अभावग्रस्तांसाठी सदैव धडपडणारं व्यक्तित्व : डॉ. अशोक बेलखोडे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, June 30, 2019

अभावग्रस्तांसाठी सदैव धडपडणारं व्यक्तित्व : डॉ. अशोक बेलखोडे

डॉक्टर्स  डे निमित्त सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणाऱ्या डॉ. अशोक बेलखोडे यांच्या कार्यावर उत्तम कानिंदे यांनी टाकलेला प्रकारा


        सामाजिक क्षेत्रात स्वतःला तन्मयतेने वाहून घेणारे व्यक्तित्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. अशोक बेलखोड. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकत असताना हॅलो आरोग्यविषयक जनजागृती करणाऱ्या चळवळीची स्थापना करण्यात आली. यावेळी थोर समाजसेवक बाबा आमटे व यदुनाथ थत्ते यांची त्यांना प्रेरणा मिळाली. साने गुरुजी हे त्यांचे श्रद्धास्थान आणि त्यांच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी ते एक म्हणून राष्ट्र सेवा दलाचे संस्कार त्यांच्यावर पडलेत. एम. बी. बी.एस., एम. एस. झाल्यानंतर कन्याकुमारी ते काश्मीर व  इटानगर ते ओखा  या भारत जोडो यात्रेचे ते सायकल यात्री झाले. किनवटचे दिवस पुस्तक वाचल्यानंतर बाबा आमटे यांना त्यांनी मरेपर्यंत इथं येऊन मी किनवट सोडणार नाही असे वचन दिले. मराठवाड्यातील एकमेव आदिवासी किनवट तालुक्यात उपसंचालकांकडे विनंती करून आपली पोस्टिंग मागितली.काही काळ येथे नोकरी करून १९९५ मध्ये साने गुरूजी रुग्णालय त्यांनी स्थापले. तालुक्यातील ३९२ खेड्यातील सुमारे तीन लक्ष लोकांना ३० खाटाच्या रुग्णालयाचा त्यांनी फायदा करून दिला. दरवर्षी ४०० हून अधिक शस्त्रक्रिया, दहा हजार वार्षिक तपासणी आणि छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया दोनशेहून अधिक. यामध्ये  आदिवासी व बंजारा प्रत्येकी ४० टक्के आणि उर्वरित १५ टक्के मागासवर्गीय समाजातील. शिबिराच्या निमित्ताने डोंगरी, आदिवासी तालुक्यातील गावांची, वस्त्यांची त्यांनी भटकंती केली. इथल्या भकासपणात सापडलेला समाज पाहिला. सगळीकडे असलेली मरगळ, साचलेपण, या साऱ्यातून  येणारी विलक्षण अस्वस्थता.मनाचे सारे कोपरे ग्रासून टाकणारी पोटतिडक. या समाजासाठी आयुष्य झिजवावं असं झपाटलेपण घेऊन त्यांची धडपड सुरू झाली. हे सामाजिक दृश्य बदलण्यासाठी शिक्षण प्रसारण, समाज सेवा या सारखा परिणामकारक तोडगा दिसत नाही म्हणून त्यांनी हे जेव्हा हेरलं तेव्हा सुविधांनी वंचित, अभावग्रस्त भागातील माणसातला स्वाभिमान जागृत करण्यासाठी त्यांच्या मन, मनगट व मेंदू यांच्यात समन्वय साधण्यासाठी अहर्निष प्रयत्नशील असणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. या तालुक्यातील दऱ्या-खोऱ्यात, वाड्या -तांडयात, पाड्या -गुड्यात राहणाऱ्या कष्टकरी, आदिवासींची, घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांची सर्वांगीण उन्नती कशी होईल यासाठी सदैव धडपड सुरू केली. ८५ हजारपेक्षाही जास्त कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया त्यांनी केल्या. नांदेड, यवतमाळ, हिंगोली ,वाशिम, चंद्रपूर ,बुलढाणा, अमरावती व लातूर या जिल्ह्यांमध्ये प्रवास करून ३७ हजार टाक्यांच्या व ५० हजार दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया व ५ हजार सिझर झालेल्या महिलांच्या शस्त्रक्रिया केल्या. दीड लक्ष किलोमीटरचा प्रवास केला. फिरोदिया ट्रस्ट आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने दोन रुग्णवाहिका देणगी म्हणून प्राप्त केल्या. १९९३ ला लातूर २००१ ला गुजरात मधील भूकंपात वैद्यकीय मदत कार्य केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे दाई प्रशिक्षण, आरोग्य मित्र व रुग्ण सहायक  या अभ्यासक्रमाचे संचालन केले.यातून शंभरच्यावर आदिवासी मुली शिकल्या. आज त्या आरोग्य सेवा देत आहेत. दरवर्षीच आरोग्य शिक्षण प्रशिक्षण, प्रबोधन, तपासणी, उपचार व जनजागरण या विषयाचे महत्व ओळखून सरकार दरबारी नोंद घेण्यासाठी प्रयत्न केले.रक्तक्षय, थायरॉईड, हायड्रोसिल, स्तन व गर्भाशय मुख कर्करोग या बाबतीमध्ये शासनाचे लक्ष वेधून घेतलं. २०१६ पासून परिसरातील दुर्गमातिदुर्गम गावात फिरता दवाखाना आणि पंधरा दिवसातून एकदा तपासणी अविरतपणे आजही सुरू आहे. आदिवासी भागात मराठी विज्ञान परिषदेचे कार्य तालुका विज्ञान केंद्राची स्थापना करून त्यांनी उत्तम रीतीने सुरू ठेवले आहे. संस्थेच्या दोन इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्यांनी सुरू केल्या आणि यावर्षी नुकतीच मान्यता मिळवून सहस्त्र कुंड प्रेक्षणीय पर्यटन स्थळी वरिष्ठ कला महाविद्यालय स्थापना केली. शास्त्रीय संगीताची आवड असल्याने पंधरा वर्षापासून स्वर प्रतिष्ठानद्वारे दरवर्षी संगीत महोत्सव घेतला जातो. मुलांसाठी राष्ट्रसेवा दल श्रम शिबीर, बालिका व बालकांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन, शिक्षकांसाठी प्रशिक्षण आणि २४ ते २६  डिसेंबर साने गुरुजी जयंती ते बाबा आमटे जयंती निमित्त वार्षिकोत्सव घेतला जातो. यामध्ये चित्रकला, एकांकिका, आदिवासी लोककला महोत्सव, एकपात्री प्रयोग, हस्तकला व चित्रपट इत्यादींचे आयोजन केले जाते
                  -उत्तम कानिंदे

