वनविभागाने गोकुंद्यात अवैध सागवान लाकडासह अॅटो केला जप्त ; एकूण ४२ हजाराचा मुद्देमाल
गोकुंदा ( किनवट) :
कट साइज सागवान अवैधरित्या घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पाठलागकरून गोकुंदा येथील रेल्वे फाटकाजवळ वनविभाग, किनवटच्या फिरत्या पथकाने २२ हजार रुपये किमतीच्या ४६ नगासह २० हजार किमतीचा अॅटो जप्त केला आहे.
.याबाबत सविस्तर वृत्त असे की, शनिवारी (ता. ४ ) दुपारी दोन वाजता चिखली ( बुद्रूक ) येथून कट साइज सागवानाने भरलेला अॅटो गोकुंदा येथे येत असल्याची गुप्त सूचना किनवटच्या फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्त्राधिकारी राहुल शेळके यांना मिळाली. उपवनसंरक्षक डॉ.आशिष ठाकरे व सहाय्यक वनसंरक्षक डॉ. राजेंद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ ते आपल्या पथकासह गोकुंद्याच्या दिशेने निघाले. गोकुंदा येथील पेट्रोल पंपाजवळ वनविभागाच्या पथकाला बघून किनवट शहराच्या दिशेने येणारा अॅटो चालकाने पलटवून नांदेड मार्गे चिखली ( बुद्रूक ) च्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी नंदीग्राम एक्सप्रेस मार्गस्थ होणार असल्याने रेल्वे फाटक बंद झाल्यामुळे सदरील ऑटोची कोंडी झाली. तेव्हा अॅटो चालकाने गोकुंदा येथील रेल्वेफाटकाजवळ ऑटो सोडून पळ काढला. पाठलाग करणाऱ्या वन विभागाच्या फिरत्या पथकाने घटनास्थळावरून अवैध सागवानाचे कट साइज ४६ नग (ज्याची बाजारभाव किंमत अंदाजे २२ हजार रुपये असून ) आणि वीस हजार रुपये किमतीचा अॅटो सुध्दा जप्त केला आहे. भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार चिखली ( बुद्रूक ) येथील दोन अज्ञात वनतस्करावर गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे. वन विभागाच्या पथकात वनपाल सांगळे, वन रक्षक फोले ,रवी दांडेगावकर , एस.घोरबांड वाहन चालक आवळे, भुतनर , आदि वन कर्मचारी होते.
No comments:
Post a Comment