नांदेड (ता. 20 ऑक्टोबर ): गायत्री मंत्र ते रुपेरी वाळूच्या माडाच्या बनात ये ना, धिरे धिरे से मेरी जिंदगी आना, जिये तो जिये कैसे, नजर के सामने, हर करम अपना करेंगे ये वतन तेरे लिये या व अशा एकापेक्षा एक सरस गाण्यांनी आज प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांनी नांदेडच्या दिवाळी पहाटचा कार्यक्रम गाजवला. भल्या पहाटे प्रेक्षकांची अभूतपूर्व गर्दी हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये होते.
जिल्हा प्रशासन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, सचखंड गुरुव्दारा बोर्ड आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या विद्यमाने गेल्या तेरा वर्षापासून गोदावरी तटावर बंदाघाट येथे या दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील सलग तीन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
गोदावरीच्या तीरावरची ती मंद पहाट, वाऱ्याच्या सळसळीने आलेला गारवा, धुक्याच्या हलक्या लहरींनी सजलेला बंदाघाट परिसर आणि त्या वातावरणात घुमणारे सुमधुर स्वर! अशी दैवी अनुभूती देणारी ‘दिवाळी पहाटने’ यंदाही नांदेडकरांच्या मनात सुरांची सुवासिक फुले फुलवून गेली.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन केंद्रचि अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) तथा विधान परिषद गटनेते आमदार हेमंत पाटील, आमदार आनंद पाटील तिडके बोंढारकर, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल व संयोजन समितीच्या सदस्यांनी केले.
हा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थापन प्रभावी पद्धतीने केले, ज्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला नाही. तसेच, मनपाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यास सहकार्य केले आहे.
या सांगीतिक सोहळ्याची सुरुवात पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या गायत्री मंत्रोच्चाराने होताच संपूर्ण परिसर पवित्रतेने भारून गेला. ‘संगीत अनुराधा’ या शीर्षकाखाली सादर झालेल्या त्यांच्या मैफिलीत भक्ती, प्रेम, देशभक्ती आणि लोकसंगीताचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला.
प्रारंभीच्या सत्रात ‘मन मेरा मंदिर, शिव मेरी पूजा’, ‘ओ शेरावाली, तूने मुझे बुलाया शेरावालिये’ या आराधनात्मक गीतांनी वातावरण भक्तिभावाने ओथंबून गेले. त्यानंतर चांदणं चांदणं झाली रात, एकविरेची पहात होते वाट...’ या लोकगीताने रसिकांना महाराष्ट्राच्या मातीच्या सुगंधात रंगवले.
सुरांची लय पुढे प्रेमगीतांच्या तालावर झुलली. ‘रुपेरी वाळूत ये ना, प्रीतीत ये ना, जवळ घे ना’ या गाण्याने तरुणाईला रोमँटिक अनुभूती दिली, तर ‘काळ्या मातीतं मातीतं, तिफनं चालते ’ आणि ‘हृदयी वसंत फुलताना’ 'अश्विनी ये ना' या हलक्याफुलक्या व युवा वर्गाला सर्वाधिक आवडणाऱ्या गीतांनी आनंदाची झुळूक निर्माण केली.
संगीताचा रंग गडद होत गेला तसा प्रेक्षकांचा उत्साहही वाढत गेला. ‘धीरे धीरे से मेरी ज़िंदगी में आना’, ‘अजीब दास्तॉं है ये, ‘दिल दिया है, जान भी देंगे’ या त्यांच्या लोकप्रिय हिंदी गीतांवर रसिकांच्या टाळ्यांचा गजर गोदावरीच्या लाटांवर मिसळला. तीन दशकांच्या त्यांच्या सुमधुर गायन प्रवासाचा सुवास या सुरावटींतून दरवळत राहिला.
मैफिलीची सांगता पौडवाल यांनी भक्तिभावाने ‘हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला...’ या गाण्याने केली. कार्यक्रमात सहगायक म्हणून रवींद्र अहिरे व रेषमा उपासे, तबला-ढोलकावर गौरव बोयाना, आदेश मोरे, संवादिनीवर आयुषी बोयाना, सिंथेसायझरवर किरण वेहेळेकर तर ऑक्टोपॅडवर राकेश पुलेकर यांनी अनुराधाजींच्या गायकीला मनभावी सुरसाथ दिली. यावेळी प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांचा मनपा आयुक्त डॉ.महेश डोईफोडे व निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी सत्कार केला.
संपूर्ण संकल्पना आणि निवेदन सुप्रसिद्ध लेखक डॉ. नंदू मुलमुले यांनी साकारले तर सूत्रसंचालन गजानन पिंपरखेडे यांनी उत्साही शैलीत केले. गतवर्षी अन्नपूर्णा मंदिर व चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रमुख सुषमा गहेरवार यांनी प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांचा कार्यक्रम होईल असे जाहीर केले आणि त्यांनी आपला शब्द पूर्ण केला.
