किनवट :
निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना, नियमांचे काटेकोरपण पालन करून सर्व मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी यांनी निवडणूक प्रक्रिया आत्मविश्वासाने अचूक व सूरळीत पार पाडून आपल्या नांदेड जिल्ह्याचं नाव राज्यात करावं असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे (भाप्रसे ) यांनी केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने ८३- किनवट विधानसभा मतदारसंघाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी यांच्या दुसऱ्या प्रशिक्षणाची पाहणी करण्याकरिता आले असता मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. पुढे बोलतांना श्री डोंगरे म्हणाले, दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची सूक्ष्मपणे अंमलबजावणी करावी. मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यांच्या कार्यपद्धती नीट आत्मसात करून त्याची स्टेप बाय स्टेप हाताळणी करावी. दैनंदिनी व १७ सी हे नमुने अचूक भरावे. अशा सर्व बारीक सारीक बाबी सुयोग्य केल्या तर निवडणूक प्रक्रिया उत्तम होईल.
दि. १२ ऑक्टोबर रोजी मातोश्री कमलताई ठमके इंग्रजी शाळा, कोठारी (चि) येथे हे प्रशिक्षण आयोजित केले होते. याप्रसंगी सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल (भाप्रसे ), तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र देशमुख व सर्वेश मेश्राम, मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विद्या कदम, क्षेत्रिय अधिकारी समन्वयक प्रवीण टिक्कास उपस्थित होते.
मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी एलईडी वॉलवर पॉवरपॉईंट प्रझेंटेशनद्वारे प्रशिक्षण दिले. यावेळी त्यांनी चाचणी मतदान ( मॉक पोल) नोंदविलेल्या मतांचा हिशोब ' नमुना १७ सी ' आणि केंद्राध्यक्षांची दैनंदिनी व सिलिंगप्रक्रिया या विषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात एम.बी. स्वामी, रमेश मुनेश्वर, रुपेश मुनेश्वर यांचेसह सर्व मास्टर ट्रेनर यांनी सर्व क्षेत्रिय अधिकारी यांच्या नेतृत्वात सर्वांकडून कक्षनिहाय मतदान यंत्र हाताळणीचे प्रात्यक्षिक करवून घेतले.
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी नायब तहसिलदार व्ही. टी. गोविंदवार, मोहम्मद रफीक, माधव लोखंडे, अशोक कांबळे, रामेश्वर मुंडे, के.डी. कांबळे, गोविंद पांपटवार, व्ही.टी. सूर्यवंशी, संदीप पाटील, नितीन शिंदे, चंदू राठोड, सत्यम हाके, बालाजी इंदुरवार, माधव कांबळे, मनोज कांबळे, देवेंद्र क्षिरसागर यांचेसह सर्व नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आदिंनी परिश्रम घेतले.
टपाली मतपत्रिका सुलभीकरण केंद्र
गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांना साक्षांकन अधिकारी नेमून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी प्रशिक्षणस्थळी सुलभीकरण केंद्र उपलब्ध करून दिल्याने ईतर विधानसभा मतदारसंघात नियुक्ती झालेल्या पाचशेहून अधिक मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानाचा हक्क बजावला.
No comments:
Post a Comment