नांदेड :
नाविन्यपूर्ण सादरीकरणातून स्वच्छतेचे प्रबोधन होणे आवश्यक आहे असे मत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
पुणे ते पंढरपूर मार्गावरील श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळयात नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने एक स्वच्छता रथ व कलापथक दरवर्षी सहभागी होत असतो. यासाठी गुरुवारी ( ता.27 ) जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात कलापथक सादरीकरण व निवड चाचणी घेण्यात आली, यावेळी कालाकारांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती शिलाताई निखाते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी.यू. इंगोले, व्ही.आर. पाटील, गायन वादन महाविद्यालयाचे प्राचार्य रविराज गुंजकर, निवासी अंध विद्यालयाचे संगीत शिक्षक तथा प्रख्यात व्हायोलीनवादक पंकज शिरभाते, सर्व शिक्षा अभियानाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे आदींची उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, वारक-यांच्या टाळ मृदंगांनी पालखी मार्ग दुमदुमून जातो. दुपारच्या विसाव्याच्या व रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी राज्यातील विविध जिल्हा परिषदेचे स्वच्छतारथासह कलापथक स्वच्छतेविषयी सादरीकरण करते. यामध्ये मोठया उमेदीने, ताकदीने व नाविण्यपूर्ण सादरीकरण कलाकारांनी करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राष्ट्रसंतसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद व्यवहारे यांनी केले. त्यानंतर प्रत्यक्ष कलापथकाच्या सादरीकरणाला सुरुवात झाली. यावेळी जिल्हयातील नऊ कलापथक संच दाखल झाले होते. यात स्वर सरगम सेवाभावी संस्था माळाकोळी तालुका लोहा येथील शाहीर प्रेमचंद मस्के आणि त्यांच्या संचाची निवड करण्यात आली आहे. त्याबद्ल जिल्हा परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. पुणे ते पंढरपूर पालखी मार्गावर येत्या 11 जुलैपर्यंत या कलापथकाचे स्वच्छतेविषयी सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाला अधिक्षक अल्केश शिरशेवाड, चैतन्य तांदुळवाडीकर, विठ्ठल चिगळे, नागेश खंदारे, स्मिता हंबर्डे, सुर्यकांत हिंगमीरे, दीपक श्रीमनवार यांच्यासह कलाकारांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.
वारीत होणार स्वच्छतेचे प्रबोधन- समाजकल्याण सभापती शिलाताई निखाते
.राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने शुध्द पाणी व स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी स्वच्छता दिंडी काढण्यात येते. यात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी, कर्मचारी व राज्यातील विविध जिल्हयातील कलाकार सहभागी होत असतात. वारीत लाखो वारकरी येत असल्यामुळे त्यांच्या मार्फत प्रत्येक गावापर्यंत स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी स्वच्छतेचा जागर घातला जातो. यात नांदेड जिल्हयाच्या वतीने सादरीकरणासाठी जाणाऱ्या कलापथकांनी मोठया प्रमाणात वारीत स्वच्छते विषयी प्रबोधन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. वारीत जाणा-या सर्व कलाकरांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment