विलासपुर ( रितू साहू ) :
जेव्हा वडील आपल्या मुलीस बिदाई देतात तेव्हा दोन्ही बाजूंनी फक्त अश्रु वाहतात. आज बिलासपूर (छत्तीसगढ ) येथील केंद्रीय तुरुंगात अशीच घटना दृष्टीपथात आली. तुरुंगात शिक्षा भोगणारा कैदी त्याच्या सहा वर्षाच्या खुशी ( बदलेलं नाव) या मुलीला कवटाळून ओक्साबोक्सी रडला. त्यास कारणही खूप खास होते. आजपासून त्याची मुलगी तुरुंगांच्या बाहेर मोठ्या शाळेच्या वसतिगृहात राहायला व आंतरराष्ट्रीय शाळेत शिकायला जात होती. एका संवेदनशिल जिल्हाधिकाऱ्यामुळे तिला मुक्तपणे वावरायचं स्वातंत्र्य मिळालं होतं .
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुमारे एक महिन्यापूर्वी तुरुंगाच्या तपासणीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. संजय सलंग यांचं लक्ष महिला कैद्यांबरोबर बसून असलेल्या निरागस खुशीकडे गेलं होते. तेव्हाच त्यांनी तिला वचन दिले होते की, तुला मोठ्या शाळेत प्रवेश दिला जाईल. आज मंगळवारी ( ता. २६ ) जिल्हाधिकारी डॉ. संजय अलंग यांनी केंद्रिय . तुरुंगामधून खुशीला आपल्या गाडीत बसवून आंतराराष्ट्रीय शाळेत घेऊन गेले. कारमधून खाली उतरल्यानंतर खुशी काही क्षण एकटक शाळेकडेच पाहत राहिली . जिल्हाधिकारी डॉ. संजय अलंग यांनी तिचे बोट धरून तीला शाळेच्या आत सोडले. एका हातात बिस्किटे आणि दुस-या हातात चॉकलेट घेऊन ती शाळेत जाण्यासाठी सकाळपासूनच तयार झाली होती. मुले सामान्यतः शाळेच्या पहिल्या दिवशी रडतात. पण खुशी आज खूपच आनंदी होती. युशीच्या खुशीला पारावार राहिला नव्हता .कारण तुरुंगाच्या लोखंडी सळ्यांच्या मागे भोगाणाऱ्या निर्दोषपणाच्या शिक्षेतून ती आजपासून मुक्त झाली होती.
संवेदनशील जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने शहरातील जैन इंटरनॅशनल शाळेने खुशीला आपल्या शाळेत दाखल करून घेतले. शाळेच्या वसतिगृहात आता ती राहील. विशेष काळजी घेण्यासाठी तीला केअरटेकरची ( काळजीवाहकाची ) व्यवस्था केली आहे. शाळा संचालक अशोक अग्रवाल यांनी सांगितले की, खूशीचे शिक्षण व वसतिगृहाच्या खर्चाचा भार शाळा व्यवस्थापन उचलेल. खुशीला शाळेत सोडायला तुरुंग अधीक्षक एस. एस. टिग्गा हे सुध्दा आले होते.
बिलासपुरच्या केंद्रिय तुरूंगामध्ये एका गुन्ह्यात खुशीचे वडील कैदी म्हणून शिक्षा भोगत आहेत .त्याने पाच वर्षाची सजा भोगली असून आणखी पाच वर्षे त्याला तुरुंगात सजा काटत राहावे लागेल. खुशी पंधरा दिवसाची असतानाच कावीळीने तिच्या आईचा मृत्यू झाला . तिचे पालनपोषण करण्यासाठी घरात कुणीही नव्हते. म्हणूनच तिला आपल्या वडिलांसह जेलमध्ये राहावे लागले होते. जेव्हा ती वाढू लागली तेव्हा महिला कैद्यांवर तिच्या देखभालीची जबाबदारी सोपविण्यात आली. ती तुरुंगात असलेल्या प्ले स्कूलमध्ये शिकत होती. पण तुरुंगाच्या दुःखांपासून खुशीला मुक्त व्हायचे होते. संयोगाने एक दिवस जिल्हाधिकारी जेलची तपासणी करण्यासाठी आले. त्यांचे लक्ष महिला बॅरकध्ये गेले तेव्हा महिला कैद्यांबरोबर एक लहान मुलगी बसलेली त्यांना दिसली. त्यांनी त्या मुलीशी संवाद साधला , तेव्हा तुरुंगातून बाहेर पडून एका मोठ्या शाळेत शिकण्याचा मानस तिने बोलून दाखविला. मुलीचे हे शब्द ऐकूण जिल्हाधिकारी भावनाविवश झाले . त्यांनी लगेच शहरातील शाळा संचालकांशी संवाद साधला. तेव्हा जैन इंटरनॅशनल शाळेच्या संचालकांनी खुशीला आपल्या शाळेत प्रवेश देण्यास सहमती दर्शविली.
जिल्हाधकाऱ्याच्या पुढाकाराने तुरुंगात असणा-या इतर 17 मुलांना सुध्दा तुरुंगाबाहेरच्या शाळेत प्रवेश देण्यात आला . सामाजिक न्यायाचे उदगाते राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती . या ऐतिहासिक दिनी नवा उपक्रम राबवून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या पावन स्मृतींना कृतीशील आदरांजली वाहिली आहे.
No comments:
Post a Comment