गोदावरीच्या शांत पाण्यावर उमटलेले सूर, पहाटेच्या मंद प्रकाशात झळकणाऱ्या दिव्यांची लय आणि त्या लयीशी एकरूप झालेले रसिक नांदेडकर हीच खरी ‘नांदेडकरांची अविस्मरणीय दिवाळी पहाट ठरली.
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, समितीचे अध्यक्ष प्रख्यात गझलकार बापू दासरी, समितीचे सदस्य सुरेश जोंधळे, शंतनू डोईफोडे, लक्ष्मण संगेवार, महेश होकर्णे, चारुदत्त चौधरी, उमाकांत जोशी, वसंत मैया, मकरंद दिवाकर, विजय जोशी, अॅोड.गजानन पिंपरखेडे, हर्षद शहा, विजय बंडेवार आदी मंडळी या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
प्रवेश द्वाराजवळ अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि पूरग्रस्त मदत निधीसाठी एक कक्ष आणि बॉक्स ठेऊन मदतीचे आवाहन संयोजन समितीने केले होते त्यास नांदेड कर मंडळीनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
स्वरांची आतषबाजी आणि नृत्याचा झंकार : दिवाळी सांजने नांदेड उजळला”
#गोदावरी किनाऱ्यावरील सांस्कृतिक सूरमंचावर ‘दिवाळी पहाट’चा अद्भुत संगम
नांदेड (ता. 21 ऑक्टोबर) : गोदावरीच्या तीरावरच्या मंद वाऱ्यात, सूर आणि तालाच्या लहरींनी नांदेडकरांच्या मनात दिवाळीचा नवा उजेड फुलवला. जिल्हा प्रशासन, सचखंड गुरुद्वारा बोर्ड, नांदेड-वाघाळा महानगरपालिका आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिवाळी पहाट – स्वरसरीता व डॉ सान्वी जेठवाणी निर्मित सांज झंकार’ या सांस्कृतिक पर्वाने नांदेडच्या परंपरेला नव्या तेजाने उजाळा दिला. हा तेराव्या वर्षीचा सोहळा जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे.
यंदा त्यात नव्या कलात्मक प्रयोगांची फुलबाग फुलली आहे.
स्वर, ताल आणि गझलेचा अभिनव संगम
कवी बापू दासरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या फ्युजन ऑफ तालवाद्य आणि गझल या अनोख्या प्रयोगाने संगीतप्रेमींना एक अद्वितीय अनुभव दिला.
कार्यक्रमाची सुरुवात बासरीवादक ऐनोद्दीन आणि त्यांच्या शिष्य परिवाराच्या सामूहिक बासरीवादनाने झाली. त्यानंतर सार्क परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रसिद्ध व्हायोलिन वादक डॉ. गुंजन शिरभाते यांनी राग देश मधील मनोहारी करामती पेश केल्या. त्यांना तबल्यावर भार्गव देशमुख यांनी सुंदर साथ दिली.
यानंतर राग यमनमध्ये मिलिंद तुळणकर यांनी जलतरंगावर बंदिश सादर करत श्रोत्यांना थक्क केले. त्याच रागातील गझल ‘रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिये आही’ ही बाळासाहेब पाटील यांच्या सुमधुर आवाजात रंगली. त्यांच्या साथीला प्रकाश सोनकांबळे (तबला), चिन्मय स्वामी (सिंथ), ऐनोद्दीन (बासरी) आणि अनहद वारसी (गिटार) यांनी स्वरांची जादू विणली.
राग आणि गझल यांचा असा एकाच मंचावरचा ताळमेळ हे या कार्यक्रमाचे खरे वैशिष्ट्य ठरले. राग चंद्रकंसमध्ये ऐनोद्दीन यांच्या बासरीनंतर सौ. आसावरी रवंदे जोशी यांनी बापू दासरींची ‘कवितेच्या गावा मधल्या शब्दांची गाणी व्हावी’ ही गझल सादर केली. पुढे राग झिंजोटीत सतारवादक कल्याणी देशपांडे आणि राग चारुकेशीमध्ये जलतरंगवादक मिलिंद तुळणकर यांच्या सादरीकरणांनी कार्यक्रमात स्वरवैविध्य निर्माण केले.
शेवटी राग बिहागमधील कल्याणी देशपांडे यांच्या सुरांनी सभागृहात माधुर्य भरले, तर त्याच रागातील ‘सलोनासा सजन है और मैं हूँ’ ही गझल आसावरी जोशी यांच्या आवाजात भावविव्हल करून गेली. सूत्रसंचालन व शेरोशायरीच्या झंकाराने बापू दासरी यांनी संपूर्ण सादरीकरणाची मनमोहक गुंफण केली.
