जिल्हा परिषद पदभरती 'पेसा ' अन्वये नसल्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गोकुंदा ( किनवट) :
नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत ता. 2 मार्च च्या पदभरती जाहिरातीत नमूद पदाकरिता अनुसूचित क्षेत्र विस्तार कायदा ' पेसा ' समावेश नसल्याच्या गंभीर प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळणेसाठी ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन दिले आहे.
निवेदनावर असे नमूद केले की, अनुसूचित क्षेत्र विस्तार कायदा ( पेसा ) अंतर्गत क्षेत्रात पदभरती करतांना राज्यपाल यांची ता. ९ जून २०१४ ची अधिसूचना , सामान्य प्रशासन विभागाच्या ता. ५ मार्च २०१५, ता. २६ जून २०१५ व ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदे अंतर्गत होणाऱ्या पदभरतीकरिता काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे होते. परंतु नांदेड जिल्हा परिषदेने ता. २ मार्च २०१९ च्या पदभरती जाहिरातीमध्ये आरोग्य सेवक स्त्री -पुरूष संवर्ग सोडून इतर कोणत्याही पदाकरिता 'पेसा ' पदभरती दिसून येत नाही . शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणे ही अतिशय गंभीर बाब आहे. यामुळे 'पेसा ' क्षेत्रातील पात्र आदिवासी नोकरीपासून वंचित राहत आहेत . तेव्हा ' पेसा ' क्षेत्राचे पालक या नात्याने योग्य ती चौकशी करून अनुसूचित क्षेत्र व बिगर अनुसूचित क्षेत्र यातील सर्व संवर्ग पदापैकी मंजूर पदे , कार्यरत पदे व रिक्त पदे याची डिसेंबर २०१८ व डिसेंबर २०१९ ची स्वतंत्र माहिती सबंधित कार्यालयाकडून उपलब्ध करून घेऊन आदिवासी पात्र अर्जदारांना न्याय द्यावा . या मागणीचे निवेदन ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल जिल्हा शाखा नांदेडचे उपाध्यक्ष गोपाल रामदास कन्नाके यांनी सहायक जिल्हाधिकारी, किनवट यांचे मार्फत जिल्हाधिकारी नांदेड यांना दिले आहे.
No comments:
Post a Comment