फारच कठीण कालखंडामधून आपण चाललो आहोत. वेळीच हे थांबवले नाही, तर येणाऱ्या काळात या देशात अराजक निर्माण होईल! - संजय आवटे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, October 7, 2025

फारच कठीण कालखंडामधून आपण चाललो आहोत. वेळीच हे थांबवले नाही, तर येणाऱ्या काळात या देशात अराजक निर्माण होईल! - संजय आवटे


फारच कठीण कालखंडामधून आपण चाललो आहोत. वेळीच हे थांबवले नाही, तर येणाऱ्या काळात या देशात अराजक निर्माण होईल! 

- संजय आवटे


       पाकिस्तानातही घडले नसेल, ते इथे घडते. देशाच्या सरन्यायाधीशांवर सर्वोच्च न्यायालयात चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न होतो. ज्याने चप्पल काढली, तो कोणी माथेफिरू किंवा पौगंडावस्थेतला गुन्हेगार नसतो. बहात्तर वर्षांचा एक वकील सरन्यायाधीशांना चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न करतो. कारण काय? तुम्ही आमच्या धर्माचा अपमान केला. सनातन धर्माचा जो अपमान करेल, त्याला आम्ही बघून घेऊ. खरं म्हणजे गोष्ट इतकी साधी होती. अगदी सहजपणे सरन्यायाधीश बोलले होते. 


मुद्दा काय होता? 

भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराचा मुद्दा. खरं म्हणजे, हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारित. त्यामुळे न्यायालयाने ही याचिका फेटाळली. तरीही, संबंधित वकिलाचा युक्तिवाद सुरूच होता. खजुराहोतल्या भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराच्या याचिकेवर सुनावणी करत असताना, गवई यांनी त्या वकिलाला म्हटले की, “न्यायालयाच्या कक्षेत हे येत नाही. तुम्ही जर खरे विष्णूभक्त असाल तर ध्यान करा, प्रार्थना करा; देवालाच काय करायचे ते विचारा.” 


यामुळे एवढा संताप यावा, असे काय आहे? साधी कमेंट केल्यानंतर तुम्हाला हा धर्माचा अपमान वाटतो आणि धर्माचा अपमान केला म्हणून तुम्ही संविधान पायदळी तुडवता! संविधानापेक्षा सनातन धर्म मोठा आहे, असे तुम्हाला वाटते का? 

कसला माज हा? कसली ही मानसिकता? 

याच अविचाराने गांधींचा खून केला. याच मानसिकतेमुळे बाबासाहेबांना येवल्यात 'ती' घोषणा करावी लागली.


भूषण गवई हे भारताचे सरन्यायाधीश आहेत. त्यांचा धर्म बौद्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह १९५६ मध्ये विजयादशमीला सीमोल्लंघन केले. हिंदू धर्म सोडला. बौद्ध धर्मात प्रवेश केला. अर्थात, बाबासाहेबांनी आधी एकवीस वर्षांपूर्वीच हे सांगितले होते. १९३५मध्ये नाशिकजवळच्या येवल्यात झालेल्या सभेत बोलताना बाबासाहेब म्हणाले होते की, मी हिंदू म्हणून जन्माला आलो; मात्र हिंदू म्हणून मरणार नाही. असे म्हणणारे बाबासाहेबच या देशाचे पहिले कायदामंत्री झाले. संविधानाचे शिल्पकार ठरले. 


हिंदू धर्म आपण सोडणार आहोत, हे जाहीर करूनसुद्धा 'हिंदू कोड बिला'साठी बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला. हिंदू कोड बिलाचा मुद्दा थेट हिंदू महिलांच्या हक्कांशी आणि सामाजिक स्थानाशी संबंधित होता. हे बिल म्हणजे, स्वातंत्र्यानंतर स्त्रियांना कायदेशीर समानता देण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल होते. सनातन्यांनी त्यावर टीकेची झोड उठवली. बाबासाहेब मात्र ठाम होते. नंतर पंडित नेहरूंनी टप्प्याटप्प्याने ते ‘हिंदू कोड बिल’ मंजूर करून घेतलेही. याच्या लाभार्थी असलेल्या हिंदू महिलांना तरी नेहरू-आंबेडकरांविषयी कृतज्ञता वाटते का?

 

अहो, असा हा देश, जिथे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर नावाचा, पूर्वीच्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीत जन्मलेला महामानव देशाचा पहिला कायदामंत्री होतो. तोच देशाच्या राज्यघटनेचा शिल्पकार होतो. त्या देशात सरन्यायाधीशांची पूर्वीची जात कोणती आणि आताचा धर्म कोणता, यावरून त्यांचे मूल्यमापन होणार असेल, तर आपण नक्की कुठल्या युगात आहोत? बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतरही बाबासाहेब म्हणाले होते, ‘मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीयच आहे. ‘भारतीय’ ही आपली खरी ओळख आहे.’ 


भारताच्या राष्ट्रवादाचे हे वैशिष्ट्य आहे. 

बराक ओबामा भारतामध्ये येतात, तेव्हा काय म्हणतात? “व्हॉट इज ब्युटी ऑफ इंडिया? भारताचे सौंदर्य काय आहे? तुमच्याकडे एकाच वेळी मिल्खासिंग आहे. मेरी कोम आहे आणि शाहरुख खान आहे. हे भारताचे वैशिष्ट्य. एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या भाषा असणारा असा हा जगातला एकमेव देश. शेजारचा पाकिस्तान एकच धर्म असूनही दुभंगला. भारत मात्र दिमाखात झेपावला. ‘कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी!’ 