‘नृत्य झंकार’ने उजळली सांज
संध्याकाळी ‘लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य झंकारने दिवाळीच्या रंगतिला भरघोस सौंदर्य दिले. पहल राठी आणि आराध्या पोईल यांच्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची मंगल सुरुवात झाली. त्यानंतर मंगळागौर, श्रीराम स्तुती, महालक्ष्मी अष्टकम या नृत्यरचना – कथ्थक व भरतनाट्यमच्या सुंदर संगमातून – प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेल्या.
नृत्यदिग्दर्शक शुभम बिरकुरे आणि ईशा राजीव जैन यांच्या ‘महाकाली अवतार’ व ‘रक्तबीज पतन’ या नृत्यनाट्यांनी प्रेक्षकांना थरारक अनुभव दिला. कार्यक्रमाचा शेवट पारंपरिक गोंधळ या नृत्याने झाला. संपूर्ण सादरीकरणात नृत्य, प्रकाशयोजना आणि संगीत संयोजन यांचा सुंदर ताळमेळ अनुभवायला मिळाला.
‘स्वरसरीता’चा पहाटेचा जादुई प्रवास
प्रात:साडेपाच वाजता गोदावरीकाठावर ‘स्वरसरीता’ कार्यक्रमाला संगीतशिरोमणी अंकिता जोशी (मुंबई) यांच्या रागदारी गायनाने सुरुवात झाली.
राग ललितच्या ‘रतना रे नैना’ या झपताल निबद्ध बंदिशीने प्रेक्षकांना घराणेशाही गायकीचा साक्षात्कार घडवला. त्रितालातील बाल समय रवी भक्षी या ध्रुत बंदिशीत त्यांच्या गमक, घसीट आणि मिंडयुक्त गायकीने स्वरांची आभा निर्माण केली. भक्तिगीते, शबद आणि दिलकी तफीश या लोकप्रिय गीतांनी प्रात:काळी वातावरण सुरेल केले.
अंकिता जोशी यांना हार्मोनियमवर अभिनय रवंदे, तबल्यावर प्रशांत गाजरे, पखवाजवर विश्वेश्वर जोशी यांनी साथ दिली. त्यांच्या शिष्यवृत्तीतल्या अदिती रवंदे, ईश्वरी जोशी, भाग्यश्री टोमके यांसह बासरीवर अनहद वारसी, सिंथवर चिन्मय मठपती आणि टाळावर धनंजय कंधारकर यांनी स्वरसंवाद साधला.
कार्यक्रमाचे संगीत संयोजन आणि निवेदन लक्ष्मीकांत रवंदे यांनी केले.
या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, तहसीलदार संजय वारकड, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम उपस्थित होते.
मान्यवर कलाकारांचा सत्कार संयोजन समिती सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.
गोदावरीचा बंदाघाट, शेकडो रसिकांची गर्दी आणि सुरांनी नटलेले वातावरण — अशी ही दिवाळीची सांज, जिथे स्वरांनी फुलझड्या उडवल्या आणि नृत्याने आकाश उजळले!
‘रुपेरी सोनसळा’ या पाडवा पहाट कार्यक्रमामधून मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा सुरेल व समृद्ध प्रवास नांदेडकरांनी अनुभवला
पौर्णिमा आडगावकर, किर्ती पंढरपूरकर, कांचन अंबेकर, स्वरांजली पांचाळ, मिताली सातोनकर, सच्चिदानंद डाकोरे, शंकर सोनतोडे, विजय जोशी यांच्या वैविध्यपूर्ण गाण्यांनी पाडवा पहाट झंकारली
नांदेड (ता. २२ ऑक्टोबर) : मूकचित्रपटांच्या प्रारंभीच्या पडद्यापासून ते ‘दादा कोंडके’ यांच्या हास्यरसपूर्ण चित्रपटांपर्यंतचा मराठी चित्रपटसृष्टीचा झळाळता प्रवास नांदेडकरांनी ‘रुपेरी सोनसळा’ या मनोवेधक संगीत सोहळ्यात दिवाळी पहाट या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवला. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, बाळकृष्ण माडे, सुधीर फडके, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, जयमाला शिंदे, सुरेश वाडकर, हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुवर्णयुगाला उजाळा देणारा हा कार्यक्रम ‘पाडवा पहाट’च्या उत्सवी वातावरणात पार पडला.
जिल्हा प्रशासन, सचखंड गुरुद्वारा बोर्ड, नांदेड-वाघाळा महानगरपालिका आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिवाळी पहाट' या उत्तरोत्तर रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असलेल्या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रातील पहिल्या कार्यक्रमाला नांदेड महानगरातील हजारो रसिक श्रोते उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमाला तरुणाईने. गर्दी केली होती.
नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर व त्यांच्या टीमने दिवाळी पहाट उपक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमातील सहभागी कलावंतांचा व साथीदारांचा सत्कार नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप,नांदेड उत्तर मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर ,निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर व संयोजन समितीतील सर्व सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पत्रकार विजय जोशी यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाची संकल्पना व निवेदन ॲड. गजानन पिंपरखेडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. १९६० ते १९८० या कालखंडातील मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजेच गीत, संगीत आणि आशय यांचे अभंग त्रिवेणी संगम — या काळातील मधुर गाण्यांची सरमिसळ कलांगण प्रतिष्ठान प्रस्तुत ‘रुपेरी सोनसळा’ या नावाने रंगली. कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन डॉ. प्रमोद देशपांडे यांचे होते.
सिंगापूरस्थित प्रख्यात गायिका सौ. पौर्णिमा आडगावकर, किर्ती पंढरपूरकर, कांचन अंबेकर, स्वरांजली पांचाळ, मिताली सातोनकर, सच्चिदानंद डाकोरे, शंकर सोनतोडे व विजय जोशी यांनी मराठी चित्रपटांच्या अमर गीतांना नवसंजीवनी दिली.
सच्चिदानंद डाखोरे व स्वरांजली पांचाळ यांनी गायलेल्या “तू सुखकर्ता, तू दुखहर्ता” या गणेशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर तुझ्यासाठी शंकरा भिल्लीण मी जाहले, जय देवी मंगळागौरी, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई हे अंगाई गीत, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, सख्या रे घायाळ मी हरिणी, इथूनी मी दृष्ट काढिते निमिष एक टाक तू , प्रथम तुझं पाहता जीव वेडावला, बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, हिलं हिलं पोरी हिला तुझ्या कपालीला टिळा, आज आनंदी आनंद झाला, चंद्र आहे साक्षीला, मी जलवंती.... मी फुलवंती, तुझी नजर लागेल मला , बाई गं माझ्या पायाला बांधलाय भवरा, लबाड लांडग ढोंग करतय, आला आला वारा पावसाच्या धारा, अहो कुण्या गावाचं आलं पाखरू, माझ्या मनी प्रियाची मी तार छेडीते, रेशमाच्या रेघांनी यासारखी श्रोत्यांच्या मनावर कायमची रुंजी घालणाऱ्या वैविध्यपूर्ण, अविस्मरणीय मराठी गाणी व लावण्या या गायकांनी अतिशय ताकदीने उत्तम पद्धतीने सादर केल्या.
या गाण्यांनी मराठी चित्रपटांच्या सुवर्णयुगाचा गंध पुन्हा दरवळला — जेव्हा कथा भावस्पर्शी, गीतांमध्ये अर्थगर्भता आणि संगीतामध्ये आत्मा होता. या कालखंडानेच मराठी चित्रपटसृष्टीला कलात्मकता, सादरीकरण आणि संगीताच्या दर्जात नवे मापदंड दिले. तसेच हे चित्रपट सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक वास्तवाचे आरसे बनले. वसंत देसाई, सुधीर फडके, राम कदम, श्रीनिवास खळे यांचे संगीत आणि ग.दि. माडगूळकर, मंगेश पाडगावकर यांच्या गीतांनी चित्रपटांना आत्मिक उंची दिली. भालजी पेंढारकरांच्या ऐतिहासिक चित्रपटांपासून दादा कोंडकेच्या लोकाभिमुख विनोदी चित्रपटांपर्यंत विषयवैविध्य खुलले. संगीत, संस्कार आणि समाजभान यांच्या संगमाने या चित्रपटांनी मराठी मन जिंकले. निर्माते पत्रकार आणि गायक विजय जोशी यांच्या दाम करी काम या गीताने तर बहारच केली
कार्यक्रमाच्या अखेरीस “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” या भक्तिगीताने मैफिलीची सांगता झाली. संगीत नियोजन सिद्धोधन कदम व शेख नईम यांनी उत्कृष्टरीत्या केले. साथसंगत राज लांबटिळे, स्वप्निल धुळे, भगवानराव देशमुख, रवी कुमार भद्रे, रतन चित्ते यांनी केली. तबल्यावर स्वप्निल धुळे व सिद्धोधन कदम यांनी वाजवलेल्या तोडींनी वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन ॲड. गजानन पिंपरखेडे यांनी केले.
‘रुपेरी सोनसळा’ या संगीत मैफिलीने केवळ मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ उजळवला नाही, तर नांदेडकरांच्या हृदयात त्या काळातील सुरांचा सुवास पुन्हा फुलवला.









No comments:
Post a Comment