किनवट (जि. नांदेड ) :
गोकुंदा ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी, भारिप - बहुजन महासंघ व एम. आय. एम. यांच्यावतीने गटविकास अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, किनवट समोर एक दिवशीय घंटानाद आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांची आक्रमकता आणि विधायक मागण्या पाहून गटविकास अधिकारी यांनी तात्काळ मागण्या मान्य केल्याने एका दिवसात आंदोलन यशस्वी झाले.
ग्रामपंचायत गोकुंदा ही जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या ग्रामपंचायती पैकी एक आहे. येथे ग्राम विकास अधिकारी म्हणून पी. बी. शिरसेवाड हे कार्यरत होते. त्यांनी अनेक बोगस कामांना येथे जन्म दिला असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. ३३ कोटी वृक्ष लागवड या योजनेला केवळ कागदावरच त्यांनी नाचवले. १९ कोटी रुपयांची जलस्वराज्य योजना मंजूर असतांना केवळ नाकर्तेपणामुळे ठप्प आहे. मागील तीन ते चार महिन्यापासून ग्रामपंचायत कार्यालय उघडलेच नाही. दीड कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजनाही ठप्प आहे. परंतु अनधिकृत जमिनीची फेरफार व रजिस्टर अर्थपूर्ण व्यवहारातून सुरू आहे. गावातील कोणत्याही नगरात नळाला परिपूर्णरित्या पाणी पुरविल्या जात नाही. कमालीची अस्वच्छता संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये आढळून येते. ग्रामपंचायतीच्या अगदी समोरच विश्राम गृहाच्या उजव्या बाजूला घाणीचा मोठा उकिरडाच तयार झाला आहे. त्याकडेही यांचे कमालीचे दुर्लक्ष आहे. वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच वाहनाऱ्या गटारगंगेतून ये -जा करावी लागते. त्या समोरचनांदेड महामार्गावरील स्टेट बँकेपासून ठाकरे चौकाचा अर्धवर्तुळाकार रस्त्यावरून घाण पाणी ओसंडून वाहते. शिकवणी हब असलेल्या या चौकाकडेही त्यांचे कमालीचे दुर्लक्ष आहे. या सगळ्या अनागोंदी कारभाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनात भारिप - बहुजन महासंघाचे दक्षिण तालुकाध्यक्ष राजेंद्र विठ्ठलराव शेळके, उत्तर तालुकाध्यक्ष जे.टी. पाटील, तालुका महासचिव दीपक ओंकार, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे तालुकाध्यक्ष प्रशिक मुनेश्वर, भारिप - बहुजन महासंघाचे तालुका संघटक प्रवीण गायकवाड, तालुका सचिव दिनेश कांबळे, भारिपचे कार्यकर्ते शेख मजहरभाई, शेख कलीम शेख सादिक, प्रशांत दुथडे, सय्यद नजमोद्दिन, संदीप आढागळे, शेख चाँद सरकार, काजी शरफोद्दीन, शेख अल्ताफ शेख दिलावर , संघपाल शेळके, संजय मुखाडे आदी सहभागी झाले होते.
मागण्यांवर त्वरीत विचार करून गटविकास अधिकारी सुभाष धनवे यांनी तात्काळ ग्राम विकास अधिकारी शिरसेवाड यांचा पदभार काढून तिथे टी.जी. मोहारे यांची नियुक्ती केली आणि या सर्व प्रकरणाची २५ दिवसाच्या आत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिल्याने घंटानाद आंदोलन यशस्वीपणे संपन्न झाले.




No comments:
Post a Comment