व विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना सामाजिक कार्यकर्ते कैलास माने पोटेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पात्र वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना शासनाकडून सध्याचे दरमहा ५ हजार रुपयांचे मानधन अत्यंत तुटपुंजे असल्याने वाढत्या महागाईच्या काळात त्यातून कलावंतांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असल्याने त्यात वाढ करून ते किमान १० हजार रुपये करावे,नांदेड जिल्ह्याचे कार्यक्षेत्र तसेच,वृद्ध साहित्यिक व कलावंतांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन मानधनासाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या दरवर्षी १०० ऐवजी १००० पर्यंत वाढवा, लाभार्थी वयोमर्यादा ५० वरून ४० वर्षे करावी, सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत कलावंतांना समाजप्रबोधन व जनजागृतीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, केंद्र सरकारकडून वयोवृद्ध कलावंतांच्या मानधनात केलेली कपात दूर करुन महाराष्ट्र शासनाने मानधनात किमान १० हजार रुपयांची वाढ करावी, कलावंतांना मोफत घरकुल व त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षणाची सुविधा द्यावी, ता.१६ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार सदरची योजना जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे वर्ग करण्यात आली असून ती पूर्ववत जिल्हा समाजकल्याण विभागाकडेच द्यावी, ग्रामीण भागातील नामवंत साहित्यिक, शाहीर आणि कलावंतांचा सांस्कृतिक कार्य विभागाकडून दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मान करावा, नांदेड शहरात भव्य सांस्कृतिक भवन उभारावे, जिल्हास्तरीय समितीसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून द्यावा आदी लोकपारंपारिक कलावंतांच्या प्रलंबित मागण्यांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग कार्यालय नांदेडकडून हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील १३२ गावांच्या पाणीपुरवठा योजने अंतर्गत टाकण्यात आलेल्या पाईपलाईनला सॅण्ड बॉक्सिंग ची कामे न करताच कंत्राटदारास बिले अदा करण्यात आल्याने त्याबाबत तातडीने उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींसह त्यांना पाठीशी घालणारे व शासनाने यापूर्वी बडतर्फ करुन पूनःश्च उप अभियंता म्हणून रुजू करुन घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असलेल्या एम.एस. बोडके यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे ही जनहिताची मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली.
या भजन आंदोलनाला पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच, भीम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके आणि विविध सामाजिक संघटनांनी भेटून पाठींबा दिला.
या भजन आंदोलनात बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे, प्रदेश प्रवक्ता लक्ष्मणराव मा.भवरे, शाहीर रमेश नारलेवाड, शाहीर बापुराव जमधाडे, भीमशाहिर माधव वाढवे, शंकर गायकवाड, ह.भ.प. बालाजी पांचाळ, अंकुश चित्ते, विकासराजा गायकवाड, शिवाजी डोखळे, अविनाश कदम, किशन ठमके, जळबा जळपते, परमेश्वर वालेगांवकर, आनंदा जळपते, सागर शिरमोड ज्योतीताई बेदरकर, सुभाष गुंडेकर, रामजी कदम, तेजाब पाईकराव, केशव माने, वाघमारे बापू, विलास ढवळे, देवकाबाई मुलगीर, ज्योतीताई इंगोले, बबीता आठवले, भुजंग लोणे, शाहीर रामराव वानखेडे, शाहीर यमदलवा आदेगावकर, ज्ञानोबा बाबर, नामदेव जाधव मुगावकर, मीराताई जाधव, अरुणाताई सावते, नागनाथ वच्छेवाड, सुरेखा डोखळे, साहित्यिक महेश अण्णा पुरे, जयशिला जाधव, मथुराबाई माने, सुगंधा घोडके, सुशिला वालेगांवकर, अनिता जाधव, मुक्ता कदम, वनिता लोखंडे, कौशल्या नरवाडे, कांता आढाव, छाया कदम, स्वाती सोळंके, वच्छला शिरसुफळे आदींसह जिल्हाभरातील शेकडो लोकपारंपारिक कलावंतांनी पारंपारिक वेशभूषा व वाद्यांसह हजेरी लावून भजनातून प्रशासनाचे लक्ष वेधले.






No comments:
Post a Comment