ही बात काय आहे? ही भारताची गोष्ट आहे. ही संविधानाची कहाणी आहे. लोकशाही नावाच्या संकल्पनेचे साहस आहे. ते सगळंच आपण पुसून टाकायला निघालो आहोत. भारताची कल्पनाच आपण खोडून टाकू लागलो आहोत!

 

ज्या देशात मोहम्मद रफी ऐकत तुमचा बाप तरुण होतो. सलीम-जावेदचे सिनेमे बघत मोठा होतो. त्याच्या लग्नातही बिस्मिल्ला खान यांची शहनाई वाजते. त्याच्या पोरांचा हिरो शाहरुख खान असतो. हा भारत आहे. 

इथे राष्ट्रध्वजावर अशोक चक्र असते. राज्यघटनेत भगवान महावीरही दिसतात. 


मध्येच कुठून आला हा सनातन धर्म आणि कुठून आली ही धर्मांधता? याच धर्मांधतेने देशच्या देश संपून गेले. त्याच विध्वंसाच्या दिशेने आपण का निघालो आहोत? 

बाबासाहेबांच्याच राज्यघटनेला हरक्षणी हातात ठेवणार्‍या वकिलाने सरन्यायाधीशांवर चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न का केला असेल? त्याला सरन्यायाधीशांनी माफही केले. पण, रोज जी न्यायालाच पायदळी तुडवते, त्या व्यवस्थेचे काय करायचे? 

 

भारत नावाचा देश जेव्हा उभा राहत होता, तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता. हा देश उभाच राहू शकणार नाही, अशा प्रकारची मांडणी भले भले लोक करत होते. या देशामध्ये एवढे धर्म आहेत. एवढ्या जाती आहेत. एवढ्या भाषा आहेत. या देशाला जोडणारा धागा काय असेल? कुठल्या धाग्याने हा देश ‘देश’ म्हणून उभा राहील? इथे भाषेवरून संघर्ष उफाळून येतील. इथे जातीवरुन लोक एकमेकांचे मुडदे पाडतील. इथे धर्मावरून भयंकर दंगली उसळतील. काही दिवसांत हा देश नष्ट होईल किंवा याचे तुकडे-तुकडे होतील, असे बोलले जात होते. हे बोलणारे भारताचे विरोधकच होते, असे नाही. काही अभ्यासकांना सुद्धा असे वाटत होते. 


जगात कुठेही नाही, अशी गोष्ट भारतामध्ये आहे. आणि, ती या देशाला संपवेल, असे काही समाजशास्त्रज्ञ सांगत होते. ती गोष्ट म्हणजे जातींची उतरंड. जन्मजात मानली गेलेली जातींची उतरंड या देशाचा डोलारा संपवून टाकेल, असे बोलले जात होते. मात्र, असे घडले नाही. याचे एकमेव कारण, भारताची राज्यघटना. तुम्ही कुठल्याही धर्माचे असा. तुम्ही कुठल्याही भाषेत बोलत असा. हा देश तुमचा आहे. तुम्ही या देशाचे अंतिम सत्ताधीश आहात. हे सांगणारी भारताची राज्यघटना! 


सत्य आणि अहिंसेच्या पायावर स्वातंत्र्याची लढाई लढणाऱ्या महात्मा गांधींनी या देशाला व्यापक अधिष्ठान दिले. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेच्या पायावर देशाला उभे केले. पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंनी ‘नियतीशी करार’ केला आणि या देशाला नवे स्वप्न दाखवले. म्हणून हा देश इथपर्यंत येऊन पोहोचला. 

 

आपले आजी-आजोबा, पणजी-पणजोबा अडाणी असतीलही कदाचित, पण त्यांना गांधीबाबा कळला होता. त्यांना बाबासाहेब समजला होता. नेहरूनं नियतीशी केलेला करार त्यांच्यापर्यंत पोहोचला होता. त्यांच्या खोपटात तेव्हा अंधार असेल. पण, अंगावर मळकट गोधडी घेऊन झोपताना उद्याचं स्वप्न त्यांच्या डोळ्यात नक्की असेल. त्यांनी ते स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नाचा पाठलाग केला. गांधी-नेहरू-आंबेडकर यांची पाठराखण केली. म्हणून, आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो. 


आपल्या डोळ्यातली स्वप्नं कुठे गेली? आणि, मला सांगा आजी-पणजीची ती गोधडी कुठे गेली? 


वेड्यांनो, भारत म्हणजे अशी गोधडी आहे. वेगवेगळ्या भाषा, अनेक पंथ, अनेक धर्म असे सगळे रंगबिरंगी तुकडे गोळा करून भारत नावाची गोधडी शिवली गेली आहे. केवढी उबदार आहे ही गोधडी. ही गोधडीच आपण उसवायला निघालो आहोत. गुण्यागोविंदाने नांदण्याऐवजी धर्माच्या नावाने विखार पसरवत आहोत. जातींच्या नावाने एकवटू लागलो आहोत. दुसऱ्या जातीला, धर्माला शिव्या घालू लागलो आहोत. 


भारत नावाची गोधडी गोड दिसते. उबदार भासते. पण, जर ती उसवली तर विध्वंस अटळ आहे. तुमच्या मुला-मुलींना छान आयुष्य मिळावं, सुंदर भविष्य मिळावं, असंच तुम्हाला वाटत असेल ना? 


धर्मावरून, जातीवरून, भाषेवरून पेटलेल्या दंगलींमध्ये आपली मुलं, आपली नातवंडं होरपळून मरावीत, अशी इच्छा कोणाची असणार आहे?

 

- संजय आवटे

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News