नांदेड :
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपळगाव (कोरका) अंतर्गत नाळेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच केंद्र प्रमुखासह दोन सह शिक्षकांची एक वार्षिक वेतनवाढ एक वर्षासाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद केल्याची कारवाई नांदेड पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांनी केली आहे.
नाळेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेस दिनांक 7 ऑक्टोबर 2019 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या भेटी दरम्यान शैक्षणिक साहित्य वापरात नसल्याचे दिसून आले. शाळेत मोठया प्रमाणात अस्वच्छता आढळून आली. जिल्हयात प्लास्टीक मुक्तीची मोहिम चालू असतांना देखील शाळास्तरावर हा उपक्रम राबविला गेला नाही, शाळेच्या प्रांगणात प्लास्टीक कचरा आढळून आला. अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादूर्भावही दिसून आला. तसेच विद्यर्थ्यांची शैक्षणीक गुणवत्ता असमाधानकारक आढळून आल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या.
त्यानंतर सदर शिक्षकांनी नोटीसांचा खुलासा सादर केला परंतु हा खुलासा असमाधानकारक असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन गट शिक्षणाधिकारी यांनी सहशिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक बालाजी गोविंदराव कोत्तावार यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 चा भंग केल्या कारणावरुन दिनांक 10 ऑक्टोबर 2019 रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम 1964 मधील भाग-तीन(4) मधील (एक व दोन) नुसार जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात कोत्तावार यांचे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपळगाव (कोरका) हे त्यांचे मुख्यालय राहणार आहे. तसेच कर्तव्यात कसूर केल्यामुळे केंद्र प्रमख मोहम्मद अयुब शेख इमाम, सह शिक्षक एकाळे यादव गोविंदराव व श्रीमती नंदा हनमंतराव कुलकर्णी यांची एक वार्षिक वेतनवाढ एक वर्षासाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद केल्याची कारवाई शिक्षण विभागाने केली आहे.
No comments:
Post a Comment