        मराठवाड्याचे आरोग्य या विषयावर सातत्याने अभ्यास, लिखाण आणि शासन दरबारी पत्रव्यवहार केला. आंतरभारती, साने गुरुजी कथामाला .राष्ट्रसेवादल ,अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत सक्रिय सहभाग, नाम फाउंडेशन आरोग्य विभाग कोर ग्रुप सदस्य व जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी. त्यांच्या कार्याची तळमळ बघून मराठवाडा वैधानिक विकास मंडळ औरंगाबादच्या आरोग्य अभ्यास गटाचे सदस्य, मराठवाडा वैधानिक मंडळाच्या आरोग्य समितीचे सदस्य, समतोल प्रादेशिक विकास उच्चस्तरीय समिती आदिवासी अभ्यास गटाचे सदस्य, मातामृत्यू चौकशी समिती जिल्हा नांदेड चे सदस्य आणि सध्याला राज्यपाल नियुक्त तज्ज्ञ सदस्य म्हणून मराठवाडा वैधानिक विकास मंडळावू ते आज कार्यरत आहेत. कुपोषणाच्या राज्यस्तरीय गाभा समितीचे सदस्य, जिल्हा आरोग्य कुटुंब कल्याण कार्यकारी समितीचे सदस्य, ट्रायबलल मिशन स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, आश्रमशाळा आरोग्यविषयक तांत्रिक समिती सदस्य, नांदेड एज्युकेशन सोसायटी नांदेड चे सदस्य, इंदिराबाई राठोड ट्रस्ट, निसर्ग सेवा समिती यांचे सदस्य, भारत जोडो युवा अकादमीचे अध्यक्ष, हॅलो मेडिकल फाउंडेशन उपाध्यक्ष अशा विविध पदावर ते काम करतात.
        त्यांच्या कार्याची धडपड पाहून माईर्स, लातूर यांच्या वतीने राष्ट्र धर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय आरोग्य रत्न पुरस्कार, नांदेडचा चळवळसाथी पुरस्कार, साक्री जि. धुळे येथील डॉ.कमलाताई मराठे पुरस्कार, गोविंदभाई श्राफ स्मृती व मराठवाडा भूषण पुरस्कार, नातू फाउंडेशन, पुणेचा पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिकेचा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, हिंगोली व नांदेड जिल्हा प्रशासनाकडून कुटुंब कल्याण कामाचा गौरव, औरंगाबादच्या मराठवाडा कला विकास मंडळाचा समाजसेवक पुरस्कार, नांदेड आयकॉन म्हणून पुरस्कारीत, सकाळ मिडीया औरंगाबाद तर्फे सन्मान, कवी विष्णुदास पुरस्कार, डॉ. प्रमिलाताई भालेराव पुरस्कार, राष्ट्रीय एकात्मतेसाठी चंद्रकांत शहा मेमोरियल अवार्ड, रक्तदान कार्यासाठी महाराष्ट्राचा पुरस्कार आणि कुटुंब कल्याण कार्यासाठी अनेक संस्थांकडून पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे. अशा ह्या चतु :रस्त्र व्यक्तिमत्त्वाचं कार्य किनवट या अतिदुर्गम, डोंगरी, नक्षलप्रभावित तालुक्यातील आदिवासी, भटक्या व मागास समाजातील सर्वांच्या शैक्षणिक, आरोग्य व सामाजिक विकासासाठी अविरतपणे चालू आहे. त्यांच्या भावी कार्यास मन : पूर्वक शुभेच्छा !
  
- उत्तम कानिदे
         किनवट ( नांदेड )
9421758078
8055301800
ukaninde@gmail .com
         

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News